Breaking News

रामभाऊ म्हाळगी यांचा संसद प्रवेश

सतराव्या लोकसभेसाठी भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांनी देशात सात टप्प्यात निवडणुकीच्या कार्यक्रमाची 10 मार्च 2019 रोजी घोषणा केली. त्या दिवसापासून देशात आदर्श आचारसंहिता लागू झाली. निवडणुकीची रणधुमाळी जोरदार सुरू आहे, प्रचार शिगेला पोहोचला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दणदणीत रणशिंग फुंकून महाराष्ट्रात जबरदस्त वातावरण तयार केले आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाआघाडीची प्रचाराची पातळी दिवसेंदिवस घसरत चालली आहे.

या पार्श्वभूमीवर जुन्या स्मृतींना उजाळा देणारे काही किस्से ‘रामप्रहर’च्या चोखंदळ वाचकांसाठी सादर करीत आहे.   दत्ता ताम्हाणे यांंचा त्याग रामभाऊ म्हाळगी यांना लोकसभेत घेऊन गेला! इंदिरा गांधी यांनी भारतात एकछत्री राजवट चालवली आणि आणीबाणी लादली. त्यामुळे देशातील जनतेच्या प्रचंड असंतोषाचा त्यांना सामना करावा लागला. आणीबाणी उठवून त्यांनी लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा केली. तरुण तुर्क चंद्रशेखर, मोहन धारिया, कृष्णकांत यांच्यासह अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, मोरारजी देसाई, प्रा. मधु दंडवते आदींनी लोकनायक जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखाली जनता पक्ष स्थापन करून इंदिरा गांधींच्या काँग्रेसला आव्हान दिले. त्या वेळी एक वेगळीच ऊर्जा जनतेत होती. उमेदवार कोण? तो कुठून येतो? हे प्रश्नच नव्हते.

हा स्थानिक, तो परका असा कोणताही विचार कार्यकर्त्यांनी मनात आणला नव्हता. ठाणे लोकसभा मतदारसंघात साथी दत्ता ताम्हाणे हे एक ऋषितूल्य संसदपटू होते. ठाणे जिल्ह्यातील आंदोलकांचे दत्ता हे एक स्फूर्तिस्थान, प्रेरणास्थान होते. त्याच वेळी पुणे जिल्ह्यातील मावळचे आमदार म्हणून रामचंद्र काशीनाथ ऊर्फ रामभाऊ म्हाळगी हे विधिमंडळ गाजवणारे जनसंघाचे एक अभ्यासू नेते होते. पुण्याऐवजी त्यांना ठाणे मतदारसंघात उभे करण्यासाठी चर्चा सुरू झाली. वेळ कमी होता. दत्ता ताम्हाणे हे खासदार म्हणून सहज निवडून येऊ शकत होते, परंतु दत्ता ताम्हाणे यांनी आपले संपूर्ण समर्थन रामभाऊंच्या पाठीशी उभे केले. विक्रमी मताधिक्याने रामचंद्र काशीनाथ उर्फ रामभाऊ म्हाळगी हे नांगरधारी शेतकरी या चिन्हावर निवडून आले. पुण्याच्या रामभाऊंनी ठाण्याचे प्रतिनिधी म्हणून लोकसभेत आपला ठसा उमटविला. माझं भाग्य आहे की ते मला वसंतराव त्रिवेदी यांचा मुलगा म्हणून योगेश या नावाने हाक मारत असत आणि माझ्या वडिलांच्या म्हणजेच वसंतराव त्रिवेदी यांच्या ‘आहुति’ साप्ताहिकात ‘संसदेत रामभाऊ’ हे सदर आम्ही प्रसिद्ध करीत असू.

रामभाऊ म्हाळगी, रामभाऊ कापसे आणि रामभाऊ नाईक यांच्या रूपाने ठाणे जिल्ह्याला रामभाऊ नावाचे तीन खासदार मिळाले. रामभाऊ नाईक हे त्या वेळी उत्तर मुंबईचे असले, तरी त्यांच्या मतदारसंघात विभाजनपूर्व ठाणे जिल्ह्यातील वसई आणि पालघर हे भाग समाविष्ट होते. रामभाऊ म्हाळगी हे स्वतःच्या हस्ताक्षरात लोकसभेतील कामगिरी ‘आहुति’कडे पाठवीत असत. 1977 ते 1980च्या कालावधीतली त्यांची कागदपत्रे कदाचित ‘आहुति’चे संपादक गिरीश त्रिवेदी यांच्याकडे उपलब्ध होऊ शकतील. भाईंदर येथील केशवसृष्टीतील रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्या माध्यमातून विविध राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांचे प्रशिक्षण होते ही आनंदाची बाब आहे, पण याच रामभाऊंच्या सहवासात आम्ही येऊ शकलो हे अहोभाग्यच!

रामभाऊ म्हाळगी यांच्या प्रचारासाठी पाणीवाली बाई धावल्या!

कोणत्याही परिस्थितीत जनता पक्षाच्या रामभाऊ म्हाळगी यांना निवडून आणायचेच असा विडा वसंतराव त्रिवेदी, जगदीश दामले, डॉ. वि. भि. सरदार, सोमाशेठ आंग्रे, किसनराव शिंदे, लीलाताई जोशी, सुरेश पाटील, बाळकृष्ण भट आदी स्थानिक पातळीवरच्या नेत्यांनी उचलला होता. सुहास दीक्षित यांच्याकडे ध्वनिक्षेपक यंत्रणा होती. शिवसेना 1977 च्या निवडणुकीत अलिप्त होती, पण दाजी बनकर, शांताराम जाधव, आप्पा नावजेकर, अरुण व्यास, प्रकाश सुळे, अशोक वैद्य आदी सैनिकांना लोकनायक जयप्रकाश नारायण यांच्या मानसकन्या आणि पाणीवाली बाई म्हणून नावारूपाला आलेल्या  मृणालताई गोरे यांनी अंबरनाथला सभा घ्यावी असं वाटत होतं. मृणालताई आल्या तर ते अगदी सोन्याहून पिवळं ठरणार होतं. झालं, चक्रं फिरली आणि मृणालताई गोरे अंबरनाथला सभा गाजवणार हे निश्चित झालं. महिला मोर्चाच्या अध्यक्षा लीलाताई जोशी एकदम जोशात होत्याच. यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, अंबरनाथ पूर्व येथे आसमंत दणाणून सोडणार्‍या घोषणांच्या निनादात मृणालताईंची सभा कमालीची यशस्वी झाली आणि तिथेच रामभाऊ म्हाळगी यांचा विजय सुनिश्चित झाला. मृणाल गोरे आगे बढो हम तुम्हारे साथ हैं, जनता पार्टी झिंदाबाद, रामभाऊ म्हाळगी झिंदाबाद अशा घोषणा देत अंबरनाथच्या रणरागिणी लीलाताई जोशी आज 81व्या वर्षीही ठाण्याच्या आपल्या निवासस्थानी या आठवणींनी मोहरून जातात. अंबरनाथचे माजी नगराध्यक्ष प्रभाकर विठ्ठल ऊर्फ दादासाहेब नलावडे आज 90च्या घरात पुण्याला आपल्या प्रशांत या मुलाकडे वास्तव्य करून आहेत. ऑक्सिजनवर असूनही दादा  निवडणूक किस्से वाचून जुन्या स्मृती चाळवतात आणि याही परिस्थितीत ते कौतुक केल्याशिवाय राहात नाहीत. ताम्हाणे यांच्या त्यागामुळे रामभाऊंसाठी संसदेचा दरवाजा उघडला हे विसरता येणार नाही.

पस्तीस डब्यांची गाडी निघाली सारनाथला!

लोकनायक जयप्रकाश नारायण यांच्या प्रेरणेने आणि इंदिरा गांधी यांची एकछत्री राजवट उलथवून संपूर्ण क्रांती आणण्यासाठी भारतीय जनसंघ, समाजवादी पक्ष, भारतीय लोकदल आणि संघटना काँग्रेस या चार पक्षांच्या नेत्यांनी एक पक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेतला आणि त्यात काँग्रेसमधले तरुण तुर्क नेते चंद्रशेखर, कृष्णकांत आणि मोहन धारिया व त्यांचे सहकारी सहभागी झाले होते. पक्ष स्थापनेनंतरचे अधिवेशन वाराणसी जवळ सारनाथ येथे आयोजित केले होते. मुंबईहून 35 डब्यांची रेल्वे गाडी सारनाथला निघाली. वसंतराव त्रिवेदी, जगदीश दामले, मी, ठाण्याच्या शैलाताई सुळे, डोंबिवलीच्या अलकाताई नाबर, महाडचे शांताराम फिलसे, अलिबागचे दत्ताजीराव खानविलकर असे आम्ही एकाच डब्यात होतो. गप्पा, गाणी, चर्चा अशी आमची सफर सुरू होती. मुंबई जनता पक्षाचे अध्यक्ष भगवती श्रॉफ यांच्या नेतृत्वाखाली मुंबईच्या पथकाकडे भोजन व्यवस्था होती. दत्ताजी खानविलकर पेशाने वकील असल्याने एक एक किस्से ते कमालीचे सांगत असत. त्यामुळे वेळ काळ कसा जातो हे माहीत पडत नव्हते. पहाटे पहाटेपर्यंत गप्पा रंगायच्या. मी जेमतेम 20 वर्षाचा आणि सर्वांमध्ये लहान त्यामुळे, ‘योगेश, जरा हे आण रे’, ’योगेश, जरा ते आण रे’ असे प्रत्येक जण आमच्या डब्यातला कार्यकर्ता सांगत असे आणि मीसुद्धा आवडीने ते करीत असे. त्यामुळे मी प्रत्येकाच्या गळ्यातला ताईत बनलो होतो. गाडी 35 डब्यांची असल्याने ती ढुकू ढुकू चालत होती आणि एखादी मेल, एक्स्प्रेस आली की आमची गाडी बाजूला ठेवली जात होती. भुसावळला गाडी पोहोचली आणि तिथे तर धम्माल झाली. मुंबई जनता पक्षाच्या वतीने गाडीतल्या कार्यकर्त्यांना जेवण देण्यात येणार असल्याने भुसावळ स्थानकावर पंगती बसवल्या, पण गंमत काय झाली फलाटावरचे प्रवासी जेवून गेले आणि आमच्या गाडीतले बरेच जण असेच राहिले. मग ज्याला जसे जमेल तशी त्याने क्षुधा शांती केली. मजल दरमजल करीत अखेर चौथ्या दिवशी आमची 35 डब्यांची गाडी सारनाथला पोहोचली आणि पक्षाच्या अध्यक्षपदी निवडून आलेल्या चंद्रशेखर यांचे भाषण आम्ही वृत्तपत्रात वाचले, पण ती एक औरच मजा होती. नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाचे प्रा. डॉ. विलास कुमठेकर आणि त्यांचे सहकारीसुद्धा या 35 डब्यांच्या गाडीत सारनाथ येथे आले होते. एका ऊर्जेतून निर्माण झालेल्या पक्षाच्या स्थापनेचा तो इतिहास सुवर्णाक्षराने लिहून काढण्यासारखा होता. काही नतद्रष्टांमुळे ही जनता पार्टीची बोट फुटली अन्यथा देशाचे पुढचे चित्रच पालटले असते. मोरारजी देसाई यांच्यानंतर चौधरी चरणसिंग, इंद्रकुमार गुजराल, हरदणहळ्ळी दोड्डेगौडा देवेगौडा, राजा विश्वनाथ प्रतापसिंग, अटलबिहारी वाजपेयी यांची राजवट पाहिली. डॉ. मनमोहन सिंग आले. नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील बिगर काँग्रेसचे एकाच पक्षाचे बहुमताचे सरकार अनुभवले. पाहु या भविष्यात काय दडलंय ते, पण 35 डब्यांची मजा ही वेगळीच होती.

मधु आणि प्रमिलांना बाळासाहेबांचा पाठिंबा; मृणाल गोरे दंडवतेंवर संतापल्या!

भारत परीसिमन आयोगाने लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघांची पुनर्रचना करण्यापूर्वी कोकणात राजापूर आणि रत्नागिरी हे लोकसभेचे दोन मतदारसंघ होते. बॅरिस्टर नाथ पै हे राजापूरमधून समाजवादी पक्षाचे खासदार म्हणून निवडून येत असत आणि त्यांनी लोकसभेत आपला ठसा उमटविला होता. नाथ पै आणि वाजपेयी ही संसद गाजविणारी जोडी होती. अटलबिहारी वाजपेयी आणि बॅरिस्टर नाथ पै बोलायला उभे राहिले की पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू हे सभागृहात आवर्जून उपस्थित राहत असत. प्रा. मधू दंडवते हे नाथ पै यांचे खरे वारसदार होते. प्रा. मधू दंडवते हे राजापूरमधून लोकसभेवर निवडून येत. प्रा. दंडवते यांच्या पत्नी समाजवादी नेत्या प्रमिलाताई दंडवते या दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढवीत होत्या. राजापुरात प्रा. मधू दंडवते आणि दक्षिण मध्य मुंबईत प्रमिलाताई या दंडवते दाम्पत्याला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी पाठिंबा दिला. एरवी समाजवादी आणि शिवसेना म्हणजे विळ्याभोपळ्याचं सख्य. शिवसेनेवर समाजवादी टीका करणार आणि समाजवाद्यांना शिवसेना हिणविणार असं चित्र. तरी 1968 साली दंडवते आणि बाळासाहेब यांनी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत युती केली होती. दंडवते आणि बाळासाहेबांच्या मित्रत्वामुळे मृणाल गोरे या चिडत असत आणि यामुळेच जेव्हा राजापूर आणि दक्षिण मध्य मुंबईत बाळासाहेब ठाकरे यांनी मधू आणि प्रमिलाताई या दंडवते पती-पत्नींना समर्थन दिले तेव्हा, नानांनी (मधू दंडवते यांना जवळची मंडळी नाना म्हणत असत) स्वतःचा स्वार्थ बरोबर पाहिला आणि शिवसेनेचा पाठिंबा बरोब्बर पदरात पाडून घेतला, अशा शब्दांत मृणालताई गोरे यांनी आपला संताप व्यक्त केला. समाजवादी आणि शिवसेना यांच्यात जरी वैमनस्य वाटत असलं, तरी हे दोन्ही तेवढेच एकमेकांच्या जवळ असत. 1955 साली श्याम नावाने प्रकाश मोहाडीकर आणि बाळासाहेब ठाकरे नियतकालिक चालवीत असत आणि बाळासाहेब त्यात व्यंगचित्र रेखाटत असत. संयुक्त महाराष्ट्र लढ्यात दिनू रणदिवे आणि अशोक पडबिद्री हे संयुक्त महाराष्ट्र पत्रिका प्रकाशित करीत. तेव्हा त्याचा मुख्य मथळा प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे हे देत आणि बाळासाहेब ठाकरे हे मावळा या नावाने व्यंगचित्र विनामूल्य देत असत. गोरेगाव येथेही समाजवादी आणि शिवसेना या दोघाचं कधी जमलं नाही, परंतु गोरेगाव पूर्व पश्चिम जोडणार्‍या उड्डाण पुलाला मृणालताई गोरे उड्डाणपूल हे नाव देण्यासाठी शिवसेनेने मुंबई महापालिकेत प्रस्ताव मांडला आणि तो मंजूर करून समारंभपूर्वक नामकरण सुद्धा करण्यात आले. समाजवादी विचारधारेची राष्ट्र सेवा दलाच्या शाखांमध्ये शिकवण देण्यात येत असे आणि या राष्ट्र सेवा दलातूनच प्रमोद नवलकर, दत्ताजी नलावडे, साबिरभाई शेख  यांनी बाळासाहेबांच्या खांद्याला खांदा लावून शिवसेनेच्या बांधणीत ‘वाघा’चा वाटा उचलला. शिवसेनेसाठी प्रचाराची रणधुमाळी गाजविणारे दादा कोंडके हेही राष्ट्र सेवा दलाचेच. सेवा दलाचे अनेक सैनिक हे शिवसैनिक झाले.

पडलो तर पडलो, भित्तीवर नांव तर रवलो?

तिरुनेल्लरी नारायण अय्यर शेषन म्हणजेच टी. एन. शेषन हे भारतात एक कर्तव्यकठोर प्रशासकीय अधिकारी होऊन गेले. सध्या ते विजनवासात आहेत. भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून शेषन यांनी 1990 ते 1996 या कालावधीत काम पाहिले. अहो, पाहिले म्हणजे काय त्यांनी संपूर्ण निवडणूक आयोगाचा चेहरा मोहराच बदलून टाकला. निवडणूक आयोग म्हणजे काय हे संपूर्ण देशवासीयांना शेषन यांनी दाखवून दिले. त्यांना कायदे बनवायचा अधिकार होता का? नाही, पण देशाच्या कायदेमंडळाने तयार केलेल्या कायद्याची काटेकोर अंमलबजावणी त्यांनी केली. त्यामुळेच निवडणूक आयोग म्हटला की टी. एन. शेषन आणि शेषन म्हणजे निवडणूक आयोग असे म्हटले जाते. शेषन यांच्या काळापासून भिंती रंगविण्याचे प्रकार कमी झाले. जवळ जवळ नाहीच म्हटले तरी चालेल, पण त्याआधी निवडणुकीत भिंती रंगविण्याचे प्रकार सर्रासपणे चालत होते. आम्हीसुद्धा भिंती रंगविल्या आहेत. साजूक तुपात नाजूक चमचा, *** उमेदवार आमचा! निवडून निवडून येणार कोण? *** शिवाय आहेच कोण? अशा असंख्य घोषणा आम्ही भिंतीवर रंगवीत असू. निवडणुकीत अपक्ष उमेदवार मोठ्या प्रमाणावर उभे असतात. या अपक्ष उमेदवारांची निवडून येण्याची संख्या फार कमी असते. या संदर्भात एकदा ज्येष्ठ समाजवादी नेते, माजी केंद्रीय मंत्री प्रा. मधू दंडवते यांना एकदा प्रश्न विचारण्यात आला की, नाना, हे अपक्ष उमेदवार निवडून येत नाहीत तरीही ते निवडणूक का लढवितात? नानांनी फार मिश्कीलपणे या प्रश्नाचे उत्तर दिले. नाना म्हणाले, आपल्या कोकणात एक म्हण आहे, काय? पडलो तर पडलो, भित्तीवर नांव तर रवलो!

आपण निवडून येणार नाही हे त्या अपक्ष उमेदवाराला पक्कं माहीत असतं, पण तरीही तो उभा राहतो. कारण एकदा भिंतीवर नाव रंगवलं की ते पार वर्षानुवर्षे तसंच राहतं आणि आपली प्रसिद्धी होते. फार कमी अपक्ष उमेदवार आहेत की जे निवडून येऊ शकतात. आतासुद्धा आपल्याला ग्रामीण भागात जुन्या रंगविलेल्या भिंती दिसतात. या भिंती पण रंगवण्यात मजा असते आणि त्यात म्हणींचा वापर पण कौशल्याने करण्यात येत होता. आता ती मजा गेली. भिंत विद्रुपीकरण करण्यात आल्याबद्दल दंड फटकारण्यात येतो. भिंत ज्या मालकाची आहे त्याची परवानगी घ्यावी लागते. आदर्श आचारसंहिता शेषन यांनी लागू केली, तेव्हापासून सारी समीकरणे बदलली आहेत. आचारसंहिता ही चांगली आहे, पण तिचा बाऊ करणे, तिचा बागुलबुवा करून कामात टाळाटाळ करणे, असले प्रकार होता कामा नयेत. आचारसंहिता कशासाठी आहे? कुणासाठी आहे? या आचारसंहितेचा उपयोग कुणी, कसा करावा, यासंदर्भात प्रशिक्षण देण्याची गरज आहे. निवडणूक आयोगाने, ’काय करावे, काय करु नये’, याबद्दल साहित्य प्रकाशित केले आहे, त्याची सर्वांनीच नोंद घेण्याची गरज आहे.

-योगेश त्रिवेदी, मंत्रालय प्रहर

Check Also

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते क्रीडा आणि व्यक्तिमत्व विकास स्पर्धेचे उद्घाटन

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल पंचायत समिती शिक्षण विभागाच्या वतीने तालुकास्तरीय क्रीडा आणि व्यक्तिमत्व विकास …

Leave a Reply