Breaking News

कर्तव्य

देशात शांततेच्या काळात सैनिक लढाई खेरीज अन्य कामे ही करतात. पूरग्रस्त स्थिती असल्यास, देशावर एखादे अस्मानी संकट वा वादळवारा किंवा आपत्कालीन परिस्थिती असल्यास प्रथम पाचारण केले जाते ते सैनिकाला. देशाची सीमा सांभाळणार्‍या सैनिकावर जेवढा विश्वास टाकला जातो तेवढा क्वचितच सरंक्षणासाठी तैनात असणार्‍या शासकीय सेवेतील कर्मचार्‍यावर टाकले जाते. त्यांच्यात  प्रामाणिकपणा, देश सेवा अगदी ठासून भरली असते.  सैनिक नुसते ड्युटीवर असतानाच आपली कामगिरी बजावतात असे नाही, तर रजेवर असताना आपल्या प्रपंचात रमले असतानाही एखादी अघटीत घटना घडत असेल, तर प्रसंगी प्राणाची बाजी लावून दुसर्‍याचे प्राण वाचवण्याचा शर्थीचा प्रयत्न करीत असतात.

सैनिकांमध्ये नौदल सैनिक, पायदळ सैनिक, हत्तीवरचे सैनिक, अश्व दलाचे सैनिक, उंटावरचे सैनिक, रणगाड्यावरचे सैनिक आणि विमान दलावरील सैनिक असे प्रकार असतात, तसेच भालाधारी, धनुर्धारी, चक्रधारी,  गदाधारी, तलवाधारी, कुकरीधारी, बंदूक व मशीनगनधारी सैनिक असतात. रायगडातील महाड तालुक्यातील फौजी आंबवडे या गावाला जशी वारकरी संप्रदाय परंपरा  व कलेची संकृती आहे, तशीच देशात सैनिकांचे गाव म्हणून ओळख आहे. 1914च्या जागतिक पहिल्या महायुद्धात या गावातील 111 सैनिक सहभागी झाले होते. पैकी 6 जणांना वीरमरण आले,  तर 1939 ते 1942च्या दुसर्‍या महायुद्धात सहभागी झालेले तबल 21 सैनिक एकाच दिवशी शहीद झाले. सैनिकाच्या मनात शिस्त, आदरभाव व देश सेवा, समाजसेवा हे गुण अंगात भिनलेले असतात. याचा प्रत्यय येणारी घटना सध्या चर्चेत आहे.

केरळातील वायपीन बिच, दुपारची ऊन उतरण्याची वेळ, साधारणपणे 4 वाजून 10 मिनिटे झाली असतील. पर्यटकांचा आवडता समुद्र किनारा. असल्याने बर्‍यापैकी गजबजलेला बिच… लेफ्टनंट राहुल दलाल हे भारतीय नौदलातून रजेवर आलेले आणि आपल्या पत्नीसह केरळ फिरायला आलेले, बीचवर फिरत होते, मात्र हौसमौज सुरू असतानाच राहुल यांना अगदी हाकेच्या अंतरावर चाललेला आरडाओरडा आणि घाबराघुबरा गलका कानावर आला. राहुल धावतच घटनास्थळी पोहचले असता. झाला प्रकार लक्षात आला. किनार्‍यावरील एक महिला आणि पर्यटक ओहोटीमुळे प्रचंड वेगाने आत ओढल्या जाणार्‍या समुद्राकडे हातवारे करून मदतीसाठी आरडाओरडा करत होते. राहुल दलाल यांनी निरीक्षण केले असता, समुद्राच्या किनार्‍याच्या काही अंतर आत जिवाच्या आकांताने हातपाय मारत ओहोटीच्या पाण्याशी जगण्याचा संघर्ष करणारा आणि वेगाने समुद्रात ओढला जाणारा एक जाडजूड माणूस त्यांनी पहिला, तर किनार्‍यावरील पर्यटकांना ओहोटीच्या पाण्याच्या जोरदार ओढीमुळे या आणीबाणीच्या वेळी इच्छा असूनही काहीच करता येणे शक्य नव्हते. क्षणाचाही कुठलाही विचार न करता राहुल दलाल यांनी पत्नीला इशारा करीत चपला किनार्‍यावर भिरकावून दिल्या आणि धावतच खवळलेल्या समुद्राच्या  ओहोटीच्या पाण्यात सूर मारला. जोरजोरात हातपाय मारत ओहोटीच्या खेचल्या जाणार्‍या पाण्यामुळे पुढल्या 3-4 मिनिटांतच दलाल त्या घाबरून बुडणार्‍या माणसाच्या जवळ पोहचले. ओहोटीच्या पाण्यामुळे वेगात समुद्रात खेचत गेलेला इसम जवळपास बेशुद्धावस्थेत होता.त्यानेही जीवाची अशा सोडली होती. अशाही  स्थितीत दलाल यांनी इसमाला धीर देत, पकडून खांद्यावर थोपटत थोपटत शांत केले. खांद्याला घट्ट पकडून ठेवायला समजावून सांगत, उलट फिरून किनार्‍याच्या दिशेने परतायला सुरुवात केली.

पाण्याच्या मार्‍यामुळे तो माणूस दलाल यांच्या हातातून बर्‍याच वेळा सुटत होता, मात्र पाण्याशी संघर्ष करून दलाल त्या जाडजूड माणसाला पुन्हा ताब्यात घेऊन किनार्‍यावर परतण्याची पराकाष्ठा करीत होते. दलाल तरबेज पोहणारे होते. जीव वाचवण्यासाठी आवश्यक असणार्‍या नौदलाच्या सर्व टेक्निक्सचा चांगला अभ्यास असूनसुद्धा ओहोटीच्या जोरदार करंट्समुळे इसमाला  पाठीवर घेऊन समुद्रकिनार्‍यावर पोहोचणे हे दोघांच्याही जीवावर बेतू शकले असते याची जाणीव दलाल यांना होती. एव्हाना ओहोटीचा वेग आणि जोर वाढला होता आणि त्यामुळे आत ओढल्या जाणार्‍या त्या समुद्राच्या खवळलेल्या पाण्याशी प्रचंड ताकदीने संघर्ष करत तब्बल 20 मिनिटांनंतर दलाल त्या इसमाला सोबत घेऊन उथळ पाण्यापर्यंत पोहोचले. ही 20 मिनिटे अशक्य अवघड होती. कारण त्या माणसापर्यंत पोहचायला लेफ्टनंट राहुल दलाल यांना फक्त 3 मिनिटे लागली, तेच अंतर कापून ओहोटीच्या पाण्यात किनार्‍यावर परतण्याचे दिव्य पार पाडणार्‍या दलाल यांना मात्र तब्बल 20 मिनिटे लागली होती. जोरदार खवळलेला समुद्र असल्याने बर्‍याच वेळा तो गांगरलेला माणूस दलाल यांच्या हातातून सरकत होता, त्याला परत पकडून ओहोटीच्या पाण्याच्या विरुद्ध पोहत किनार्‍यावर येण्याचे अग्निदिव्य लेफ्टनंट दलाल यांनी शेवटी पार पाडलेच.

किनार्‍यावर दाखल होताच  जवळपास बेशुद्ध झालेल्या इसमाला राहुल यांनी जमिनीवर झोपवले. त्या इसमाचा श्वास कोंडत  असल्याचे दलाल यांच्या लक्षात आले. बेशुद्ध व्यक्तीचे तोंड उघडले असता घशात समुद्री वनस्पती अडकल्याने श्वासोच्छवास सुरू करण्यासाठी राहुल यांनी घशात अडकलेल्या वनस्पती काढून टाकल्या, नंतर त्याच्या पोटातून पाणी काढून टाकण्याच्या शास्त्रीय गोष्टी करून सोबतच लगेचच धाडसाने जवळपास थंडावलेले हृदय सुरू करण्यासाठी दिला जाणारा शास्त्रोक्त उझठ सुद्धा दिला.

शुद्धीवर आलेल्या दिलीप कुमार औरंगाबाद महाराष्ट्र यांनी, त्यांच्या पत्नीने आणि किनार्‍यावर पर्यटकांनी, तसेच जमावाने लेफ्टनंट राहुल दलाल या देवदूताला आनंदाने डोक्यावर घेत नाचवू लागले, तर दिलीप कुमार व त्याच्या पत्नीने देवाचे दर्शन झाल्याचा आनंद व्यक्त केला. केवळ ड्युटीवर असतानाच नव्हे, तर ड्युटीवर नसताना सुद्धा ज्या सामाजिक जाणिवेतून एका सैनिकाची जी अत्युच्च दर्जाची कर्तव्यनिष्ठा लेफ्टनंट राहुल दलाल यांनी प्रदर्शित केली त्याबद्दल लेफ्टनंट राहुल दलाल यांच्या शौर्याचा देशाने सन्मान केला पाहिजे.

तसेच स्वतःच्या जीवाचा जरासुद्धा विचार न करता प्राण पणाला लावून देशवासीयांच्या रक्षणासाठी झोकून देणारे लढवय्ये सैनिक निर्माण करणार्‍या भारतीय आरमाराच्या कर्तव्यनिष्ठेला देशाच्या नागरिकांनी सलाम केलाच पाहिजे. मागील वर्षात भारतीय नेव्हीने केरळमध्ये पुराने मृत्यूचे तांडव घातले असताना जीवावर उदार होऊन हजारो जणांचे प्राण वाचवले होते अशा सैनिकांना देशातील जनतेचे लाख लाख सलाम. देशाची सीमा सुरक्षित ठेवणार्‍या सैनिकांना राष्ट्रीय दिनी सन्मानित करणे, त्यांचा गौरव करणे, वीर पत्नींचा सन्मान करणे, शहीद सैनिकांचे स्मरण करणे हे आवश्यकच आहे, मात्र देशाचे नागरिक म्हणून जबाबदार नागरिक होणे, योजनांची अंमलबजावणी करणे, तसेच विविध राबविलेल्या योजनांचे नागरिकांनी पालन करणे आवश्यक आहे.

-अरूण नलावडे, फिरस्ती

Check Also

हिंसेला अटकाव हवा

केरळमध्ये स्फोट झाल्याची बातमी रविवारी सकाळी अकस्मात येताच दक्षिणेत हिंसक कारवायांनी डोके वर काढल्याबद्दलची चिंता …

Leave a Reply