महाविकास आघाडी सरकारची तळी उचलणारी काही मंडळी आहेत. त्यांनी फडणवीस-दरेकर यांच्याविरोधात खोट्यानाट्या कंड्या पिकवल्या. ही मंडळी म्हणजे एक प्रकारची फेक नॅरेटिव्ह गँग आहे आणि भाजपचे नेते त्यांना पुरेपूर ओळखून आहेत. दुर्दैवाने विचारशील असूनही रिबेरोसाहेबांना मात्र या फेक नॅरेटिव्ह गँगबद्दल काहीच कल्पना नसावी! म्हणूनच त्यांनी वृत्तपत्रात लेख लिहून फडणवीस यांच्यावर तोंडसुख घेतले. त्याला सडेतोड उत्तर देण्यासाठी फडणवीस यांनी त्याच वृत्तपत्रात लेख लिहून विरोधकांची तोंडे गप्प केली आहेत.
दांभिक राजकारणाला सडेतोड उत्तर मिळाले की राजकारणातला हिशेब पुरा होतो असे सर्वसाधारणत: मानले जाते, किंबहुना अशा प्रकारच्या खोट्यानाट्या प्रचारकी राजकारणाचा सणसणीत प्रतिवाद करावा अशी खुमखुमी बर्याच लोकांमध्ये असते. त्याचे प्रत्यंतर आपण व्हॉट्सअॅप किंवा फेसबुकवर रंगणार्या वादविवादांमध्ये घेतच असतो. एकाने प्रचारकी पोस्ट टाकली की विरुद्ध मतवाल्यांचा हल्लाबोल सुरू होतो. राजकारणातदेखील असेच प्रकार घडत असतात. तथापि, दांभिक प्रचाराला बळी पडून कोणी सुज्ञ व्यक्ती चुकीच्या मतांचे प्रदर्शन करू लागली तर सुजाणांना मनस्वी दु:ख होते. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त आणि राष्ट्रीय पातळीवर गाजलेले विचारशील व जागरूक निवृत्त अधिकारी ज्युलिओ रिबेरो यांनी एका इंग्रजी वृत्तपत्रात लेख लिहून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. अलीकडेच रेमडेसिवीर इंजेक्शनच्या पुरवठ्यावरून जे राजकारण रंगले होते त्याची पार्श्वभूमी रिबेरो यांच्या टीका-टिप्पणीला आहे. ब्रुक फार्मा नावाच्या औषध कंपनीकडे रेमडेसिवीरचा साठा होता व तो महाराष्ट्र सरकारच्या ताब्यात देण्याची त्यांची इच्छाही होती. त्यांची चूक एवढीच की या सत्पात्री दानासाठी त्यांनी भारतीय जनता पक्षाचे साहाय्य घेतले. रेमडेसिवीरचा हा साठा महाराष्ट्राच्या आरोग्यव्यवस्थेसाठीच होता. भाजपच्या नेत्यांकडे तो सुपुर्द झाला असता तरीही त्याचा उपयोग महाराष्ट्राच्या जनतेसाठीच होणार होता, परंतु याबाबत गलिच्छ राजकारण करण्यात आले. कुण्या मंत्र्याच्या पीएने ब्रुक फार्मा कंपनीच्या संचालकांना थेट फोन करून दमदाटी केली. सरकारसाठी असलेला औषधांचा साठा विरोधी पक्षाकडे कसा देता, असा सवाल त्यांना करण्यात आला. इतकेच नव्हे तर त्यांच्या घरी पोलीस पाठवून दरडावण्यात आले. त्यांचा फोनदेखील जप्त करण्यात आला. हे सारे दहशतनाट्य सुरू असतानाच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर हे दोघे अन्य भाजप नेत्यांसह बीकेसी पोलीस ठाण्यात थडकले. त्यांनी पोलिसांना फैलावर घेताच नरमाईचे धोरण स्वीकारत पोलिसांनी ब्रुक फार्मा कंपनीच्या प्रमुखांना घरी जाऊ दिले. वास्तविक हा सारा व्यवहार पूर्णत: कायदेशीर होता व त्यास अन्न व औषध प्रशासन विभागाची मंजुरी होती. अन्न व औषध प्रशासनमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनीदेखील या व्यवहारास दुजोरा दिला होता. आता फडणवीस यांच्या या संदर्भातील नम्र, मुद्देसूद आणि प्रामाणिक उत्तरामुळे रिबेरो यांचे मतपरिवर्तन होईल अशी आशा आहे. राजकारणाची फेकाफेकी फक्त समाजमाध्यमांपुरतीच मर्यादित नाही. ती खर्याखुर्या राजकारणातदेखील चालू असते आणि रिबेरो यांच्यासारखे सुजाण व विचारशील नागरिक त्याला अधूनमधून बळीदेखील पडत असतात, एवढाच या सार्या प्रकरणाचा अर्थ आहे. यानंतर तरी असे गलिच्छ राजकारण थांबेल असे म्हणावयास मात्र जीभ धजत नाही.