विकलांग तरुणाची टपरी भाजप युवामोर्चाने उभारली
महाड : प्रतिनिधी
महापुरात महाडमध्ये कोणाचेच काही वाचले नाही. येथील एका विकलांग युवकाच्या उपजीविकेचे साधन असणारी टपरीही वाहून गेली. भाजप युवामोर्चाचे जिल्हाध्यक्ष अमित घाग यांनी ही टपरी पुन्हा उभी करुन या युवकाला मदतीचा हात दिला आहे.
सर्वांचे सर्वतोपरी नुकसान करणार्या महाडच्या महापूरात विकलांग युवक भारत मेहता यांची छत्रपती शिवाजी महाराज चौकातील टपरी वाहून गेली होती. ही घटना भाजप युवामोर्चाचे जिल्हाध्यक्ष अमित घाग यांना समजताच त्यांनी युवामोर्चाच्या कार्यकर्त्यांना घेऊन ही टपरी सिमेंटचे फाऊंडेशन करुन पुन्हा उभी करुन दिली. नुसती उभीच केली नाही तर त्या टपरीची सजावट करून तिला सुंदर स्वरूप प्राप्त करून दिले आणि टपरीतील सर्व सामानही भरुन दिले. घाग यांच्या या मदतीने सदर युवकाचा व्यवसाय पुन्हा सुरू झाला असून महाडमधील नागरिकांकडून भाजप युवामोर्चाचे कौतुक होत आहे.