नागरिकांना सतर्कतेचा इशारा; जुना पूल वाहतुकीस बंद
रोहे : प्रतिनिधी
रोहा शहरासह ग्रामीण भागात पावसाने तीन दिवस हजेरी लावल्याने कुंडलिकेच्या पात्रातील पाणी वाढले आहे. त्यामुळे बुधवारी कुंडलिका नदी तुंडब भरुन वाहत होती. नागरीकांनी काळजी घ्यावी यासाठी रोहा अष्टमी नगरपरिषदेच्या वतीने सावधानतेचा इशारा देण्यात आला. दरम्यान, बुधवारी दुपारी जुन्या रोहा अष्टमी पुलाला पाणी लागल्याने रोहा अष्टमी जुना पुल वाहतुकीस बंद करण्यात आला. त्यामुळे संपूर्ण वाहतूक नवीन पुलावरून चालू होती. दरम्यान, धोकदायकस्थिती लक्षात घेऊन रोहा पोलीस, नगरपरिषद कर्मचारी तैनात करण्यात आले होते. नगरपरिषद मुख्याधिकारी धीरज चव्हाण यांनी रोहा अष्टमी शहरासह पुलाची पाहणी केली. यावेळी नगर परिषद अधिकारी निवास पाटील होते. दरम्यान, रोहा शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात पावसाने जुलै महिन्यात जोरदार हजेरी लावली. गेले तीन दिवस रोहा शहरासह तालुक्यातील मेढा, धामणसई, चणेरा, यशवंतखार, भातसई, घोसाळे, भालगाव, धाटाव, खांब, कोलाड, सुतारवाडी परीसरात पावसाने जोरदार हजेरी लावली. समाधानकारक पावसामुळे शेतकरी सुखावला आहे. शेतीच्या कामांना वेग आला आहे. तालुक्यात पाऊस मुसळधार पडत असल्याने डोंगर माथ्यावरील नदी-नाले भरुन वाहत आहे. हे पाणी थेट कुंडलिका नदीच्या पात्रात येत असल्याने कुंडलिका नदी तुंडूब भरुन वाहत आहे. बुधवारी नदीच्या पात्रातील पाणी वाढत असल्याने रोहा व अष्टमीकरांना नगरपरीषदेच्या वतीने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
कुंडलिका नदीचे पाणी वाढल्याने नागरीकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला. खबरदारी म्हणून शाळा सोडण्यात आल्या. नगरपरिषद पावसावर बारीक लक्ष ठेवून आहे. नागरिकांनी काळजी घ्यावी.
-धीरज चव्हाण, मुख्याधिकारी, न.प. रोहा