लसीकरणासाठी नागरिकांची दमछाक; सुधागडात मध्यरात्रीपासून प्राथमिक आरोग्य केंद्राबाहेर गर्दी

पाली : प्रतिनिधी

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वत्र लसीकरण मोहीम राबविली जात आहे, मात्र नियोजना अभावी सुधागड तालुक्यात लस मिळविता मिळविता नागरिकांची पुरती दमछाक होत असल्याने रोगापेक्षा इलाज भयंकर असल्याचे संतापाने बोलले जात आहे. सुधागड तालुक्यात पाली व जांभूळपाडा प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरण केले जात आहे. पहिल्या आलेल्या 80 लोकांना टोकन दिले जाते. हे टोकन मिळविण्यासाठी मध्यरात्री 12 वाजल्यापासून लोक केंद्राबाहेर गर्दी करत आहेत. तरीही टोकन न मिळाल्याने  अनेकांना पुन्हा यावे लागत आहे. या प्रक्रियेत नियोजन व इतर बाबींसंदर्भात त्रुटी असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. पाली व जांभूळपाडा या दोन्ही ठिकाणी प्रत्येकी 100 जणांना म्हणजे एकूण 200 जणांना लस दिली जाते. 200 पैकी 40 डोस फ्रंटलाईन वर्कर्ससाठी राखीव ठेवले जातात. उर्वरित 160 डोस सर्वसामान्य लोकांसाठी असतात. लोकसंख्येच्या तुलनेत ही संख्या खूप कमी असल्याने नागरिकांची गैरसोय होते. 45 ते 60 वयोगटातील नागरिकांना लस देताना प्रशासनाची कसरत पाहून 18 वयोगटातील लसीकरण मोहिमेचे काय होणार, हा प्रश्न जनतेला पडला आहे. पाली प्राथमिक आरोग्य केंद्रात सकाळी 7 वा. टोकन देण्यात येतात. त्यासाठी नंबर लावण्याकरिता पहाटे 5 वाजता गेलो असता पहाटे 3 वाजताच 80 लोकांची नावे घेऊन कोटा पूर्ण केला गेला होता, असा अनुभव पालीतील शाम खंडागळे यांनी सांगितला. ओळखीच्या माणसांना आधीच कूपनचे वाटप केले जाते. मग लवकर येऊन रांगेत उभे राहिलेल्यांचा काय फायदा? याबाबत योग्य नियोजन केले पाहिजे, असे  अमित निंबाळकर यांनी सांगितले. तर ऋषी झा म्हणाले की, खेडेगावातून येणार्‍या लोकांची प्रामुख्याने वृद्धांची खूप गैरसोय होते.

टोकन घेण्यासाठी केंद्रामध्ये गर्दी होत असल्याने कोरोनाचा प्रसार होण्याची भीती आहे. आलेल्या सर्व लोकांना टोकन देऊन त्यांना लसीकरणाच्या तारखा दिल्या पाहिजेत. लसीकरणासाठी योग्य नियोजन करावे.

-बशीर परबलकर, सामाजिक कार्यकर्ते, पाली

ग्रामीण भागातील लोकांची गैरसोय होऊ नये म्हणून गावनिहाय टोकन देण्याची व्यवस्था करण्याचा प्रयत्न आहे. तसेच लसीकरण सुरळीत व्हावे व लोकांची गैरसोय थांबावी यासाठी अ‍ॅक्शन प्लॅन करत आहोत.

-दिलीप रायण्णावार, तहसीलदार, पाली-सुधागड

टोकन वाटप संदर्भात योग्य पारदर्शकता बाळगली जात आहे. सकाळी 6 वाजता टोकन देऊन आधार कार्ड नंबर व रजिस्टरवर नोंद केली जाईल. यापुढे एका व्यक्तीला एकच टोकन दिले जाणार आहे. लोकांना कळले की आता नंबर लागणार नाही तर ते गर्दी करत नाहीत निघून जातात व पुन्हा येतात.

डॉ. शशिकांत मढवी,  तालुका वैद्यकीय अधिकारी सुधागड.

Check Also

Perish Arten bei Freispielen existieren in Moglich Casinos?

Neue Casinos via Freespins abzuglich Einzahlung Der ihr Hauptvorteile beim Zum besten geben in virtuellen …

Leave a Reply