कचरा ही समस्या नसून धनसंपत्ती आहे हे शासनाचे रिसोर्स पर्सन रामदास कोकरे यांनी सिद्ध करून दाखविले आहे. त्यामुळे कचरा हा विषय आंतरराष्ट्रीय स्तरावर संशोधनाचा विषय बनविला आहे. देशातील आणि जगातील अनेक विद्यार्थ्यांनी पीएचडीसाठी कचराशून्य डम्पिंग ग्राऊंड हा विषय निवडला आहे. त्यात ब्रिटनमधील जॉर्जिना बोनी ही विद्यार्थिनीदेखील आहे. दापोली प्लास्टिक मॉडेलवर मुंबई विद्यापीठाच्या पर्यावरण विभागाच्या दोन विद्यार्थ्यांनी पीएचडीसाठी विषय निश्चित केला आहे. त्याच वेळी वेंगुर्ले कचराशून्य डेपोवर
ब्रिटनमधील लीड्स विद्यापीठामध्ये एका विद्यार्थिनीकडून पीएचडी केली जात आहे. वेंगुर्ले पॅटर्नवर पुणे विद्यापीठात 15 विद्यार्थ्यांकडून पीएचडी केली जात आहे, तर अभियांत्रिकी महाविद्यालयातील 50 विद्यार्थ्यांकडून मॉडेल तयार केली जात आहेत. कचराशून्य कर्जत या प्रकल्पावर पुणे विद्यापीठाच्या एका विद्यार्थिनीकडून एमएस्सीसाठी अहवाल तयार केला जात आहे, तर कर्जत प्रकल्पावर कोचिनच्या सेंट्रल मरीन फिशरीज इन्स्टिट्यूटमध्ये रिसर्च सादर झाला आहे. युनायटेड नॅशनल डेव्हलपमेंट प्रोग्रॅम या संकेतस्थळावर सर्व प्रकल्पांची माहिती मिळत असून राजपत्रित अधिकार्यांसाठी असलेल्या एमपीएससी 2016च्या परीक्षेत कचराशून्यबद्दल प्रश्न आला होता. आता तर कचरा हा प्रबंधाचा विषय बनला आहे.
कचर्यापासून वीजनिर्मिती, तर प्लास्टिकपासून वेंगुर्ले नगर परिषदेत सुमारे 15 किलोमीटरचे डांबरी रस्ते तयार केले. येथेसुद्धा तो उपक्रम शक्य आहे. पोलीस खात्यात असल्याने कुणालाही न घाबरता रात्रंदिवस काम करण्याची सवय आहे. त्यामुळे ज्या ज्या ठिकाणी माझी नियुक्ती झाली त्या त्या ठिकाणी मी लोकसहभागाने माझ्या पद्धतीने काम करून यशस्वी केले. कुणीतरी सुरुवात करावी लागते, नंतर आपोआप सहभाग मिळतो. तुमचे यश ठामपणावर अवलंबून आहे. कचर्याकडे संधी म्हणून पाहा. घनकचरा साधनसंपत्ती आहे. घनकचरा केंद्रबिंदू मानून काम सुरू केले आहे. कचर्याचे वर्गीकरण करणे गरजेचे आहे. ओला, सुका कचरा, प्लास्टिक, काच, धातू असे कचर्याचे 27 प्रकार आहेत. प्लास्टिकचे विघटन कुठेही होत नाही. अगदी समुद्रातसुद्धा नाही. कॅरीबॅगमध्ये कचरा बांधून दिल्यास कॅरीबॅगबरोबरच कचर्याचे विघटनसुद्धा होत नाही. स्वच्छता साक्षरता वाढविण्याची गरज आहे, असे सांगून वीजनिर्मिती, खतनिर्मिती, प्लास्टिकवर प्रक्रिया करून डांबरी रस्ते निर्मितीला चालना देण्यात येईल. पहिल्या तीन महिन्यांत कर्जत शहरच नव्हे, तर डम्पिंग ग्राऊंडदेखील त्यांनी कचरामुक्त आणि कचराशून्य केले आहे.
कोकणातील वेंगुर्ले शहर आज सर्व पद्धतीच्या कचर्याचे विघटन आणि त्यातून वापरयोग्य तसेच काही उत्पन्न देणार्या वस्तू निर्माण करणारी नगरपालिका बनली आहे. त्यामुळे या शहराने प्रत्यक्षात आणलेली शून्य कचरा ही संकल्पना आता राज्यातच नाही, तर देशातदेखील चर्चेचा विषय बनली आहे. त्यापुढे जात युनायटेड स्टेटचे पथक शून्य कचरा संकल्पना समजून घेण्यासाठी वेंगुर्ले येथे येऊन गेले आहे. हे सर्व शक्य करणार्या कोकरे यांनी स्वच्छतेबाबत फार मागे असलेल्या कर्जत शहरात आल्यानंतर अल्पावाधीत प्रसंगी पोलीस दलाकडून कारवाई करीत कचर्याची वर्गीकरण पद्धती प्रत्यक्षात आणली. वेंगुर्लेमध्ये आज वेगवेगळ्या 27 प्रकारे कचर्याचे वर्गीकरण केले जाते, मात्र कर्जतमध्ये तर तब्बल 36 प्रकारे विविध प्रकारच्या कचर्याचे वर्गीकरण केले जाते. कचरा डम्पिंग ग्राऊंडवर जाताना अशा प्रकारे वर्गीकरण होणारी कर्जत ही पहिली नगरपालिका ठरली आहे.तर राज्यातील नगराध्यक्ष आणि सहकारी मुख्याधिकार्यांना शून्य कचरा संकल्पना समजून देताना आपण सर्व शहरांना भेटी देऊन त्या त्या शहरातील कचर्याचे स्वरूप आणि त्यांचे प्रश्न घेतले. शहराचे कचरा डेपो कचराशून्य करण्याचे प्रयत्न केले होते. जिल्ह्यातील काही समुद्रकिनारी असलेल्या आणि पर्यटनावर अवलंबून असलेल्या नगरपालिकांनी प्लास्टिक बंदीपासून ओला-सुका कचरा वेगळा करण्याचे प्रयोग यापूर्वीच यशस्वी केले आहेत, मात्र त्याचबरोबर जिल्ह्यातील सर्व शहरे कचराशून्य होण्यासाठी आता प्रयत्न केले जाणार आहेत. नगरविकास विभागाचे उपसचिव दर्जा असलेले रायगडचे तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी जिल्ह्यातील शहरे कचराशून्य करण्यासाठी राज्याचे रिसोर्स पर्सन असलेले मुख्याधिकारी रामदास कोकरे यांना सर्व स्वातंत्र्य दिले होते. त्यामुळे रायगड जिल्ह्यात शहरात आणि ग्रामीण भागातील क्षेपणभूमी या कचराशून्य डेपो बनल्या आहेत.
राज्य सरकारचे रिसोर्स पर्सन रामदास कोकरे यांनी दापोली, वेंगुर्लेनंतर कर्जत पालिकेत कचर्याची समस्या सोडविण्यास भर दिला. अल्पावधीत कर्जतकर नागरिकांच्या पाठबळावर आणि सहकार्याने कर्जत नगरपालिकेच्या डम्पिंग ग्राऊंडवर कचरा राहिला नाही. वर्गीकरण करून आलेला कचरा पुढे डम्पिंग ग्राऊंडवर वेगळा ठेवला. त्यातील प्लास्टिक कचरा ही समस्या तेथे तत्काळ सोडविली गेली आहे. प्लास्टिक कचरा विकत घेणारी माणसे कर्जत पालिकेकडे आहेत. त्या वेळी लहान पिशव्यांचे क्रश बनविले जाते. त्यामुळे प्लास्टिक कचरा तेथील डम्पिंग ग्राऊंडवर दिसत नसल्याने अल्पावधीत कर्जतचा घनकचरा प्रकल्प शून्य कचरा डेपो बनला आहे. प्लास्टिक आधीच बाजूला केल्याने तेथील समस्या दूर झाली असून विघटन होणार्या अन्य कचर्यापासून खतनिर्मिती केली जात आहे. त्या खतनिर्मिती प्रकल्पात निर्माण होणारा कचरा हा प्लास्टिकमुक्त असल्याने त्याला मोठी मागणी आहे.
मोठी विस्तीर्ण जागा असलेल्या डम्पिंग ग्राऊंडवर आल्यानंतर तेथे दुर्गंधी तर येत नाहीच, पण तेथे आल्यानंतर आश्चर्याचा धक्का नव्याने पोहचलेल्या अभ्यंगतांना बसतो. कारण रंगीबेरंगी फुलांची बाग त्यांचे स्वागत करीत असते. दुसरीकडे दररोज फुलांचे ताटवे दिसून येत असल्याने सकाळी फिरण्यासाठी निघणार्या कर्जतकरांचे काही क्षण विश्रांती घेण्याचे ते ठिकाण बनले आहे. राज्यातील नगरपालिकेत असा प्रयोग सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्लेनंतर कर्जतमध्ये दुसराच आहे. त्यामुळे या प्रकल्पाचे कौतुक होत आहे. त्यांनी उभारलेले घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प, बायोगॅस प्रकल्प, शून्य कचरा परिसर पाहण्यासाठी देशातील 50 हजारांहून अधिक अभ्यासक येऊन गेले आहेत. त्यात देशातील अनेक शहरांचे नगराध्यक्ष आणि पालिका मुख्याधिकारी तसेच महाविद्यालयीन विद्यार्थी आले आहेत. त्यांनी स्वच्छता अभियान राबविण्यात आघाडीवर राहून कचर्याचे वर्गीकरण आणि त्यानंतर त्याचे विघटन ही कार्यपद्धती देशात अनेक शहरांनी स्वीकारली आहे. कचरा वर्गीकरण पद्धतीचे जनक म्हणून रामदास कोकरे यांचे नाव निश्चितच पहिल्या क्रमांकावर आहे.
रामदास कोकरे यांनी झाड लावले आणि आता त्या पर्यावरणपूरक कर्जत, शून्य कचरा डेपो, बायोगॅस प्रकल्प यांच्या माध्यमातून शहराची स्वयंपूर्ण बनविण्याकडे वाटचाल केली. कर्जत नगर परिषद नगराध्यक्ष सुवर्णा जोशी आणि पालिकेचे मुख्याधिकारी डॉ. पंकज पाटील यांनी आपल्या सर्व सहकार्यांच्या माध्यमातून कर्जत जिल्ह्यातील पहिली पर्यावरणपूरक पालिका बनविली आहे.
-संतोष पेरणे, खबरबात