Breaking News

वीकेण्डनंतरची बाजारपेठेतील गर्दी टाळा

भाजपच्या शर्मिला सत्त्वे यांचे आवाहन

माणगाव ः प्रतिनिधी

संपूर्ण जगाला कोरोना महामारीने सळो की पळो करून सोडले आहे. माणगाव तालुक्यात पहिल्या लाटेच्या तुलनेत जास्त प्रमाणात दररोज कोरोनाचे रुग्ण आढळत आहेत. तरी माणगाव तालुक्यातील नागरिकांनी दर शनिवार, रविवारी होणार्‍या वीकेण्ड लॉकडाऊननंतर बाजारपेठेत खरेदीसाठी गर्दी करू नये, असे आवाहन भारतीय जनता पक्ष महिला मोर्चाच्या माणगाव तालुकाध्यक्ष शर्मिला सत्त्वे यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे केले आहे.

कोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे भाजपच्या शर्मिला सत्त्वे यांनी प्रसिद्धिपत्रक कढून नागरिकांना महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत. माणगाव हे तालुक्याचे ठिकाण असून या ठिकाणी विविध कामधंद्यानिमित्त तसेच खरेदीसाठी नागरिक येतात. त्यामुळे माणगाव बाजारपेठेत गर्दी होते. शनिवार व रविवार दोन दिवसांचा वीकेण्ड लॉकडाऊन पाळल्यानंतर सोमवारी पुन्हा माणगावला जत्रेचे स्वरूप येते. याकडे खासकरून दुकानदारांनी लक्ष देणे आवश्यक आहे.

दुकानदारांनी आपल्या दुकानात खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांनी तोंडाला मास्क लावले आहे का हे पाहणे जरुरीचे आहे. मास्क नसेल तर त्याला मास्क लावण्यास सांगावे. ग्राहकांना सुरक्षित अंतरावर उभे राहण्यास सांगावे. माणगाव बाजारपेठेत खरेदीसाठी सोमवारी जास्त गर्दी होताना दिसत आहे. याकडे पोलीस व नगरपंचायत प्रशासनाने लक्ष देणे आवश्यक आहे. प्रशासनाने सकाळच्या सत्रात बाजारपेठेत आपले कारवाई पथक दाखल करावे. कोरोना महामारी माणगाव तालुक्यात झपाट्याने वाढत आहे.

याकडे माणगावकरांनी गांभीर्याने लक्ष देऊन वीकेण्ड लॉकडाऊननंतर बाजारपेठेत गर्दी करू नये, असे कळकळीचे आवाहन भाजपच्या शर्मिला सत्त्वे यांनी नागरिकांना केले आहे.

Check Also

सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर यांना यमुना स्त्री सन्मान पुरस्कार प्रदान

सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदानाचा गौरव पनवेल ः रामप्रहर वृत्तइतिहासात तसेच आजच्या आधुनिक युगातही अनेक …

Leave a Reply