महाड तालुका हा भौगोलिकदृष्ट्या आकाराने विस्तीर्ण तालुका आहे. तसेच याचा जवळपास 80 टक्के प्रदेश हा दुर्गम आणि डोंगराळ आहे. तालुक्यातील 134 ग्रुप ग्रामपंचायतींमध्ये जवळपास 250 आदिवासी वाड्या-वस्त्या आहेत. सह्याद्रीच्या रांगेचा बहुतांश विस्तार महाड तालुक्यात पसरला आहे. तालुक्याच्या एका टोकाच्या गावातून महाडला यायला जवळपास 35 ते 40 किमीचे अंतर कापावे लागते. स्वराज्याची राजधानी किल्ले रायगड, लिंगाणा, सोनगड, दौलतगड, चांभारगड, शिवथरघळ यांच्यासह गांधारपाले आणि कोलची बौद्धकालीन लेणी, प्रसिद्ध चवदार तळे, प्राचीन इतिहास असणारी बाजारपेठ, जिजाऊंची समाधी पाचाड अशी अनेक महत्त्वाची ठिकणे तालुक्यात आहेत. एमआयडीसीचे मोठ्या प्रमाणात विस्तारीकरण होत आहे. त्यामुळे तालुक्याचा औद्योगिक विकास आणि नागरीकरण झपाट्याने होत आहे. परप्रांतीय कामगार मोठ्या संख्येने रोजगारासाठी महाडकडे येत आहेत. शहरालगत आणि औद्योगिक वसाहतीमधील गावांचे हळूहळू शहरीकरण होऊ लागले आहे. बिरवाडी, आसनपोई, काळीज खरवली, शेल्टोली, सवाणे, कुसगाव, कांबळे तर्फे बिरवाडी, नांगलवाडी, नडगाव, राजेवाडी, चांभारखिंड, करंजखोल, लाडवली, दादली, शिरगाव, गंधारपाले, वहूर, दासगाव, चोचिंदे, कुर्ला, कांबळे तर्फे महाड, चांढवे या गावांची लोकसंख्या झपाट्याने वाढू लागली आहे, तर विन्हेरे, तुडील, नाते ही दुर्गम आणि महाड शहरापासून लांब असलेली गावे स्वयंविकसित होत आहेत. किल्ले रायगडला येणार्या पर्यटकांमुळे पाचाड आणि हिरकणीवाडी, रायगडवाडी येथील पर्यटन व्यवसाय बहरू लागला आहे. हॉटेल्स, लॉजिंग, पार्किंग व्यसाय विकसित होऊ लागला आहे. झपाट्याने नागरी विकास होत असताना महाड तालुक्यातील आरोग्य व्यवस्था मात्र आजही पांगळी आहे. महाडमध्ये एक ग्रामीण रुग्णालय, दासगाव, विन्हेरे, चिंभावे, वरंध, बिरवाडी आणि पाचाड या सहा ठिकाणी जिल्हा परिषदेची प्राथमिक आरोग्य केंद्रे आहेत. ग्रामीण भागातील रुग्ण मोठ्या संख्येने ताप, खोकला, सर्दीसाठी या प्राथमिक आरोग्य केंद्रात जात असतात, मात्र या ठिकाणी पुरेसे डॉक्टर्स आणि औषधसाठा उपलब्ध नसतो. साप, विंचू दंशावर या ठिकाणी उपचार होत नाहीत. बाळंतपणाची व्यवस्था नाही. त्यामुळे रुग्णांना महाड शहरात यावे लागते. महाडसह पोलादपूर, श्रीवर्धन, म्हसळा, दापोली, मंडणगड या तालुक्यांतील लोकदेखील वैद्यकीय उपचारासाठी महाडमध्ये येतात. महाड शहरात मोठे खासगी दवाखाने आणि हॉस्पिटल आहेत, मात्र त्यांचे दर सर्वसामान्यांना परवडणारे नाहीत. अशा वेळी गरिबांसाठी महाड ग्रामीण रुग्णालय हा एकच पर्याय उरतो. या ठिकाणी कार्यरत असणारे वैद्यकीय अधीक्षक डॉ. भास्कर जगताप यांच्या नियोजनाखाली उत्तम आरोग्यसेवा पुरवली जात आहे, मात्र त्यांच्यावरदेखील मर्यादा आहेत. महाड ग्रामीण रुग्णालयात गरोदरपणातील शस्त्रक्रियेपासून फॅ्रक्चर, सर्वसाधारण शस्त्रक्रिया, साप, विंचू दंश, कोरोना या सर्व रुग्णांना उपचार मिळत आहेत, मात्र अपुरे कर्मचारी, अपुरी जागा, ऑक्सिजनचा तुटवडा, ऑक्सिजन प्लांटची व्यवस्था नाही. एक्सरे मशीन आहे, पण प्रशिक्षित कर्मचारी नाही. डायलिसिस मशीन आहे, पण डॉक्टर आणि ऑपरेटर नाही. शस्त्रक्रिया होतात, पण भूलतज्ज्ञ नाही. हाडांचा डॉक्टर नाही की स्त्रीरोगतज्ज्ञ नाही. या सर्व भूमिका एकट्या डॉ. जगताप यांनाच कराव्या लागत असल्याचे चित्र आहे. महाडमध्ये 2020ची कोरोना परिस्थिती गंभीर होती. तेव्हा याच ग्रामीण रुग्णालयात एका तळमजल्यावर कोविड सेंटर सुरू करून हजारो रुग्णांचे प्राण वाचविण्यात आले होते. याच ग्रामीण रुग्णालयाच्या इमारतीचा एक मजला वाढवून त्या ठिकाणी 200 बेडचे अद्ययावत कोविड सेंटर सुरू करण्याची मागणी महाडचे पत्रकार आणि नागरिक करीत होते, मात्र या ठिकाणीदेखील राजकारण आडवे आले आणि या नियोजित कोरोना सेंटरचा बळी गेला. नव्या पर्यायाने औद्योगिक वसाहतीमध्ये शहरापासून दूर कोविड सेंटर सुरू करण्यात आले, मात्र या ठिकाणी जबाबदार डॉक्टरच नसल्याने ऑक्सिजन आणि गोळ्या देऊन प्राथमिक उपचार होऊ लागले आणि रुग्ण गंभीर झाला की हात झटकून मुंबईला पाठवले जाते. महाडची शासकीय वैद्यकीय सेवा आजही व्हेंटिलेटरवर आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव आणि झपाट्याने होणारे मृत्यू पाहता भविष्याचा विचार करून तरी महाडची आरोग्य यंत्रणा सुधारण्याची गरज आहे. लोकप्रतिनिधींनी याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची वेळ आली आहे. कारण जवळ कितीही पैसा असला तरी वेळेवर हॉस्पिटलमध्ये बेड उपलब्ध झाला नाही, तर काय होऊ शकते हे कोरोनाने आपल्याला शिकवले आहे. त्यामुळे भविष्यात महाडची आरोग्य यंत्रणा सक्षम झाली नाही, तर कोरोनाबरोबर आणखी किती महामार्या येतील हे सांगता येणार नाही. त्यामध्ये मृत्यूचे तांडव सुरू असेल आणि आपण हतबल असू.
-महेश शिंदे