Breaking News

जागेचा वाद विकोपाला; मुरूड पोलीस ठाण्यात 80 जणांवर गुन्हा दाखल; राजपुरी येथील घटना

मुरूड : प्रतिनिधी

तालुक्यातील राजपुरी येथील हरिदास बाणकोटकर यांच्या अंगणातील घराला लागणार्‍या साहित्याची नासधूस केल्याप्रकरणी जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या आदेशानुसार राजपुरी कोळीवाड्यातील 80 जणांवर मुरूड पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. हरिदास बाणकोटकर यांचे राजपुरी येथे घर असून तेथे ते त्यांची पत्नी व मुलांसह राहतात. त्यांनी आपल्या अंगणात घराला आवश्यक असणारे साहित्य ठेवले होते. बाणकोटकर व श्री. महालक्ष्मी मच्छीमार सोसायटी यांच्यामध्ये अनेक दिवस जागेवरून वाद सुरू आहे. बाणकोटकर यांचे घर मच्छीमार सोसायटीच्या जागेत असल्याचा दावा करण्यात येत आहे, मात्र सदरची जागा ही सरकारी गावठाण आहे. श्री. महालक्ष्मी मच्छीमार सोसायटीच्या नावावर सातबारा नाही, असे बाणकोटकर यांचे म्हणणे आहे. हा वाद विकोपाला जाऊन 14 एप्रिल रोजी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास श्री. महालक्ष्मी मच्छीमार सोसायटीचे सदस्य व ग्रामस्थांनी एकत्र येऊन बाणकोटकर यांना शिवीगाळ केली व त्यांच्या घराच्या अंगणात ठेवलेल्या विटा, चिर्‍याची दगडे, प्लास्टिक पॅनेल, ऐनाची लाकडे, बांबू, वासे, सिमेंटचे पत्रे, कौले, लाकडी रिपा व अन्य साहित्याची तोडफोड केली, तसेच अंगणात लावलेली आंबा, केळी, नारळ, पपई, फणस, जांभूळ अशी एकूण 35 झाडे तोडून ती समुद्रात टाकली, असे हरिदास बाणकोटकर यांनी तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी बाणकोटकर यांनी तक्रार करूनही मुरूड पोलीस ठाणे फिर्याद दाखल करून घेत नव्हते. अखेर बाणकोटकर कुटुंबाने जिल्हा पोलीस अधीक्षक अशोक दुधे यांच्याशी संपर्क साधून घडलेली हकीगत सांगितली व घटनेचे सर्व व्हिडीओ चित्रीकरण दाखविले. त्यावरून जिल्हा पोलीस अधीक्षकांनी गुन्हा दाखल करण्याचे आदेश देताच मुरूड पोलीस ठाण्यात या प्रकरणात श्री. महालक्ष्मी मच्छीमार सोसायटीचे चेअरमन विजय गिदी, प्रसाद आंबटकर, हेमंत आंबटकर, रमेश गिदी, कृष्ण चव्हाण, नारायण आगरकर यांसह राजपुरी कोळीवाड्यातील 80 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply