द्रविडची भविष्यवाणी
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था
भारतीय क्रिकेट संघ पुढील काही दिवसांत इंग्लंड दौर्यावर जाणार आहे. या दौर्यात टीम इंडिया प्रथम आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल न्यूझीलंडविरुद्ध खेळणार आहे. त्यानंतर इंग्लंडविरुद्ध पाच सामन्यांची कसोटी मालिका असेल. या मालिकेसंदर्भात भारताचा महान क्रिकेटपटू राहुल द्रविड याने एक मोठी भविष्यवाणी केली आहे.
भारतीय संघाच्या आगामी दौर्याबद्दल बोलताना द्रविड म्हणाला, टीम इंडिया या वर्षी इंग्लंड दौर्यातील पाच सामन्यांची मालिका 3-2च्या फरकाने जिंकेल. इतकेच नव्हे तर भारतीय संघाकडे 2007नंतर इंग्लंडमध्ये कसोटी मालिका जिंकण्याची ही सर्वोत्तम संधी असेल.
एका वेबसाइटच्या वेबिनारमध्ये बोलताना द्रविड म्हणाला, मला वाटते की भारतीय संघासमोर मालिका जिंकण्याची ही सर्वोत्तम संधी आहे. राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचा प्रमुख असलेल्या द्रविडने या मालिकेत आर. अश्विन विरुद्ध बेन स्टोक्स ही लढत पाहण्यासारखी होईल, असेदेखील सांगितले.
इंग्लंड दौर्यासाठी भारतीय संघ चांगल्या पद्धतीने तयार असेल. त्यांच्याकडे ऑस्ट्रेलियात मिळवलेल्या विजयाचा आत्मविश्वास असेल. खेळाडूंना स्वत:वर विश्वास असेल. संघातील काही खेळाडू इंग्लंडमध्ये याआधी खेळले आहेत. त्यामुळे भारताची फलंदाजी अनुभवी असेल. या कारणांमुळेच भारतासाठी ही सर्वोत्तम संधी असेल आणि ते मालिका 3-2ने जिंकू शकतील, असे द्रविड म्हणाला.