Breaking News

अलिबाग तालुक्यातील पाणीटंचाई मानवनिर्मीत

अलिबाग तालुका गेले काही वर्षे टँकरमुक्त आहे. कागदावर तरी तसं आहे. या तालुक्यात तीनविरा, कुसूंबळे, नारंगी, रेवस झोन 1, रेवस झोन 2, उमटे या प्रादेशिक पाणीपुरवठा योजना आहेत. यावरून सार्वजनिक व खाजगी जोडण्या दिल्या जातात. काही ग्रामपंचायतींच्या स्वतःच्या पाणीपुरवठा योजना आहेत.  एमआयडीसीकडून त्यांना पाणीपुरवठा केला जातो. असे असतानादेखील यंदा अलिबाग तालुक्यातील कोप्रोली, रेवस, मिळकतखार, बोडणी, रांजणखार डावली येथे टँकरने पाणीपुरवठा केला जाणार आहे. तसेच उमटे पाणीपुरवठा योजनेतील गावांना टँकरने पाणीपुरवठा केला जाणार आहे.  इतक्या योजना असताना टँकरमुक्त अशी शेखी मिरवणार्‍या अलिबाग तालुक्यात टँकरने पाणीपुरवठा करावा लागतोय, हे भूषणावह नाही. ज्या गावांना टँकरने पाणीपुरवठा केला जाणार आहे, तेथे पाणीपुरवठा योजना आहेत. गावांमध्ये जलवाहिन्या टाकण्यात आल्या आहेत. परंतु गावांमध्ये पाणी पोहचत नाही. पाणी पोहचत नाही म्हणून या योजनांच्या दुरूस्त्या करण्यात आल्या. त्यावर आजवर करोडो रूपये खर्च करण्यात आले. असे असताना लोकांना गावांमध्ये पाणी पोहचत नाही. या गावातील महिलांना पाण्यासाठी ववणवण भटकावे लागतेयं.  प्रत्येक गावात नळपाणी योजना आहेत, त्यावर खर्च करायचा, त्यांच्या दुरूस्त्या करायच्या आणि तरीही पाणी मिळत नाह, म्हणून या गावांना टँकरने पाणीपुरवठा करायचा हे किती दिवस करणार.  ज्या गावांना पाणी मिळत नाही, त्यांना टँकरने पाणी दिलेच पाहिजे. त्याचबरोबर पाणीपुरवठा योजना असूनही गावांमध्ये पाणी का पोहचत नाही, ते शोधून ही समस्या दूर केली पाहिजे. ते न करता टँकरने पाणीपुरवठा करा अशी मागणी लोकप्रतिनिधी करतात. अलिबाग तालुक्यातील पाणीटंचाई मानवनिर्मित आहे. ती दूर होऊ शकते. गावांमध्ये जाणार्‍या जलवाहिन्यांना  खुंट्या मारल्या आहेत, त्या काढण्याचे धाडस प्रशासनाने दाखवले तरी बर्‍याच गावांना पाणी मिळेल. पण वाईटपणा कुणी घ्यायला तयार नाही. वाईटपणा घेण्याऐवजी सरळ टँकर मंजूर करून गप्प बसायंच, यातून टँकर लॉबी पोसली जातेय. धरणांमध्ये साचलेला गाळ हेदेखील पाणीटंचाईचे एक कारण आहे. अलिबाग तालुक्यातील उमटे धरण त्याचे एक उदाहरण आहे. उमटे धरणातून अलिबाग तालुक्यातील 70 गावांमध्ये पाणीपुरवठा होत असतो. सध्या या धरणाने तळ गाठल्याने धरणातून पाणीपुरवठा होत नाही. पाणीपुरवठा होत नसल्यामुळे या धरणाच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या गावांतील लोकांना पाण्याच्या इतर स्त्रोतांमधून पाणी आणावे लागत आहे. हे अशुध्द पाणी लोक पितात. त्यामुळे या परिसरात जलजन्य रोगांची साथ येण्याची भिती आहे. या परिसरातील जनता आता टँकरने पाणीपुरवठा करण्याची मागणी करत आहे. टँकर हा तात्पुरता उपाय असेल. हे धरण गाळात रूतले आहे. ही समस्या कायमची सोडवायची असेल तर उमटे धरणातील गाळ काढून धरणाची पाणी साठवण्याची क्षमता वाढवायला हवी. उमटे धरणात मागील 40 ते 45 वर्षांपासून गाळ  साचत आहे. धरणात गाळ साचला आहे, ही बाब जिल्हा प्रशासनाला माहीत नाही, असे नाही.  2016-17 पासून उमटे धरणाचा गाळ काढून धरण दुरूस्त करावे, अशी मागणी या परिसरातील जनता करत आहे. परंतु त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. सध्या उमटे धरणाच्या पाण्यावर अलिबाग तालुक्यातील 70 गावे अवलंबून आहेत. या धरणाच्या पाण्यावर अवलंबून असणार्‍या गावातील तरूणांनी 1 मे 2019 रोजी महाराष्ट्र दिनी श्रमदान करून धरणातील दगड – गोटे काढले होते. याची दखल घेऊन तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी यात लक्ष घातले. जेएसडब्ल्यू कंपनीच्या माध्यमातून जेसीबीच्या सहाय्याने धरणातील गाळ काढण्याचे आश्वासन दिले. परंतु त्यात पुढे काहीच हालचाली झाल्या नाहीत. गाळ काढला गेला नाही. गेली अनेक वर्ष या धरणात गाळ साचतोय. गाळ न काढल्याने धरणात पुरेसा पाणीसाठा होत नाही. परिणामी एप्रिल महिन्यापासूनच या भागाला पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. मग या धरणाच्या पाण्यावर उवलंबून असलेल्या 70 गावातील नागरिकांना जवळच्या विहिरी, नदी, तळी यांचा आधार घ्यावा लागतो. परंतु त्यातील मिळणारे पाणी हे अशुध्द असते. त्यामुळे या गावांना टँकरने पाणीपुरवठा करण्यात यावा, आशी मागणी केली जाऊ लागली आहे. उमटे धरणातील गाळ आणि धरणाच्या दुरूस्तीची चर्चा दरवर्षी होत असते. करोडो रूपये खर्चून या धरणावर जलशुध्दीकरणाचा प्रकल्प राबविण्यात आला आहे. मागील वर्षी हा विषय गाजला होता. सध्या धरणात पाणी नाही. अशा परिस्थितीत धरणातून पाणीपुरवठा होणेच शक्य नाही. जनतेला पिण्यासाठी टँकरने पाणीपुरवठा करायाला हवाच. परंतु तो तात्पुरता उपाय आहे. या धरणातील गाळ काढून धरणाची जल साठवणूक क्षमता वाढणे आवश्यक आहे. त्यासाठी प्रशासनाने प्रयत्न करायला हवेत.

-प्रकाश सोनवडेकर

Check Also

कळंबोलीत रंगणार कुस्त्यांचा आखाडा

विजेत्याला मिळणार पाच लाख रुपये व मानाची गदा पनवेल : प्रतिनिधीउदयोन्मुख खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी भारतीय …

Leave a Reply