माणगाव ः प्रतिनिधी
कोरोनाचा प्रसार थांबविण्याकरिता जिल्हाधिकारी रायगड यांनी जारी केलेल्या आदेशाचे उल्लंघन करून देशी दारूच्या बाटल्या विक्री करण्याच्या उद्देशाने जवळ बाळगल्याप्रकरणी आरोपींवर शुक्रवारी (दि. 27) माणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या वेळी मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या घटनेची फिर्याद माणगाव पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई श्यामसुंदर हनुमंतराव शिंदे यांनी माणगाव पोलीस ठाण्यात दिली. त्यानंतर शुक्रवारी सायंकाळी या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्ह्यातील आरोपी लोकराज नरबहादुर बिकर (23, रा. शिपूरकर कॉम्प्लेक्स, विद्यानगर, माणगाव) याच्याकडे टँगो पंच देशी दारूच्या 92 काचेच्या बाटल्या प्रत्येकी 180 मिली लिटर, प्रत्येकी किंमत 52 रुपये अशा वर्णनाच्या सुमारे 4,784 रुपये व जीएम देशी दारूच्या 48 प्लास्टिकच्या बाटल्या प्रत्येकी 180 मिली लिटर प्रत्येकी किंमत 52 रुपये अशा वर्णनाच्या सुमारे 2,496 रुपये असा एकूण 7,280 रुपयांचा माल त्याच्याकडे सापडला. विक्री करण्याचा अगर ताब्यात बाळगण्याचा परवाना नसताना बेकायदेशीरपणे देशी दारूच्या बाटल्या विक्री करण्याच्या उद्देशाने बाळगल्याबाबत जिल्हाधिकारी रायगड यांच्या आदेशाची अवमान्यता केली. या प्रकरणी आरोपीवर माणगाव पोलीस ठाण्यात माणगाव प्रोव्ही गुन्हा राजि नं. 63/2020 मद्यपान दारू अधिनियम 1949चे कलम 65 (ई) भा. दं. वि. कलम 188प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.