कोरोना महामारीच्या काळात अपरिहार्यपणे काही गोष्टींचा स्वीकार करावा लागला आणि आज त्या अनेकांच्या जगण्याचा प्रमुख घटक होऊन बसल्या आहेत. वर्क फ्रॉम होम आणि ऑनलाइन शिक्षण यांचा यात ठळकपणे उल्लेख करावा लागेल. या दोन्ही बाबी महामारीच्या आधीही शक्य होत्या, पण आपली तांत्रिक तयारी नव्हती आणि स्वीकारही नव्हता. महामारीने मात्र हा बदल स्वीकारणे भाग पाडले. हे बदल अनेकांना आता इतके सोयीचे आणि समाधानाचे वाटत आहेत की जगभरच आपण ते कायमस्वरुपी का स्वीकारू नयेत याची चर्चा सुरू झाली आहे.
कोरोना महामारी अकस्मात अवघ्या जगावर येऊन आदळली, त्याला जवळपास सव्वा वर्ष लोटले आहे. महामारीमुळे जगभरातील कॉर्पोरेट विश्वात वर्क फ्रॉम होमचा मोठ्या प्रमाणावर स्वीकार झाला. कार्यालयीन कामकाजासाठी सगळ्यांनी ऑफिसातच गेले पाहिजे असे नाही हे गेल्या सव्वा वर्षात पुरते स्पष्ट झाले. घरून वा ऑफिसात दोन्हीपैकी कुठूनही काम करण्याची लवचिकता असावी असा सूर याही आधी गेली काही वर्षे लागत होता. विशेषत: महिला कर्मचारी विशिष्ट परिस्थितीत तरी आपल्याला ही सवलत दिली जावी अशी मागणी करत होत्या व काही बलाढ्य बहुराष्ट्रीय कंपन्यांनी त्यास अनुकूलता दाखवण्यास सुरूवातही केली होती. कोरोना काळात मात्र त्यासाठी आवश्यक ते तंत्रज्ञान झपाट्याने विकसित होऊन सर्वदूर वापरात आले. आपल्याकडे शंभर टक्के वर्क फ्रॉम होम आहे हे कंपन्या अभिमानाने सांगू लागल्या. आपण आपल्या कर्मचार्यांच्या जीविताला प्राधान्य देतो हे दर्शविण्याचा तो एक प्रमुख घटक झाला. त्याचवेळेस वर्क फ्रॉम होमचा कामाच्या दर्जावर होणारा भलाबुरा परिणामही व्यवस्थापनांकडून बारकाईने अभ्यासला जातो आहे. आधी केवळ माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात दिसणारी कार्यशैलीची लवचिकता यापुढे अनेकविध क्षेत्रांमध्ये कायमस्वरुपी पाहायला मिळेल अशी चिन्हे आहेत. अर्थात ऑफिस आणि घर अशी जगण्याची ठळक विभागणी हवीच असा आग्रह धरणारेही आहेतच. वर्क फ्रॉम होमने मंदावलेला जगण्याचा वेग अनेकांना आवडून गेला आहे. कुटुंबियांमध्ये अधिक जवळीक निर्माण झाली आहे. दिवसाचा मोठा सक्रीय भाग मुले अकारण पालकांपासून दूर राहात होती असा विचारही बळावू लागला आहे. शिक्षणाचा, शैक्षणिक मूल्यमापनाचाही वेगळा विचार करणे जगभरात भाग पडते आहे. आपल्याकडेही अलीकडेच कोरोना महामारीच्या दुसर्या लाटेमुळे देशभरात अनेक राज्यांमधील शालेय शिक्षण मंडळांना दहावीची बोर्डाची परीक्षा रद्द करणे भाग पडले आणि अनेक वर्षांपासून या परीक्षेचा अकारण मोठा झालेला बागुलबुवा खरोखरच आवश्यक आहे का याची चर्चा ऐरणीवर आली. शैक्षणिक वाटचालीत ही परीक्षा खरोखरच इतकी महत्त्वाची आहे का, निव्वळ पाठांतरावर आधारित परीक्षा पद्धती आपण केव्हाचीच मागे टाकायला हवी होती, बदललेल्या माहिती तंत्रज्ञानामुळे आता माहिती नव्हे तर ज्ञान देण्याची अधिक गरज आहे आदी मागण्यांना आता धार आली आहे. या वर्षी आपण नाईलाजाने बोर्डाची ही परीक्षा रद्द केली असली तरी ती आता कायमचीच बाद करायला हवी आहे, मूल्यमापनाच्या पद्धतीचाच पुनर्विचार कसा आवश्यक आहे याची चर्चा सुरू झाली आहे. परिस्थितीच्या रेट्यातून आपल्याला या दोन्ही आघाड्यांवर भविष्यात मोठे बदल स्वीकारणे भाग पडणार अशी चिन्हे दिसत आहेत.