Breaking News

नवीन पनवेलमधील भुयारी मार्गासाठी सिडकोने कार्यवाही करण्याची गरज

पनवेल : प्रतिनिधी

नवीन पनवेलमधून पनवेल (तक्का) मध्ये जाण्यासाठी सुरू असलेले भुयारी मार्गाचे काम अंतिम टप्प्यात आले असून, रेल्वे प्रशासनाकडून भुयारी मार्ग दोन्ही बाजूने खुला करण्यात आला आहे. तक्का बाजूच्या रस्त्याचे काँक्रिटीकरण पूर्ण झाले आहे, तर नवीन पनवेल बाजूचे काँक्रिटीकरण लवकरच पूर्ण होईल. नागरिकांना मात्र या भुयारी मार्गाचा वापर करता येणार नाही. त्यासाठी सिडकोने कार्यवाही करण्याची गरज आहे.

नवीन पनवेलमधील सेक्टर 15, 15 ए, 16, पोदी व विचुंबे या भागातून राष्ट्रीय महामार्गावर जाण्यासाठी पोदीजवळील रेल्वे फाटक ओलांडून किंवा एचडीएफसी सर्कलच्या पुलावरून जावे लागते. या पुलावर नेहमीच वाहतुकीची कोंडी होत असते; कारण माथेरान रस्त्याकडून व डी मार्ट भागातून येणारी वाहतूकही या पुलावरूनच होत असते. या भागाचा विकास झपाट्याने झाल्याने मोठे प्रकल्प उभे राहिले. नागरी वस्ती वाढल्यानेसुद्धा वाहतुकीचा रेटा वाढला. त्याचा परिणाम रोज वाहतूक कोंडीला तोंड द्यावे लागते. त्यामुळे पोदीजवळ असलेल्या रेल्वे गेटचा वापर नागरिक व विद्यार्थी धोकादायक पद्धतीने करीत आहेत.

या पार्श्वभूमीवर पोदी येथील भुयारी मार्गाची मागणी करण्यात आली होती. या भुयारी मार्गासाठी 10 कोटींपेक्षा जास्त रुपये खर्च करण्यात आले आहेत. ठेकेदाराच्या टेंडरमधील कालावधीप्रमाणे मे 2018मध्ये हे काम पूर्ण होणे गरजेचे होते, पण डिसेंबर 2017पासून काम बंद पडले होते. याबाबत नगरसेवक अ‍ॅड. मनोज भुजबळ आणि तेजस कांडपिळे यांनी आमदार प्रशांत ठाकूर यांना माहिती दिली असता, आमदारांनी रेल्वेमंत्र्यांची भेट घेऊन काम पूर्ण करण्याची मागणी केली होती.

या भुयारी मार्गासाठी सिमेंट ब्लॉक आत टाकण्याचे काम पूर्ण झाले असून, दोन्ही बाजूने मार्ग खुला करण्यात आला आहे. दोन्ही बाजूला 60 मीटर रस्ता रेल्वे करून देणार आहे. त्याचे कामही दोन-तीन दिवसांत पूर्ण होईल. भविष्यात रेल्वे लाईन वाढल्या, तर अडचण होऊ नये यासाठी पूलाला एक जादा ब्लॉक टाकण्यात आला आहे. या कामाची पाहणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी रेल्वे, सिडको आणि महावितरणच्या अधिकार्‍यांबरोबर 7 नोव्हेंबर रोजी प्रभाग ‘ड’चे सभापती तेजस कांडपिळे, नगरसेविका चारुशीला घरत, माजी उपनगराध्यक्ष सुभाष भुजबळ, घन:शाम भुजबळ आणि पनवेल स्टेशन रेल्वे सल्लागार समितीच्या सदस्यांच्या उपस्थितीत केली होती.

या वेळी रेल्वे अधिकार्‍यांनी आमचे काम डिसेंबरमध्ये पूर्ण होईल, अशी माहिती दिली होती त्याप्रमाणे रेल्वेचे काम पूर्ण झाले आहे. आमदार प्रशांत ठाकूर यांनी नवीन पनवेलमधील वाहतूक कोंडी कमी होण्यासाठी आणि बहुमूल्य इंधनाची बचत होणार असल्याने लवकरात लवकर हा रस्ता पूर्ण करून हा मार्ग लवकर सुरू करावा याकरिता महावितरण आणि सिडकोच्या अधिकार्‍यांना सूचना ही दिल्या होत्या, पण महावितरणचे टॉवर हलवण्याचे काम आणि सिडकोकडे असलेल्या पोदीमधील अप्रोच रस्त्याच्या कामाला मात्र अद्याप सुरुवात झालेली नाही.

Check Also

उरणमधील ‘उबाठा’, शेकापचे कार्यकर्ते भाजपमध्ये

आमदार महेश बालदी यांच्याकडून स्वागत उरण : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत शिवसेना उद्धव बाळासाहेब …

Leave a Reply