पोलादपूर : प्रतिनिधी
चक्रीवादळ येण्यापूर्वीच शुक्रवारी (दि. 15) सायंकाळी वादळी पाऊस सुरू झाला. पोलादपूर तालुक्यातील धारवली, भोराव माटवण रस्ता आणि महाड तालुक्यातील राजेवाडी मोहल्ल्यातील मदरसा या भागात घरे आणि छप्परांचे वादळी वार्यामुळे नुकसान झाले. भोराव माटवण रस्तालगतच्या विजेच्या काँक्रीटच्या खांबाचा कनेक्टर्स जोडलेला भाग तुटून लोंबत असल्याचे दिसून आले तर काही ठिकाणी झाडाच्या फांद्या तुटून रस्त्यावर कोसळल्याने वाहतुकीला अडथळा झाला. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गालगतच्या मंडणगड भोर पंढरपूर रस्त्यालगतच्या राजेवाडी गावातील मदरसाच्या लोखंडी पत्र्याची शेड उन्मळून खाली पडली.