पनवेल ः प्रतिनिधी
पनवेल महापालिकेकडून रहिवासी सोसायट्यांना नोटीस देऊन कचरा वर्गीकरण करण्याची पुन्हा सक्ती केली जात आहे. कोरोना काळात या वर्गीकरणात खंड पडल्याने नागरिकांना कचरा वर्गीकरणासंदर्भात आठवण करून देण्यासाठी या नोटीस बजावण्यात आल्या आहेत. ओला आणि सुका कचरा वेगळा केला नाही, तर सोसायटीतील कचरा उचलला जाणार नाही, असा इशारा महापालिकेने दिला आहे. पनवेल महापालिका क्षेत्रात दररोज 450 टन कचरा जमा केला जातो. महापालिका क्षेत्राच्या 110 चौरस मीटर क्षेत्रातील पूर्वीच्या सिडको वसाहतीतील कचरा व्यवस्थापनाचे हस्तांतरण सिडकोकडून महापालिकेने दीड ते दोन वर्षांपूर्वी घेतले आहे. महापालिकेने स्वत: घंटागाड्या खरेदी करून कचरा उचलून सिडकोच्या घोट गावाजवळ असलेल्या डम्पिंग ग्राऊंडवर कचरा टाकला जातो. घनकचरा व्यवस्थापन नियम 2016 अंतर्गत कचरा निर्मात्यांनी वर्गीकरण करून ओला आणि सुका व घरगुती कचर्याचे वर्गीकरण करणे अपेक्षित आहे. आता पनवेल महापालिकेने पुन्हा एकदा नव्याने कचरा वर्गीकरण करण्याची सक्ती केली आहे. कोरोनाच्या काळात नागरिकांनी कचरा वेगळा केला नाही म्हणून पुन्हा नव्याने जनजागृती करण्यासाठी ही सक्ती केली जात असल्याचे महापालिका प्रशासनाचे म्हणणे आहे. जैविक विघटनशील कचरा म्हणजेच स्वयंपाकघरातील कचरा गोळा करण्यासाठी घंटागाडी आठवड्यातून काही दिवस येईल आणि काही ठरावीक दिवस फक्त सुका कचरा गोळा केला जाईल, असे महापालिकेचे नियोजन असल्याची माहिती स्वच्छता विभागातून देण्यात आली. महापालिकेने घंटागाड्यांचेही या पद्धतीने नियोजन केले असल्याची माहिती सहाय्यक आयुक्त धैर्यशील जाधव यांनी दिली. आरोग्य निरीक्षकांना त्यांच्या भागात सुका कचरा किती प्रमाणात जमा होतो याचा अंदाज घेऊन संबंधित भागात गरजेनुसार आठवड्यातून एकदा किंवा दोनदा फक्त सुका कचरा गोळा केला जाईल, अशी माहिती त्यांनी दिली. कचर्याचे वर्गीकरण करीत असताना सॅनिटरी नॅपकिन व डायपर आदी कचर्यात मोठ्या प्रमाणात समाविष्ट असतात. अशा प्रकारच्या कचर्याचे विघटन करण्यासंदर्भात पालिका स्वतंत्र यंत्रणा लवकरच उभारणार आहे. घनकचरा व्यवस्थापन नियमाप्रमाणे ओल्या कचर्याची विल्हेवाट सोसायटीत लावणे आवश्यक आहे. कोरोनाच्या काळात या प्रक्रियेत खंड पडला होता. नागरिकांना पुन्हा एकदा आठवण करून देण्यासाठी नव्याने या संदर्भात नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. नागरिकांनी त्याचे पालन करावे, असे आवाहन साहाय्यक आयुक्त धैर्यशील जाधव यांनी केले आहे.