आदिवासीच्या घराचे छप्पर उडाले
कर्जत : बातमीदार : वादळी वार्यासह अवेळी पावसाचा तडाखा रविवारी (दि. 14) सायंकाळी कर्जत तालुक्याला बसला. यात शेतकरी व वीटभट्टी उत्पादकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शिलारवाडीमधील एका आदिवासीच्या घराचे छप्पर हवेत उडून गेले आहे. दरम्यान, आदिवासी शेतकर्यांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून महसूल विभागाने मंडळ अधिकारी यांना पाठवून पंचनामा केला आहे.कर्जत तालुक्यात रविवारी सायंकाळी सहा वाजल्यापासून वादळी वार्याने सुरुवात केली होती. प्रामुख्याने खांडस, जामरुख, कळंब तसेच वांगणी भागात वादळी वार्यासह अवेळी पाऊस कोसळला. या पावसाने पाथरज ग्रामपंचायतीमधील शिलारवाडी येथील मालू हेमा शिंगवा यांच्या याचवर्षी बांधलेल्या माती विटांच्या घरावरील सुमारे 40 सिमेंट पत्र्याचे छप्पर वार्याने उडून गेले. त्यानंतर त्या भागात अवेळी पाऊस झाला. या पावसामुळे शिंगवा यांच्या घरातील पावसाळ्यासाठी साठवण करून ठेवलेले तांदूळ आणि घरातील साहित्य पूर्णपणे भिजून गेले. कर्जतचे तहसीलदार अविनाश कोष्टी यांनी कशेळे मंडळ अधिकारी विशे यांना घटनास्थळी पाठवून शिंगवा कुटुंबाच्या आर्थिक नुकसानीचा पंचनामा करून घेतला. या अवेळी झालेल्या पावसाने कर्जत तालुक्यातील वीटभट्टी मालकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अवेळी पावसाने आणि वादळी वार्याने मोठ्या प्रमाणात तालुक्यातील अनेक गावांना लक्ष्य केले, परंतु शिलारवाडीमधील आदिवासी शेतकरी वगळता अन्य सर्वांचे किरकोळ नुकसान झाले असल्याची माहिती कर्जतचे निवासी नायब तहसीलदार सुधाकर राठोड यांनी दिली.