Breaking News

माथेरानकरांच्या उरात धडकी भरवणारे चक्रीवादळाचे ते 25 तास

कर्जत : बातमीदार

सोमवारचा दिवस. लॉकडाऊनमुळे माथेरान बंद असल्याने प्रत्येकजण घरात. सायंकाळी पाच वाजता सौम्य वारा सुरू होता. सर्व लोक आपल्या नित्य कामात व्यस्त. आणि अचानक सोसाट्याचा वारा सेकंदात घोंगावला. सर्वत्र धूळ आणि झाडाचा पालापाचोळा पडलेला. क्षणात कोणाला काहीच कळलं नाही. ज्याने त्याने घरात धाव घेऊन दार बंद केले. आणि तिथून माथेरानकरांचा जीव टांगणीला लागला. नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉ. प्रशांत जाधव व सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत काळे यांनी अग्निशमन गाडी फिरवत सर्वत्र सायरन द्यायला सुरुवात केली. जे लोक कड्याकिनारी राहात होते, त्यांना सुरक्षित स्थळी हलविण्यास सुरुवात केली. पण काही जण हे वादळ काही तासात शमेल, असे गृहीत धरून घरातच थांबले.प्रशासनाने आपत्ती व्यवस्थापन टीम तयार ठेवली होती तसेच सह्याद्री रेस्क्यू टीमही पोलिसांकडून तयार ठेवण्यात आली होती. जस जशी रात्र वाढत होती, तसतसा वार्‍याचा वेगही वाढू लागला. त्यात वीज गायब, सर्वत्र अंधार, बाहेर वादळाने रौद्र रूप धारण केलेलं. पत्रे उडण्याचा आवाज कानावर येत होता. पण अंधार असल्यामुळे नक्की काय होतंय, हे कळत नव्हते. वार्‍याचा वेग 145 ते 150 किमी प्रति तशी होता. सायंकाळी 5 वाजता सुरुवात झालेल्या वादळाने रात्री 11.55 ला थोडी उसंत घेतली. त्यामुळे लोकांना वाटले वादळ आता शांत झाले. वार्‍याचा वेग ही कमी झाला.मात्र वारा बाहेर घोंगावतच होता. प्रत्येक घरातील प्रत्येक जण जागा होता. डोळ्याला झोप लागत नव्हती.काय होईल काही सांगता येत नव्हते. वार्‍याचा वेग कमी झाल्यामुळे आपत्ती व्यवस्थापनाचे कर्मचारी, मुख्याधिकारी व सहाय्यक पोलीस निरीक्षक हे फिरताना दिसत होते. त्या रात्रीत काही लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात यशही आले. कुठे काही अघटित घडले आहे, का याची तपासणी करण्यात येत होती. ही रात्र काळ रात्र ठरते की काय, असंच जणू सर्वांना वाटत होते. कशीबशी ती काळरात्र निघून गेली. वार्‍याचा वेगही कमी झाला होता. सकाळी लोक घराबाहेर दिसत होते. वादळ शमलं, संकट टळलं, असं वाटत असतानाच आपत्ती व्यवस्थापनाने सायरन वाजविण्यास सुरुवात केली. अधिकारी घरोघरी जाऊन लोकांना समजावू लागले, वादळ अजूनही आहे, कोणी घराबाहेर पडू नका. त्यामुळे सर्व लोक घरात गेले आणि सकाळी 10.30 च्या दरम्यान आलेल्या वार्‍याने माथेरानकरांची दाणादाण उडवून टाकली. आणि होत्याचे नव्हते झाले.अनेक ठिकाणी झाडे कोसळली, कित्येकांचे छपरे उडाले.काहींच्या घरावर झाडे कोसळली. त्या लोकांच्या डोळ्यात अश्रू शिवाय काहीच नव्हते. निसर्गापुढे सर्व हतबल होते. वारा सतत घोंघावत होता. स्थानिक प्रशासनाचे  अधिकारी आणि कर्मचार्‍यांशिवाय बाहेर कोणीही दिसत नव्हते. कधी काय होईल सांगता येत नव्हते. कुठून वाईट बातमी येऊ नये, असं सर्वांना वाटत होतं. सायंकाळी 5.15 च्या सुमारास वादळीवार्‍याचा वेग काही अंशी कमी झाला. बघता बघता संध्याकाळचे 6 वाजले. वार्‍याचा वेग कमी होऊन पाऊस बरसू लागला पण काही वेळच. पाऊस थांबताच वारा सुरू होता. पण वेग खूप कमी होता. वादळ पुढे सरकलं आणि लोकांनी सुटकेचा निश्वास टाकला.

जिगरबाज अधिकार्‍यांची कामगिरी

सोमवारी दुपारी एक वाजल्यापासून कड्यालागत राहणार्‍या लोकांच्या घरोघरी जाऊन नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉ. प्रशांत जाधव व सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत काळे यांनी लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्याचा प्रयत्न केला. पण लोकांनी याकडे लक्ष दिले नाही. मात्र प्रत्यक्षात वादळ सुरू झाल्यानंतर लोकांची त्रेधातिरपीट उडाली. हळूहळू लोक स्थलांतरीत होऊ लागले.रात्रीच्या वेळेस वीज पुरवठा नव्हता, तरीही अधिकारी व कर्मचारी भर वादळात कड्याच्या किनारी जाऊन लोकांना सुरक्षित स्थळी हलवीत होते. आपला जीव धोक्यात टाकत ते लोकांचा जीव वाचवत होते. तौक्ते चक्रीवादळाने इतके तास धुमाकूळ घालूनही माथेरानमध्ये जीवितहानी झाली नाही.

जगाशी संपर्क तुटला

चक्रीवादळामुळे रात्रीच्या वेळी माथेरानमधील वीजपुरवठा खंडित झाला, त्याच्या मागोमाग मोबाइल नेटवर्क गायब झाले, वायफाय सेवा देणार्‍या वायरींवर झाडे पडली आणि वायफाय सेवादेखील बंद झाली. त्यामुळे  तीन दिवस माथेरानकरांचा जगाशी संपर्क तुटला होता.

सोमवारी संध्याकाळी वादळ वारा वाहू लागला. पण रात्र झाली आणि वार्‍याचा वेग वाढला. डोळ्याला झोप नाही, काही अघटित घडतंय का, असच मनात येत होतं.पण स्थानिक प्रशासनाच्या कार्यतत्परतेमुळे जीवित हानी झाली नाही. लोकांनी हिमतीने 25 तास वादळाबरोबर मुकाबला केला. त्यात ते यशस्वी झाले.

-प्रदीप घावरे, माजी नगरसेवक, माथेरान

माथेरानकरांनी अकरा महिन्यात दोन चक्रीवादळे झेलली. त्यातील तौक्ते चक्रीवादळ खूपच काळ तग धरून होते. इतका कटू अनुभव कधीच आला नव्हता.

प्रसाद सावंत, नागरिक, माथेरान

वादळ सुरू झाले तेव्हा आम्ही घरातच होतो. पण वारा जास्त वाढू लागला तेंव्हा आम्ही शेजारच्या बंगल्यात जात असतानाच एक महाकाय वृक्ष आमच्या घरावर पडला. दैव बलवत्तर म्हणून आम्ही वाचलो. आमचे घर पूर्ण जमीनदोस्त झाले असून आता संसाराची नव्याने सुरुवात करावी लागेल. यासाठी शासनाने मदतीचा हात पुढे करावा.

-नइम शेख, स्थानिक नागरिक, माथेरान

Check Also

पनवेलमध्ये मानवी साखळीद्वारे जोरदार निदर्शने करत बांगलादेश सरकारचा निषेध

पनवेल : रामप्रहर वृत्त बांगलादेशात हिंदूंवरील अत्याचाराविरोधात सकल हिंदू समाज रायगडच्या वतीने मंगळवारी (दि. 10) …

Leave a Reply