नागोठणे : प्रतिनिधी
कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन नागोठणे येथील श्री सन्मित्र मित्र मंडळाने यंदाच्या गणेशोत्सवात कोविड-19 प्रतिबंधक फलक लावून जनजागृती केली आहे. या मंडळाचे यंदाचे 47वे वर्ष असून, तीन वर्षांनंतर सुवर्ण महोत्सव आगळावेगळा व्हावा या दृष्टीने मंडळाचे सर्वच सदस्य आतापासूनच कामाला लागले आहेत. नागोठणे येथील श्री सन्मित्र मित्र मंडळाच्या गणेशोत्सवाची स्थापना 1974 साली प्रभूआळीतील कायस्थ प्रभू समाजाच्या 700 वर्षांपूर्वीच्या ऐतिहासिक अशा रामेश्वर मंदिरात करण्यात आली होती. यंदाच्या गणेशोत्सवावर कोरोनाचे सावट असले तरी तो शासकीय नियमांचे पालन करून श्रद्धा व भक्तिभावाने साजरा होत आहे. दरवर्षी मंडळाकडून चलत्चित्राद्वारे सजावट केली जाते, पण यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चलत्चित्राला विश्रांती देऊन कोरोनाविषयक जनजागृती होण्यासाठी प्रबोधनात्मक फलक लावण्यात आले आहेत. दर्शनासाठी येणार्या प्रत्येक भाविकाने हाताला सॅनिटायझर लावणे बंधनकारक आहे. दिवसातून दोन ते तीन वेळा मंदिरासह संपूर्ण परिसरात सॅनिटायझरची फवारणी करण्यात येते तसेच सोशल डिस्टन्सिंगचेसुद्धा तंतोतंत पालन करण्यात येत असल्याचे राजेंद्र गुरव यांनी सांगितले. या वर्षी या ठिकाणी आरोग्य शिबिर घेण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. कीर्तिकुमार कळस हे श्री सन्मित्र मित्र मंडळाचे अध्यक्ष असून, त्यांच्या तसेच पदाधिकार्यांच्या मार्गदर्शनाखाली उत्सव समितीचे अध्यक्ष राजेंद्र गुरव व सहकारी यंदाचा गणेशोत्सव यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेत आहेत.