Breaking News

आगरदांडा येथे रेल्वे धावणार

शासनाकडून 65 शेतकर्‍यांना भूसंपादनासाठी नोटीस

मुरूड ः प्रतिनिधी
मुरूड तालुक्यातील आगरदांडा व श्रीवर्धन तालुक्यातील दिघी या ठिकाणी येथे दोन मोठी बंदरे विकसित करण्यात येत आहेत. दिघी येथील बंदर विकसित झाले असून बंदरात बोटीमार्ग येणारा कच्चा माल नियोजित ठिकाणी नेण्यासाठी रेल्वे मालगाडी आवश्यकता आहे. त्यासाठी आगरदांडा ग्रामपंचायत परिसरातील जागेवर रेल्वेरूळाची अधिकृत रेखाटणी केली गेली आहे.
सुमारे 3500 कोटी रुपयांची गुंतवणूक असलेले व एक आंतरराष्ट्रीय बंदर म्हणून विकसित होणारे दिघी पोर्टकडे मोठ्या अपेक्षेने पहिले जात आहे. या बंदरासाठी 1600 एकर जमीन आगरदांडा व दिघी परिसरातील घेण्यात आलेली आहे. राजपुरी खाडीतील या बंदराचा विकास आणि त्यानंतर कारभार चालविण्यासाठी 50 वर्षांची सवलत केंद्र सरकारने दिलेली आहे.हे बंदर फ्रेट कॉरिडोरचाही एक भाग असून ते लवकरात लवकर कार्यान्वित व्हावे यासाठी बंदर विभागाचे प्रयत्न सुरू आहेत. रेल्वेमार्गासाठी लागणार्‍या भूसंपादनात ज्यांच्या जमिनी जाणार आहेत त्यांना महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम 1961 यांच्या कलम 32 (2)खालील व्यक्तिगत नोटीस अलिबाग उपविभागीय अधिकारी यांच्याकडून देण्यात आल्या आहेत. अदानी पोर्टर अ‍ॅण्ड लॉजिस्टीक पार्क कंपनीकरिता रोहा जंक्शन ते आगरदांडा पोर्ट रेल्वे लाईनसाठी तालुक्यातील उसडी, आगरदांडा, नांदले व हाफीजखार या गावातील 65 जणांची 1764.73 हेक्टर जमीन रेल्वे ट्रॅकमध्ये जाणार आहे. त्यांना 27 जुलै रोजी नोटीस देण्यात आल्या असून याबाबत व्यक्तीगत सुनावणी करण्याची इच्छा असेल तर या नोटीसीच्या तारखेपासून एक महिन्याच्या आत भेटीची वेळ ठरवून कोणत्याही कामाच्या दिवशी सकाळी 11 ते 1 वाजेपर्यंत स्वत: किंवा कायदेशीर मुखत्यारामार्फत हजर राहता येईल, अशी माहिती उपविभागीय अधिकारी यांनी नोटीसमध्ये नमूद केले आहे.
आगरदांडा ग्रामपंचायत परिसरातून रेल्वेची मालगाडी येत असल्याने पंचक्रोशी भागातील व मुरूड शहरातील नागरिकांकडून आनंद व्यक्त करण्यात येत आहे. स्थानिक शेतकर्‍यांनी आपल्या जमिनीला बाजारभावाप्रमाणे दर देण्यात यावा, अशी मागणी केली आहे. शेतकर्‍यांना योग्य भाव मिळाल्यास जमीन हस्तांतरण प्रक्रिया सोपी होणार आहे. दिघी बंदरात येणारा माल हा मालगाडीच्या साह्याने विविध ठिकाणी पोहचवण्यासाठी येथे केंद्र सरकारच्या परवानगीने रेल्वे आणण्यात आली आहे. रेल्वे आल्याने बंदराच्या विकासाबरोबरच परिसरात दळणवळणाचे साधन लोकांना उपलब्ध होणार आहे.

Check Also

खोपोलीत 106 कोटींचे ड्रग्ज जप्त

पोलिसांची कंपनीत कारवाई, त्रिकूट ताब्यात खोपोली, खालापूर : प्रतिनिधी खोपोली पोलिसांनी ढेकू गावच्या हद्दीतील एका …

Leave a Reply