Breaking News

ऑलिम्पिकच्या आव्हानासाठी भारतीय नेमबाज सज्ज -सुमा शिरूर

मुंबई ः प्रतिनिधी

टोकियो ऑलिम्पिकच्या आव्हानासाठी भारतीय नेमबाज पूर्णपणे सज्ज आहेत, असे मत भारतीय कनिष्ठ नेमबाजी संघाच्या प्रशिक्षिका सुमा शिरूर यांनी व्यक्त केले आहे. भारताने 15 सुवर्णपदकांसह एकूण 30 पदके मिळवत आयएसएसएफ विश्वचषक नेमबाजी स्पर्धेवर वर्चस्व गाजवले. त्या पार्श्वभूमीवर शिरूर बोलत होत्या.

भारतीय राष्ट्रीय रायफल संघटना (एनआरएआय) आणि भारतीय क्रीडा प्राधिकरणाने (साइ) जैव-सुरक्षित वातावरणात आयोजित केलेल्या तीन सराव शिबिरांचा नेमबाजांना खूप फायदा झाला. आता पुढील चार महिन्यांत टोकियो ऑलिम्पिकसाठी आम्हाला कसून तयारी करावी लागेल. खेळाडूही सर्वस्व पणाला लावून ऑलिम्पिक पदक पटकावण्यासाठी सज्ज झाले आहेत, असेही शिरूर यांनी सांगितले.

कोरोनाच्या टाळेबंदीचा सरावावर कोणताही परिणाम झाला नाही हे भारतीय नेमबाजांनी या स्पर्धेतदाखवून दिले. कल्पकतेने सराव करत भारतीय नेमबाजांनी अप्रतिम कामगिरीची नोंद केली. शिरूर यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करणार्‍या दिव्यांश सिंह पनवार आणि ऐश्वर्य प्रताप सिंह तोमर यांनी वैयक्तिक पदकांवर नाव कोरले. युवा नेमबाजांच्या कामगिरीविषयी शिरूर म्हणाल्या की, कनिष्ठ खेळाडूंनी खूप चांगली कामगिरी केली. वयाने लहान असले तरी आपणही काही कमी नाहीत हे त्यांनी दाखवून दिले. गेल्या चार वर्षांपासून भारतीय संघासोबत असणारे हे युवा नेमबाज कठोर मेहनत घेत आहेत. संघटनेने कनिष्ठ नेमबाजांसाठी आखलेल्या कार्यक्रमाचे हे फलित आहे.

Check Also

पनवेल विधानसभा क्षेत्रात नमो चषक 2025 भव्य क्रीडा महोत्सव

खारघरमध्ये भव्य क्रिकेट, कळंबोलीत कुस्ती, तर कामोठ्यात व्हॉलीबॉल, रस्सीखेच आणि फुटबॉल स्पर्धा पनवेल : रामप्रहर …

Leave a Reply