रोहा, धाटाव : प्रतिनिधी
येथील सुदर्शन केमिकल इंडस्ट्रीज या कंपनीच्या वतीने रोहा उपजिल्हा रुग्णालय, आंबेवाडी प्राथमिक आरोग्य केंद्र आणि कोकबन लसीकरण केंद्रास नुकताच आरोग्यविषयक व रुग्णोपयोगी साहित्याची भेट दिली. जागतिक रंगद्रव्ये उत्पादनात अग्रेसर असणारी धाटाव येथील सुदर्शन केमिकल कंपनी सामाजिक कार्यामध्येही नेहमीच अग्रेसर राहिली आहे. कंपनीतर्फे ग्रामीण भागात आरोग्य तपासणी शिबिर, रक्तदान शिबिर, गरजुंना उपचारासाठी मदत, कोरोना काळात निर्जंतुकीकरण फवारणी, गरजू कुटुंबांना धान्य वाटप, कोरोनाविषयक जनजागृती अशा प्रकारचे उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून कंपनीच्या सीएसआर फंडातून रोहा उपजिल्हा रुग्णालयास वॉशिंग मशीन, 100 पीपीई किट, हॅन्डग्लोज, आंबेवाडी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या शस्त्रक्रिया विभागासाठी एसी, वाशिंग मशीन, आणि कोकबन लसीकरण केंद्रास खुर्च्या भेट देण्यात आल्या. उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकिय अधीक्षक डॉ. अंकिता खैरकर, आंबेवाडी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकिय अधिकारी डॉ. कृष्णा चव्हाण, सुदर्शन केमिकल्सचे अधिकारी, कर्मचारी आणि आरोग्य कर्मचारी या वेळी उपस्थित होते.
सुदर्शनच्या सीएसआर फंडातून प्राथमिक आरोग्य केंद्रातील ऑपरेशन थिएटरसाठी उपलब्ध करून दिलेल्या एसीमुळे शस्त्रक्रिया करण्यास मदत होणार आहे.
-डॉ. कृष्णा चव्हाण, वैद्यकिय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र, आंबेवाडी, ता. रोहा
सुदर्शनकडून देण्यात आलेल्या अत्याधुनिक मशिनमुळे कोविड रुग्णांना अत्यावश्यक प्राणवायू देण्यास मदत होत आहे. यापुढेही सुदर्शनचे सहकार्य मिळावे.
– डॉ. अंकिता खैरकर, वैद्यकिय अधीक्षक, उपजिल्हा रुग्णालय, रोहा