Breaking News

प्लास्टर ऑफ पॅरिस मूर्तीवरील बंदी उठवावी

मूर्तिकार संघटनेची राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणात धाव

कर्जत : प्रतिनिधी

प्लास्टर ऑफ पॅरिसच्या तुलनेत शाडू मातीच्या मूर्तींमुळे जास्त प्रमाणात जलप्रदूषण होते. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती विसर्जन केल्यावर पाण्याच्या ’पीएच’ वर (हायड्रोजन आयोन कॉन्सेन्ट्रेशन दर्शविणारे परिणाम) कोणताही परिणाम होत नाही. पण शाडू मातीच्या मूर्तीमुळे पाण्यातील ’पीएच’ कमी होऊन ते पाण्याला अम्लीय (एसेटिक) आणि गढूळ करते, असा दावा करीत हमरापूर विभाग गणेश मूर्तिकार उत्कर्ष मंडळ या मूर्तिकार संघटनेने प्लास्टर ऑफ पॅरिस मूर्तीवरील बंदी उठविण्यासाठी राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाकडे (एनजिटी) धाव घेतली आहे.

गणेशमुर्तीं तयार करण्यासाठी पेण हे जगप्रसिद्ध आहे. पुर्वी फक्त पेण शहरातच गणेश मूर्ती तयार करण्याचे कारखाने होते. आता पेण तालुक्यातील बहुतांश गावांमध्ये हे कारखाने सुरू आहेत. त्याच्यावरच अनेक कुटुंबे अवलंबून आहेत. सुरुवातीला शाडूच्या मूर्ती साकारल्या जात होत्या. पण आता हाताळायला सोप्या व जास्त मूर्ती बनविता येतात म्हणून सर्वच ठिकाणी प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती तयार केल्या जातात. मात्र प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती बनविण्यास बंदी करण्यात येत असल्याने संपूर्ण पेण तालुक्यातीलच नव्हे तर देशभरातील कारागीर व कारखानदार रस्त्यावर येतील व त्यांच्यावर उपासमारीची वेळ येईल शिवाय शाडूच्या मूर्ती मोठ्या प्रमाणात तयार करता येणार नाहीत. एक कारागीर दिवसाला शाडूची एकच मूर्ती तयार करू शकतो तर प्लास्टर ऑफ पॅरिसच्या दहा मूर्ती तयार करू शकतो. पावसाळा सुरू झाल्यावर शाडूच्या मातीच्या मूर्ती तयार करता येत नाहीत, म्हणून ऐंशी टक्के भाविकांना त्या उपलब्ध करून देता येणार नाहीत, असे गणेश मूर्तिकारांचे म्हणणे आहे.

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने (सीपीसीबी) पर्यावरणास हानिकारक असल्यामुळे प्लास्टर ऑफ पॅरिस च्या गणेश मूर्ती बनविण्यावर बंदी घातली. सीपीसीबीच्या  मार्गदर्शक तत्वानुसार प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींमुळे पाण्यातील प्रदूषण वाढते. यासाठी नुकतेच मूर्तिकार संघटनेकडून शाडू माती व प्लास्टर ऑफ पॅरिसचा शास्त्रीय अभ्यास करण्यात आला. त्यानुसार शाडू मातीच्या मूर्तींमुळे अधिक प्रदूषण होत असल्याचा दावा करण्यात आला आहे. या चाचणीच्या आधारावर प्लास्टर ऑफ पॅरिसवरील बंदी रद्द करण्यासाठी मूर्तिकार संघटनेच्या वतीने एनजीटीमध्ये दावा दाखल केल्याची माहिती गणेश मूर्तिकार उत्कर्ष मंडळाचे सल्लागार अजय वैशंपायन यांनी दिली.

पॉलिटेस्ट प्रयोगशाळेच्या चाचणीतून हे झाले स्पष्ट

* प्लास्टर ऑफ पॅरिसच्या तुलनेत शाडू मातीमुळे पाण्याचे प्रदूषण जास्त

* प्लास्टर ऑफ पॅरिस मध्ये कॅल्शियम व सल्फेट हे दोन प्रमुख घटक असून इतर घटक अल्पप्रमाणात

* शाडू मातीच्या मूर्तींमुळे कॉपर, अल्युमिनियम, आर्सेनिक, पारा, शिसे, झिंक आदी घातक पदार्थ पाण्यात मिसळतात.

राष्ट्रीय मान्यता मंडळ (एनएबीएल) ची मान्यता असलेल्या पिरंगुट येथील पॉलिटेस्ट प्रयोगशाळेत प्लास्टर ऑफ पॅरिस आणि शाडू मातीची पावडर चाचणीसाठी पाठवली होती. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या तुलनेत शाडू मातीमुळे जास्त जलप्रदूषण होते, असा पॉलिटेस्ट प्रयोगशाळेचा अहवाल आहे.

-अजय वैशंपायन, सल्लागार, गणेश मूर्तिकार उत्कर्ष मंडळ, हमरापूर विभाग, ता. पेण

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply