लंडन ः वृत्तसंस्था
भारताविरुद्ध होणार्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेआधी इंग्लंड संघाला मोठा झटका बसला आहे. 4 ऑगस्टपासून सुरू होणार्या या मालिकेतून इंग्लंडचा जलद गोलंदाज जोफ्रा आर्चर जवळजवळ बाहेर झाला आहे.
भारत दौर्यावर असताना आर्चरला दुखापत झाली होती. त्यानंतर तो काही दिवस मैदानाबाहेर होता, पण काऊंटी क्रिकेटमध्ये खेळताना त्याच्या दुखापतीने पुन्हा डोके वर काढले. आर्चरच्या कोपराला दुखापत झाली होती. आता ताज्या अपडेटनुसार आर्चरवर शस्त्रक्रिया होणार आहे. या शस्त्रक्रियेनंतर त्याला मैदानावर परतण्यास मोठा कालावधी लागू शकतो.
इंग्लंड क्रिकेट बोर्डाने सोशल मीडियावर दिलेल्या माहितीनुसार, जोफ्रा आर्चरच्या दुखापतीसंदर्भात डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला आहे. दुखापतीमुळेच आर्चर न्यूझीलंडविरुद्ध होणार्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतून याआधीच बाहेर झालाय.
काऊंटी चॅम्पियनशिपमध्ये ससेक्स संघाकडून खेळताना आर्चरला ब्लॅक कॅप्स ही दुखापत झाली आहे. गोलंदाजी करताना त्याला याचा त्रास होतोय. या वर्षी भारताविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांत आर्चरला दुखापतीमुळे खेळता आले नव्हते. त्यानंतर आयपीएलच्या 14व्या हंगामातदेखील तो खेळू शकला नव्हता. इंग्लंडला भारताविरुद्ध पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळायची असल्याने आर्चर नसताना त्यांना फटका बसू शकतो.