सोमवारपासून अंमलबजावणी
पेण : प्रतिनिधी
नवीन वाहनांसाठी उच्च सुरक्षायुक्त नोंदणी पाट्या (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट-एचएसआरपी) बंधनकारक करण्यात आल्या आहेत. 1 एप्रिलपासून या नियमाची अंमलबजावणी होणार आहे. याबाबत पेण प्रादेशीक परिवहन विभागाच्या प्रमुखांनी विक्रेत्यांची बैठक घेऊन गाड्या विक्री करतानाच एचएसआरपी नंबर प्लेट बनवून देण्याबाबत सूचना केल्या आहेत.
वाहनाच्या सुरक्षेसाठी तसेच परिवहन विभागाकडे योग्य नोंदी राहण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने 13 वर्षापूर्वीच एचएसआरपी सुरू करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार केंद्रीय परिवहन मंत्रालयाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे राज्य परिवहन विभागाने एचएसआरपी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.
या नवीन नियमानुसार वाहनांच्या एचएसआरपी नंबरप्लेट वाहन निर्मिती कंपन्यांनाच बनवून द्याव्या लागणार आहेत. तर विक्रेते क्रमांक तयार करून देणार आहेत. मोठ्या विरोधानंतर या निर्णयाची अंमलबजावणी होत असल्याने सर्वांचे लक्ष याकडे लागले आहे. सोमवार (दि. 1) पासून रायगड जिल्ह्यात विक्री होणार्या प्रत्येक नवीन वाहनांवर एचएसआरपी नंबरप्लेटच लावण्यात येणार आहेत. यामुळे वाहनचोरीच्या प्रकारांना ब्रेक बसू शकतो. तसेच दादा, भाऊ, नाना असे नंबर प्लेटवरील शब्दही हद्दपार होतील. एचएसआरपी नंबरप्लेटमुळे नंबरप्लेट बदलणे, क्रमांकात बदल करणे किंवा त्यावर दुसरा क्रमांक नोंदणे असे प्रकार शक्य होणार नाही. याचा थेट फायदा पोलिसांनासुद्धा होणार आहे.
सध्या नवीन वाहनांवर लक्ष केंद्रित करण्यात आले असून, भविष्यात जुन्या वाहनांसाठीसुद्धा हा एचएसआरपी नंबरप्लेटचा नियम लागू होऊ शकतो, अशी माहिती सूत्रांनी दिली. एचएसआरपी नंबरप्लेटमुळे आरटीओ, वाहतूक पोलिसांनी बारकोड स्कॅन केल्यास वाहनाची पूर्ण माहिती मिळणार आहे. यामुळे प्रत्यक्ष मालक, वाहनाची विक्री, हस्तांतरण, चोरी या घटना सहज उघडकीस येणार आहेत, तर वाहतूक नियम तोडणार्या वाहनांना पकडणे सहज सोपे होणार आहे.