चक्रीवादळामुळे फळगळतीबरोबरच झाडांचेही नुकसान
अलिबाग : प्रतिनिधी
अरबी समुद्रात आलेल्या तौक्ते चक्रीवादळाचा रायगड जिल्ह्यातील आंबा बागायतींना मोठा फटका बसला आहे. ऐन काढणीच्या हंगामातच वादळाने आंबा गळून पडल्याने बागायतदारांना मोठ्या नुकसनीला समारे जावे लागले आहे. हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून नेल्याने बागायतदार कपाळाला हात लावून बसले आहेत.
कोकणात मार्चपासूनच आंब्याचा हंगाम सुरू होतो मात्र रायगडमधील हापूस आंबा मे महिन्याच्या मध्यावर काढणीला येतो. सध्या आंब्याची काढणी सुरू असतानाच वादळाने दणका दिला. जिल्ह्यात सुमारे दीड ते दोन हजार हेक्टरवरील आंबा पिकाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जातो आहे. वादळाने आंब्याची गळती मोठ्या प्रमाणावर झाली असून बागांमध्ये आंब्यांचा अक्षरशः सडा पडलेला पहायला मिळतो आहे. काही आंब्याची झाडे मूळापासून उन्मळून पडली आहेत. पडलेल्या आंब्याचे तर नुकसान झाले आहे. परंतु झाडावर उरल्या सुरल्या फळांनाही आता भाव मिळणार नाही, याचीही चिंता इथल्या बागायतदारांना भेडसावत आहे.
यंदा सुरूवातीला आंब्याला चांगला मोहोर आला होता मात्र मार्च महिन्याच्या अखेरीस कोकणात कडक उन्हाळा जाणवत होता. पारा 42 अंशांवर पोहोचला होता. त्यात मोहोर करपून गेला होता. यंदा आंब्याचे पीक कमी होते, मात्र बाजारात चांगला भाव मिळत होता. लॉकडाऊन असला तरी शेतीक्षेत्राला यातून सवलत देण्यात आल्याने बागायतदार आपला माल ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यात यशस्वी झाले होते. मात्र ऐन मोसमातच वादळाने मोठा दणका दिल्याने ते हवालदिल झाले आहेत.
गेल्यावर्षी निसर्ग चक्रीवादळाने आंबा पिकांचे फार नुकसान झाले नव्हते. मात्र झाडांची मोठ्या प्रमाणावर पडझड झाली होती. त्या संकटातून सावरत असतानाच वर्षभराच्या आतच हा दुसरा फटका निसर्गाने दिला आहे.
आता सरकारी यंत्रणेने पंचनाम्याचे काम सुरू केले आहे. सरकारकडून तुटपुंजी मदतही मिळेल. मात्र त्यातून झालेले नुकसान तर भरून येणार नाही. सातत्याने होणार्या या निसर्गाच्या प्रकोपामुळे बांगायदारांचे पुरते कंबरडे मोडले आहे.
यंदा आंब्याचे पीक कमी असले तरी बाजारात दर चांगला मिळत होता. हंगाम जोरात असतानाच चक्रीवादळाने फळे गळून पडली आहेत. आमच्या बागेत सुमारे चार हजार पेट्या इतकी फळ गळती झाली आहे. झाडेही उन्मळून पडली आहेत. पाऊस झाल्याने उरलेल्या फळांनाही भाव मिळणार नाही.
-संदेश पाटील, बागायतदार, अलिबाग
उन्हाळी भातपीकालाही तडाखा
तौक्ते चक्रीवादळात रायगड जिल्ह्यातील उन्हाळी भातशेतीही उद्ध्वस्त झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. भाताचे कोठार अशी ओळख असलेल्या रायगड जिल्ह्यातील माणगाव, रोहा, कर्जत तालुक्यात सुमारे अडीच हजार हेक्टर जमिनीवर उन्हाळी भाताचे पीक घेतले जाते. मे महिन्यात कापणी करून शेतकरी झोडणीच्या तयारीत असतानाच चक्रीवादळाने तडाखा दिला. तीन दिवस झालेल्या अवकाळी संततधार पावसाने शेतात तळी झाली आहेत. परिणामी यंदाचे सर्व पीक पाण्यात गेले आहे.