पनवेल : रामप्रहर वृत्त
धर्मादाय रुग्णालयातील आरक्षित खाटा निर्धन व दुर्बल घटकांतील रुग्णांसाठी पारदर्शक पद्धतीने उपलब्ध करून देण्याकरिता राज्य शासनाने समिती गठीत केली असून रायगड जिल्ह्याच्या समितीवर पनवेल विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रशांत ठाकूर आणि उरण विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश बालदी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्तव्यवस्था अधिनियम 1950च्या कलम 41 ‘अ’मधील तरतुदी व त्या अनुषंगाने मुंबई उच्च न्यायालयाने रिट याचिका (पीआयएल) क्रमांक 3132/2004मध्ये दिलेल्या न्यायनिर्णयानुसार निर्धन व दुर्बल घटकांतील रुग्णांवर मोफत व सवलतीच्या दराने वैद्यकीय उपचार मिळण्याकरिता योजना तयार केलेली आहे. त्यानुसार प्रत्येक धर्मादाय रुग्णालयाने त्यांच्या रुग्णालयातील एकूण कार्यान्वित खाटांपैकी 10 टक्के खाटा निर्धन रुग्णांवर मोफत उपचार करण्यासाठी आणि 10 टक्के खाटा दुर्बल घटकांतील रुग्णांवर सवलतीच्या दराने उपचार करण्यासाठी राखून ठेवणे या रुग्णालयांना बंधनकारक आहे. त्या अनुषंगाने धर्मादाय रुग्णालयात निर्धन व दुर्बल घटकांतील रुग्णांसाठी आरक्षित खाटा पारदर्शी पद्धतीने त्यांना उपलब्ध करुन देण्यासाठी विधी व न्याय विभागाच्या संदर्भाने शासन निर्णयान्वये राज्यस्तरीय विशेष मदत कक्ष स्थापन करण्यात आला आहे.
राज्यस्तरीय विशेष मदत कक्षाला सहाय्य करण्यासाठी राज्यात जिल्हास्तरीय समिती पुनर्गठीत करण्यात आली आहे. त्यानुसार शासनाने गठीत केलेल्या समितीच्या अनुषंगाने रायगड जिल्हास्तरीय समितीवर सदस्य म्हणून आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी यांची नियुक्ती करण्यात आली असून तसा शासन निर्णय जाहीर करण्यात आला आहे.
Check Also
कर्जतमध्ये तिहेरी हत्याकांड
जमिनीच्या वादातून कुटुंबातील तिघांचा खून; संशयित तरुण पोलिसांच्या ताब्यात कर्जत, नेरळ : प्रतिनिधी कर्जत तालुक्यातील …