शेतकर्याने मागितली जलसंधारण विभागाकडे दाद
कर्जत : बातमीदार
तालुक्यातील बोरगाव येथील पोश्री नदी पात्रात सिमेंट बंधारा बांधण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. हे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत असल्याचा आरोप येथील शेतकर्यांनी केला आहे.
बंधारा बांधतांना शेताचे बांध उखडून टाकण्यात आल्याचा आरोपदेखील शेतकर्यांनी केला असून त्याबाबत राज्य शासनाच्या जलसंधारण विभागाकडे दाद मागण्यात आली आहे.
राज्य शासनाच्या जलसंधारण विभागाकडून कर्जत तालुक्यात अनेक ठिकाणी नदी पात्रात बंधारे बांधण्यात येत आहेत. बोरगाव येथील पोश्री नदी पात्रात जलसंधारण विभागाकडून सुमारे 65 लाख रूपये खर्च करून सिमेंट काँक्रीटचा बंधारा बांधण्याचे काम सुरू आहे. मात्र हे काम करीत असताना ठेकेदाराने शेताचा बांध उखडून टाकला असून, बंधार्याचे कामदेखील निकृष्ट दर्जाचे होत असल्याचा आरोप शेतकरी दत्तात्रेय खडेकर यांनी केला आहे. सिमेंट काँक्रीटचा बंधारा बांधताना त्यात मोठ्या प्रमाणात दगड, डबर टाकण्यात येत आहे. त्यामुळे या संपुर्ण कामाची चौकशी करावी अशी मागणी दत्तात्रेय खडेकर यांनी जलसंधारण विभागाच्या कर्जत कार्यालयाकडे केली आहे.
बोरगाव येथे अत्यंत निकृष्ट दर्जाचा बंधारा बांधण्यात येत असून, त्यासाठी आमच्या शेताचा बांध आम्हाला न विचारता उखडून टाकला आहे. शासनाने या बंधार्याच्या कामाची चौकशी करून ठेकदारावर कारवाई करावी.
-दत्तात्रेय खडेकर, शेतकरी, बोरगाव, ता. कर्जत
बंधार्याच्या कामाबद्दल तक्रारी असतील तर तात्काळ कामाची पाहणी केली जाईल. बोरगाव येथील बंधारा हा साठवण बंधारा असल्याने पावसाळा संपल्यावर प्लेट लावून त्यात पाणी अडवले जाते.
-सुरेश इंगळे, उपअभियंता, जिल्हा परिषद लघु पाटबंधारे विभाग, कर्जत