प्रकल्पग्रस्तांचे रणझुंझार नेते दि. बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला द्यावे, असा समस्त स्थानिक भूमिपुत्रांचा आग्रह आहे. त्यासाठी रायगडसह नवी मुंबई, ठाणे, मुंबई, पालघरमध्ये चळवळ उभी राहत आहे. यानिमित्ताने ‘दिबां’च्या आठवणींना पुन्हा एकदा उजाळा देणारी मालिका…
सिडकोविरुद्ध लोकनेते दि. बा. पाटील गावागावात बैठका घेऊन लोकजागृती करीत होते. जमिनीला योग्य भाव तर मिळालाच पाहिजे, पण आमच्या पुनर्वसनाचा प्रश्नही सुटला पाहिजे. आमच्या वडिलोपार्जित पिकत्या जमिनी सरकार आमच्याकडून हिसकावून घेत असेल तर आमच्या रोजीरोटीचे काय? आमच्या पुढील पिढ्यांचे भवितव्य काय? अशा अनेक प्रश्नांबाबत शेतकरी, शेतमजूर चिंतेत होते. त्यांना ‘दिबा’ हाच एक आधार वाटत होता. त्यामुळे ‘दिबां’च्या आवाहनाला प्रतिसाद देत ते संघटित होत होते, संघर्षासाठी तयार झाले होते. त्याची पहिली ठिणगी पडली ती वाशी गावात.
1971 साली वाशी गावात सिडकोचे अधिकारी जमीन संपादनासाठी येणार होते. ही बातमी गावकर्यांना कळताच, त्यांनी दि. बा. पाटील यांच्याशी संपर्क साधला. ‘दिबां’नी त्यांची माहिती घेऊन सिडको आणि स्थानिक पोलिसांना नोटीसा दिल्या. गावकर्यांचा या जमीन संपादनास पूर्ण विरोध असून सिडकोने जबरदस्तीने जमीन संपादन करण्याचा प्रयत्न केल्यास गावकरी त्याला तीव्र विरोध करतील. अशा प्रसंगी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याला सिडकोच जबाबदार असेल.
दि. बा. पाटील यांनी दिलेल्या या नोटीशीमुळे सिडको आणि पोलीस त्या दिवशी जमीन संपादन करण्यासाठी मोठा फौजफाटा घेऊन आले, पण वाशी गावकर्यांनीही निर्धार केला होता. कितीही मोठा संघर्ष करावा लागला तरी सिडकोला जमीन द्यायची नाही. त्यामुळे सकाळपासून गावकरी, शेतकरी, शेतमजूर घरातील महिला, मुलाबाळांसह मोठ्या संख्येने गावात जमू लागले. मच्छीमार महिला, त्या दिवशी आपला व्यवसाय बंद ठेवून यात सहभागी झाल्या होत्या. ‘दिबां’च्या नेतृत्वाखाली सर्वांचे मनोबल वाढले होते.वाशी गावचे सरपंच शांताराम पाटील यांनी अतिशय मेहनतीने या सार्यांचे उत्तमरित्या नियोजन केले होते. त्यामुळे सिडकोविरुद्धचा संताप प्रत्येकाच्या मनात खदखदत होता.
दि. बा. पाटील त्या दिवशी सकाळी 10 वाजता वाशी गावात आले. त्यांच्याबरोबर भांडूपच्या मनोरमा पाटील आणि हसमुख शहाही होते. त्यांना पहाताच गावकर्यांनी त्यांचे जोरदार घोषणाबाजी करून स्वागत केले.
या लढ्याच्या आदल्या दिवशी वाशीकरांनी आजूबाजूच्या गावकर्यांची भेट घेऊन त्यांना या लढ्यात सहभागी होण्याची विनंती केली होती. त्यामुळे करावे गावातील तरुणांनी या लढ्यासाठी भुमिपुत्रांचा लढा या नावाची जी संघटना स्थापन केली होती. त्यांनी वाशीच्या लढ्यात सहभागी होण्याचा ताबडतोब निर्णय घेतला आणि ते सारे तरुण मोठ्या संख्येने या लढ्यात सहभागी झाले. वाशीकरांचा उत्साह वाढला. या सर्वांनी सिडकोविरुद्ध प्रचंड घोषणा द्यायला सुरुवात केली. या घोषणांनी सारा आसमंत दणाणून गेला.
दि. बा. पाटील, मनोरमा पाटील, हसमुख शहा, सरपंच शांताराम पाटील तसेच उपसरपंच, अशी सर्व नेतेमंडळी आंदोलकांच्या पुढे उभी होती. ही सर्व मंडळी सिडकोच्या अधिकार्यांना जमीन ताब्यात घेण्यास अटकाव करीत असतानाच पोलिसांनी जमावावर लाठीहल्ला करण्यास सुरुवात केली. गावकरी चिडले. त्यांनी न घाबरता पोलिसांना प्रतिकार केला. दरम्यान, पोलिसांचा हा फौजफाटा आंदोलकांचे नेतृत्व करणार्या दि. बा. पाटील, मनोरमा पाटील आणि हसमुख शहा यांच्या अंगावर धावून गेला. त्यांनी हात वर करून जमावाला शांत करण्याचा प्रयत्न केला, पण एसीपी सरफरे आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुलकर्णी यांनी त्या तिघांसह अनेकांना अटक केली. त्यांच्या अटकेमुळे जमाव अधिक प्रक्षुब्ध झाला आणि त्यांनी सिडको अधिकार्यांना अक्षरशः पिटाळून लावले. पोलिसांबरोबरही हातघाई झाली, पण गावकर्यांनी माघार घेतली नाही.ते जिद्दीने लढले. सिडकोविरुद्धचा आपला रोष त्यांनी आक्रमकपणे दाखवून दिला.
या सर्व आंदोलकांना पोलिसांनी अटक करून ठाण्यातील पोलीस मैदानात आणून उभे केले. सकाळपासून अन्नपाण्यावाचून उपाशी असलेल्या या आंदोलकांना पोलिसांच्या माणुसकीचा एक वेगळा अनुभव त्या ठिकाणी पाहायला मिळाला. कारण ज्या पोलिसांशी आंदोलकांनी झटापटी केल्या तेच पोलीस आंदोलकांना चहापाणी, नाष्टा देत होते. स्वत: एसीपी सरफरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुलकर्णी हेदेखील त्यात सहभागी झाले होते. त्यानंतर आंदोलकांना पोलिसांनी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने या सर्वांना बिनशर्त जामीन मंजूर केला.
यानंतर मात्र मनोरमा पाटील यांचे यजमान आणि भांडूप विभागातील ज्येष्ठ नेते दिना बामा पाटील यांनी या सर्व आंदोलकांच्या जामिनाची व वकिलांची व्यवस्था करून त्यांची सुटका केली.
या आंदोलनाचा सिडकोने एवढा धसका घेतला की त्यानंतर गावातील बर्याच तरुणांना त्यांनी नोकर्या दिल्या. काहींना रोजंदारीची कामे दिली.हे सर्व दि. बा. पाटील यांच्या खंबीर नेतृत्वामुळेच साध्य होऊ शकले. अशा प्रकारे सिडकोविरोधातीला वाशी गावचा हा पहिला लढा नवी मुंबईच्या इतिहासात अजरामर ठरला.
Check Also
रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा
पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …