उरण ः वार्ताहर
कोरोनाचा धोका असल्यामुळे नागरिकांनी कुठेही गर्दी करू नये, असे शासनाचे आदेश असतानाही बंदी आणि लॉकडाऊन झुगारून रविवारी (दि. 11) चिरनेरच्या अक्कादेवी धरणावर पर्यटकांनी तुफान गर्दी केली होती. दिवसभर या ठिकाणी मद्यधुंद पर्यटकांचा धिंगाणा सुरू होता. येथे आलेल्या पर्यटकांनी या पवित्र भूमीवर दारूच्या बाटल्या आणि कचर्याचा खच टाकला. त्याचा त्रास येथे राहणार्या गरीब आदिवासींना सहन करावा लागत आहे. उरण तालुक्यातील चिरनेर जंगल सत्याग्रह ज्या ठिकाणी झाला त्या ठिकाणी जंगल सत्याग्रहाच्या स्मृती म्हणून एक छोटेखानी धरण बांधले आहे. थोड्याशा पावसातही हे धरण तुडूंब भरून ओसंडून वाहते. या ठिकाणी चिरनेर जंगल सत्याग्रहातील आदिवासी हुतात्मा नाग्या कातकरी यांचे स्मारकही आहे. पावसाळ्यात अनेक पर्यटक येथे येतात, मात्र मागील वर्षीपासून कोरोना महामारीमुळे येथे पर्यटकांना येण्यास ग्रामपंचायतीने बंदी घातली आहे, पण असे असतानाही लॉकडाऊनचे नियम शिथिल झाल्याचा फायदा घेत रविवारी या धरणावर पर्यटकांनी मोठी गर्दी केली होती. येथे आलेल्या पर्यटकांनी आपल्या सोबत आणलेला खाऊ, दारूच्या बाटल्या, प्लास्टिक परिसरात अस्ताव्यस्त फेकून दिल्याने कचर्याचे साम्राज्य पसरले आहे. धरणाजवळच आदिवासी वस्ती आहे. पर्यटक आपली वाहने कुठेही रस्त्यात उभी करीत असल्यामुळे आदिवासींचा रस्ताच रोखला जातो. दारूच्या बाटल्यांच्या काचा फोडून टाकल्यामुळे येथे खेळणार्या मुलांना गंभीर दुखापतीही झाल्या आहेत. चिरनेर ग्रामपंचायतीने येथे पर्यटकांना येण्यास बंदी घातली आहे. सुरुवातीला काही दिवस पोलिसांनी येथून पर्यटकांना पिटाळून लावले, मात्र रविवारी कोणीही पोलीस येथे फिरकले नसल्यामुळे पर्यटकांनी धिंगाणा घालून मोठ्या प्रमाणात घाण केली. त्यामुळे यापुढे अक्कादेवी धरणावर धिंगाणा घालणार्या पर्यटकांना बंदी घालावी, अशी मागणी आदिवासी बांधव करीत आहेत.
चिरनेर गावात अनेकांचे श्रद्धास्थान असलेले प्रसिद्ध महागणपती मंदिर आहे. कोरोनामुळे कित्येक महिन्यांपासून हे मंदिर बंद आहे. याउलट अक्कादेवी धरणावर दर शनिवार-रविवारी मोठ्या संख्येने बाहेरगावातील पर्यटक येतात आणि धिंगाणा घालून कचरा करतात. अशा प्रकारे धिंगाणा घालणार्यांवर पोलीस किंवा ग्रामपंचायत कोणतीही कारवाई करीत नाही.
-जगदिश घरत, ग्रामस्थ, चिरनेर