रायगड जिल्ह्यातील भात पिकापाठोपाठ रायगड जिल्ह्यातील नारळ, सुपारीचे मोठे उत्पन्न घेतले जाते. मात्र कोरोना महामारी, लॉकडाऊन तसेच निसर्ग व तौत्के चक्रीवादळाच्या दणक्याने सुपारीसह नारळाची बहुतांशी झाडे जमिनदोस्त झाल्याने येथील नारळ उत्पादक बागायतदार व व्यापारी संकटात सापडले आहेत.
मुरुड तालुक्यातील बागायती क्षेत्रापैकी निम्म्याहून अधिक हेक्टर बागायत क्षेत्रातील हजारो नारळाची झाडे चक्रीवादळात भुईसपाट झाली आहेत. या झाडांवरील जवळपास ऐंशी टक्के कच्चा नारळ (शहाळी) या पूर्वी मुंबई, पुण्यासारख्या शहरात व्यापारी व दलालांमार्फत विक्रीसाठी जात असे. एका झाडाला एक हजार ते दोन हजार रुपये देऊन बागायतदार वर्ष अथवा पाच वर्षाच्या करारावर शहाळी कढण्याचा ठेका व्यापारी, दलाल यांना देतात. त्यातून बागायतदार, व्यापारी, दलाल व शहाळी काढण्यासाठी झाडावर चढणारे, नारळ गोळा करणारे, त्यांची वाहतूक करणारे तसेच शहरात विक्रीसाठी घेऊन जाणारे ट्रक, टेम्पो मालक यांना चार पैसे मिळत असत. लॉकडाऊन व दोन चक्रीवादळांमुळे त्या सर्वांना सद्या बेरोजगारीला तोंड द्यावे लागत आहे.
मुरुड तालुक्यातील नारळ पिकाखालील एकूण क्षेत्र 435 हेक्टर, सुपारी पिकाखालील क्षेत्र 416 हेक्टर आहे. 1590 हेक्टर क्षेत्रावर आंबा तर 61.60 हेक्टर क्षेत्रावर इतर पिके घेतली जातात. त्यापैकी निसर्ग चक्रीवादळात नारळ पिकाखालील 77.47 हेक्टर, सुपारी पिकाखालील 141.36 हेक्टर, आंबा पिकाखालील 628.82 हेक्टर आणि इतर पिकाखालील 44.39 हेक्टर क्षेत्र बाधीत झाले आहे. निसर्ग चक्रीवादळात नुकसान झालेल्या नारळाच्या प्रती झाडाला 250रुपये तर सुपारीच्या प्रती झाडाला 50 रुपये या प्रमाणे 2590 शेतकर्यांना भरपाईचे वाटप करण्यात आले आहे. तर तौत्के चक्रीवादळातील नुकसानीचे पंचनामे करण्याची प्रक्रिया सुरु आहे.
शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णांसाठी शहाळ्याचे पाणी म्हणजे जलसंजिवनी (एका शहाळ्याचे पाणी एका ग्लुकोज सलाईन एवढी एनर्जी मिळवून देते) असल्यामुळे शहरात कच्च्या नारळाला अर्थात शहाळ्यांना मोठी मागणी असते. सध्या केवळ ’कोरोना’ हेच एकमेव लक्ष्य असल्याने अन्य प्रकारचे रुग्ण काही अंशी मागे पडले आहेत त्यामुळेही शहाळ्यांचा खप कमी झाला आहे. लॉकडाऊनमुळे पर्यटकांचे प्रमाणही घटले आहे. एकेकाळी मुंबई व वाशी बाजारात रोज एक ट्रक म्हणजेच अडीच ते तीन हजार शहाळी तर आठवड्याला सुमारे आठ ते दहा ट्रक शहाळी जात होती. मात्र सध्या लॉकडाऊनमुळे आठवड्यातून ती एक ते दोन ट्रक शहाळी जात आहेत. तीच गत सुक्या नारळांचीही झाली आहे. सण, उत्सवांबरोबरच विवाह सोहळ्यासारख्या मंगलकार्यात लागणार्या श्रीफळांची विक्री कोरोना, लॉकडाऊनमुळे फारच कमी झाली आहे. चक्रीवादळात कच्च्या शहाळ्यांचे घडच्या घड पडल्यामुळे झाडांवर नारळच शिल्लक राहिले नाहीत. त्यामुळे सुक्या नारळांची बाजारात टंचाई निर्माण झाली आहे. तर उपलब्ध असलेले नारळ ग्राहकांना दुप्पट किंमत देऊन खरेदी करावे लागत आहेत. बाजारपेठा बंद असल्याने चढ्या किमतीत नारळ विक्री केली जात आहे. सलग दोन वर्षात दोन चक्रीवादळे झाल्याने उत्पादन घटले व मालाचा तुटवडा यामुळे नारळ व शहाळी यांचे भाव वधारले आहेत. त्यामुळे बाजारात नारळ, शहाळ्यांची विक्री करुन चार पैसे मिळविणार्या विक्रेत्यांच्या पोटावर पाय आले आहेत.
कोकणातील बहुसंख्य घराच्या मागील बाजूस नारळ, सुपारीच्या बागा असतात. या बागांतून मिळणार्या उत्पादनावरच घर खर्च चालत असतो. परंतु दोन चक्रीवादळांमुळे या बागायतदारांचे उत्पन्नाचे स्त्रोत घटले आहे. निसर्ग वादळातून बचावलेली नारळाची कित्येक झाडे तौत्केच्या दणक्याने भुईसपाट झाली असून, तर हे दोन्ही आघात झेलून उभ्या असलेल्या झाडांची पार रयाच निघून गेली आहे. त्यांना सावरायला दोनतीन वर्षाचा कालावधी लागेल तर नवीन लागवडीचे माड पुन्हा बहरण्यास खूप वर्षाचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे स्थानिक लोक हवालदिल असून शासने मदतीचा हात द्यावा, अशी त्यांची मागणी आहे.
रायगड जिल्हाधिकार्यांच्या आदेशाप्रमाणे मुरुड तालुक्यातील नुकसान झालेल्या बागायत क्षेत्राचे पंचनामे करण्यास सुरुवात केली आहे. आतापर्यंत 169 हेक्टर क्षेत्राचे पंचनामे पूर्ण करण्यात आले आहेत. तौत्के चक्रीवादळात नारळ, सुपारीचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, शासनाकडून निधी प्राप्त झाल्यावर नुकसान भरपाईची रक्कम त्वरीत देण्यात येणार असल्याचे मुरुड तालुका कृषी अधिकारी व्ही. डी. अहिरे यांनी सांगितले.
-संजय करडे, खबरबात