- डॉ. संजय कांबळे
प्राचार्य, सौ. एम. आर. जगताप महिला महाविद्यालय, जि. सातारा.
मानवी समूहाच्या अथांग सागरामध्ये अशी काही मोजकीच नररत्ने असतात की जी सर्वसामान्य जनतेला आपल्या हृदयाच्या कप्प्यात साठवून ठेवावीत असे वाटते. त्यापैकी एक व्यक्तिमत्त्व म्हणजे तुम्हा आम्हा सर्वांचे आदरणीय लोकनेते रामशेठ ठाकूरसाहेब होय. एखाद्या व्यक्तीचे व्यक्तिमत्त्व समजावून घ्यायचे असेल तर ती व्यक्ती ज्या वातावरणात वाढली आहे ते वातावरण, परिस्थिती (Man is made by his own environment) समजावून घ्यावी लागते. साहेबांकडे विलक्षण बुद्धिमत्ता आहे की, ज्यांच्या आधारे ते माहितीचे रूपांतर ज्ञानात, ज्ञानाचे रूपांतर शहाणपणात, शहाणपणाचे रूपांतर तत्काळ कृतीत करीत असतात.
अमेरिकेच्या संस्थापक जनकापैकी (Fouding Fathers) बेंजामिन फ्रैंकलिन एक होत. त्यांच्या विचाराच्या आधारे आदरणीय रामशेठ ठाकूरसाहेबांची मनोरचना समजून घेण्यास मदत होईल असे वाटते. ते म्हणतात की, स्वत:ला समजून घेण्यासाठी मोठ्या नम्रतेची गरज असते. स्वत:ला जाणणे हा सूज्ञतेचा प्रारंभ होय. स्वत:ला जाणण्यातूनच सारे विश्व जाणता येते. तुम्ही काय आहात ते पाहणे हाच एक मार्ग मोठा आश्चर्यकारक साक्षात्कार असतो. बेंजामिन फ्रैंकलिन यांचे तंतोतंत विचार साहेबांच्या व्यक्तिमत्त्वाला साजेसे आहेत.
आदरणीय रामशेठ ठाकूरसाहेबांचे बहुआयामी व्यक्तिमत्त्व समजावून घ्यायचे म्हटले तर मला असे प्रामाणिकपणे वाटते की, तो एक नियतीचा व निसर्गाचा चमत्कार असल्यासारखे आहे. जसे की इंद्रधनुष्य हा एक निसर्गाचा चमत्कार आहे. इंद्रधनुष्याला इंग्रजीमध्ये Rainbow म्हणतात. (A Rainbow is the arch of different colures that you sometimes seen in the sky, when it is raining) इंद्रधनुष्य म्हणजे पृथ्वीच्या वातावरणातील दवबिंदूवर पडलेल्या सूर्यप्रकाशाचे परावर्तन आणि अपवर्तन होऊन प्रकाशाचा वर्णपट दिसण्याची वातावरणातील प्रकाशीय घटना आहे. या वर्णपटात सात रंग असल्यामुळे त्याला सप्तरंगी इंद्रधनुष्य असे म्हणतात. मला असे वाटते की, सप्तरंगी इंद्रधनुष्याप्रमाणे लोकनेते रामशेठ ठाकूरसाहेबांच्या व्यक्तिमत्त्वाचे बहुआयामी पैलू समजावून घेता येऊ शकतात.
- लाल रंग : संस्कार शिदोरी, आई-वडील, सासरे
भारतीय संस्कृतीमध्ये लाल रंगाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. भारतीय विवाहित स्त्री कुंकवाला मांगल्याचे प्रतीक मानते. कारण कुंकू सौभाग्याचे प्रतीक आहे. आदरणीय रामशेठ ठाकूरसाहेब यांच्या आयुष्यात मातोश्री भागूबाई चांगू ठाकूर, पिताश्री चांगू काना ठाकूर व सासरे आणि राजकीय गुरू जनार्दन भगत यांना भावनात्मकदृष्ट्या त्यांच्या हृदयात एक वेगळेच आदराचे स्थान आहे. शेठना आयुष्यभर पुरेल एवढी ऊर्जा व शक्ती यांनी दिलेली आहे. त्यांच्या संस्काराच्या शिदोरीवरच त्यांची आदर्शवत वाटचाल सुरू आहे. मातोश्री व पिताश्रींनी स्वत: डोंगराएवढे कष्ट हालअपेष्टा सोसून रामशेठ ठाकूरसाहेबांना शिक्षणासाठी अखंड प्रेरणा दिली, तसेच राजकीय गुरू व सासरे जनार्दन भगत यांनी राजकीय क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी डावपेचाचे बाळकडू दिले. - नारंगी रंग : रयत वटवृक्षांच्या सावलीत
रंगाच्या कलाक्षेत्रामध्ये नारंगी रंग हा त्याग आणि ज्ञानाचे प्रतीक समजला जातो. यास साजेसे असेच कार्यकर्तृत्व लोकनेते रामशेठ ठाकूरसाहेबांचे आहे. सर्वसामान्य व्यक्तीच्या आयुष्याला कलाटणी देणारा क्षण (Turning Point) यावा लागतो. तो क्षण आदरणीय रामशेठ ठाकूरसाहेबांच्या आयुष्यात महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते प्रा. डॉ. एन. डी. पाटीलसाहेब यांचे विद्यार्थी मा. एस. बी. पाटील सर यांच्या रूपाने आला, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. लोकनेते रामशेठ ठाकूरसाहेब यांचे प्राथमिक शिक्षण माणगाव व माध्यमिक शिक्षण गव्हाणमध्ये झाल्यानंतर मा. एस. बी. पाटील सर यांनी त्यांना पुढील शिक्षणासाठी तीर्थरूप कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या कर्मभूमीतील छत्रपती शिवाजी कॉलेज सातारा येथे घेऊन आले. येथे ‘कमवा व शिका’ योजनेच्या महामंत्रातून स्वकष्टाने घाम गाळून, मन, मेंदू व मनगट यांचे नातेसंबंध घट्ट करून आयुष्याची पुढील गरूडझेप घेण्यासाठी स्वत:ची जडणघडण कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या शिष्याकरवी करून घेतली. टाकीचे घाव सहन केल्याशिवाय मोठेपणा प्राप्त होत नाही, असे म्हणतात ते खरंच आहे. त्यांची बौद्धिक, शारीरिक, मानसिक व सामाजिक क्षमता येथे पाच वर्षे शिक्षण घेत असताना प्रगत झाली. पुढील आयुष्यात आकाशाला गवसणी घालण्यासाठीचे गरूड पक्ष्याप्रमाणे पंखात बळ, दूरदृष्टी व कितीही उंचीवर आकाशात उड्डाण झाले तरी पाय मात्र कायम मातीशी घट्ट नाते सांगत कायम जमिनीवर स्थिर राहिले. लोकनेते रामशेठ ठाकूरसाहेबांनी जीवनात विविध क्षेत्रांत यशाची शिखरे पादाक्रांत केली तरी याचे श्रेय ते आजही रयतच्या संस्कारांस देतात व यातून उतराई होण्यासाठी तन-मन-धनाने ते सेवावृत्तीने कार्य करीत असतात. - पिवळा रंग : उद्यमशीलता
पिवळा रंग कलाक्षेत्रामध्ये गर्भश्रीमंतीचे प्रतीक मानला जातो. लोकनेते रामशेठ ठाकूरसाहेबांनी अतिशय परिश्रम, कष्ट करून अथक तपश्चर्येने 1973 साली बी.ए.बी.एड.पर्यंत शिक्षण पूर्ण करून विठोबा खंडप्पा हायस्कूल, पनवेल व न्यू बॉम्बे स्कूल, वाशी येथे शिक्षक म्हणून ज्ञानदानाचे काम केले, मात्र त्यांना उद्योग जगताचे क्षेत्र खुणावत असल्यामुळे व व्यक्तिमत्त्वामध्ये मूलभूत धडपड करण्याची व परिस्थितीशी दोन हात करीत संकटावर मात करण्याची ऊर्मी व विश्वास असल्यामुळे, जिद्द, धाडस, जोखीम स्वीकारण्याची वृत्ती यामुळे शिक्षकी पेशा त्यांनी सोडून दिला. या वेळी त्यांचा विवाह होऊन त्यांना एक पुत्ररत्न प्राप्त झाले होते. त्यांनी उद्योग क्षेत्रातील आव्हाने पेलली. स्वत:च्या उद्योगाची शून्यातून सुरुवात केली आणि आत्मविश्वासाने उद्योग जगत पादाक्रांत केले. उद्योग जगात यशस्वी होण्यासाठी लागणारे सर्व गुण साहेबांकडे होते. पर्सनल मॅनेजमेंट, ऑपरेशन मॅनेजमेंट व स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट या तिन्ही बाबींचे एकत्रित कौशल्य त्यांच्याकडे होते. उद्योगासाठी लागणारा जागतिक दृष्टिकोन त्यांच्याकडे असल्यामुळे त्यांनी देदीप्यमान यश संपादन केले आहे.
भारतातील द्रष्टे उद्यमशील व्यक्तिमत्त्व भारतरत्न सर विश्वेशरय्या यांनी उद्योग क्षेत्रातील यशस्वी होण्याचा मूलमंत्र सांगताना म्हटले आहे की, “Work, Industralise or Perish” (काम करा, उद्योगधंदे निर्माण करा (वाढवा) अन्यथा नष्ट व्हाल) तसेच ते नेहमी असे म्हणत असत की, माझी कृती हेच माझे विचार आहेत. काम, काम आणि अधिक काम, हा मूलमंत्र घेऊन यशाच्या वाटेवरून लोकनेते रामशेठ ठाकूरसाहेब मार्गक्रमण करीत असल्याचे आपणास दिसून येतात. साहेबांचे वेगळेपण हे आहे की, मातोश्री, पिताश्री आणि सासर्यांच्या विचारांचा वारसा व रयत शिक्षण संस्थेचे संस्कार असल्यामुळे जीवनमूल्यांची सांगड घालून आजही ते उद्योग क्षेत्रामध्ये शिखरावर सन्मानाने कार्यरत आहेत. - हिरवा रंग : लोकनेते पद, राजकारण, समाजकारण व शिक्षण
चित्रकलेच्या क्षेत्रात हिरवा रंग हा समृद्धी व शांततेचे प्रतीक म्हणून सर्वत्र मान्यता पावला आहे. आदरणीय रामशेठ ठाकूरसाहेबांनी सर्वसामान्यांशी नाळ जोडून जी कार्यसंस्कृती उभी केली आहे त्यामुळे सर्वसामान्य जनतेनेच त्यांना प्रेमाने लोकनेते ही पदवी दिलेली आहे. साहेबांनी इ. स. 1973पासून त्यांचे सासरे व राजकीय गुरू जनार्दन भगतसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली सक्रिय राजकारणाची सर्व बाराखडी व व्याकरणाचे धडे घेतले. मार्केट कमिटीच्या निवडणुका, सभापती, उद्योग जगतात स्वत:च्या कार्यकर्तृत्वाची मुद्रा उमटवत असतानाच साहेबांनी राजकारणातही प्रभावी भूमिका बजावली आहे. गावपातळीवरील ग्रामपंचायतीपासून पंचायत समिती, जिल्हा परिषद ते आमदारकीच्या निवडणुकीमध्येही त्यांची महत्त्वाची किंगमेकरची भूमिका राहिली आहे. रायगड जिल्ह्यातील जनतेने त्यांना दोन वेळेस खासदार म्हणून काम
करण्याची संधी दिली. साहेबांनी सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्याला प्राधान्य दिले. सामाजिक बांधिलकी स्वीकारून त्यांनी सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक आणि सांस्कृतिक विकास करण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. सर्वांगीण विकासाचा ‘रामशेठ ठाकूर पॅटर्न’ महाराष्ट्रासह देशानेही पाहिला आहे.
लोकसभेत रायगड जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करीत असताना साहेब सोमवार ते शुक्रवारपर्यंत दिल्लीत मतदारसंघाच्या प्रश्नांची सोडवणूक करायचे व शनिवार, रविवारी रायगड जिल्ह्यात सर्वसामान्यांची गार्हाणी सोडवायचे. त्यांनी आपल्या खासदार निधीचा उपयोग विधायक कामे करण्यासाठी केला. उदा. रस्ते, वाचनालय, व्यायामशाळा, संगणक, नळपाणी योजना, समाजमंदिरे, एस.टी. पिकअप शेड, शौचालय, गटारे व जलकुंभ इ. सुविधा निर्माण करून त्यांनी कार्याचा डोंगर उभा केला. खासदार निधीद्वारे कितीतरी नागरी सुविधा दिल्या जाऊ शकतात याचाच परिपाठ निर्माण केला. वयाच्या अवघ्या 54व्या वर्षी कोणत्याही निवडणुकीला उभे राहणार नाही, असा निर्धार केला. हे फक्त आणि फक्त रामशेठ ठाकूरसाहेबच करू शकतात. साहेबांची राजकारणातील ओळख अजातशत्रू व्यक्तिमत्त्व म्हणून आहे. लोकनेते रामशेठ ठाकूरसाहेबांचे सरळ साधे सूत्र आहे 80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण. समाजकारणाच्या बाबतीत असे म्हटले जाते की, प्रत्येक माणसाचा मोठेपणा हा त्याच्या सामाजिक कार्यातच असतो. (The greatness of a man lies in his social work.) साहेबांकडे स्वत:च अंग मोडून मेहनत करण्याची लहानपणापासून सवय आहे. त्यांचा संपूर्ण दिवस हा सामाजिक काम करण्यात जात असतो. लोकनेते रामशेठ ठाकूरसाहेबांनी खूप कमी कालावधीमध्ये पनवेल, उरण व रायगड जिल्ह्यात समाजकार्यातून न भूतो न भविष्यती सामाजिक आर्थिक विकास करून महाराष्ट्रालाच नव्हे, तर देशाला दिशादर्शक विकासपर्व उभे केले आहे.
शिक्षण क्षेत्र हे तर साहेबांचे सर्वांत आवडते क्षेत्र आहे. पनवेल, उरण व रायगड विभागात शैक्षणिक चळवळ उभी करून सर्वसामान्य, कष्टकरी, शेतमजूर व कामगार यांच्या मुला-मुलींना प्राथमिक, माध्यमिक व महाविद्यालयीन गुणवत्तापूर्ण शिक्षण देऊन त्यांच्यामध्ये शैक्षणिक क्रांती केली आहे. मातोश्री, पिताश्री व रयतच्या संस्काराची सर्व शिदोरी पणाला लावून आजच्या स्पर्धेच्या युगात आवश्यक असणारे व्यावहारिक व व्यावसायिक कौशल्यपूर्ण शिक्षण देण्यात यशस्वी झाले आहेत. साहेबांनी आपले सासरे जनार्दन भगत यांच्या नावे शिक्षण संस्था काढली. या माध्यमातून अल्पावधीत पनवेल व उरण पंचक्रोशीत गुणवत्तापूर्ण महाविद्यालयीन स्तरापर्यंत शिक्षणाची सोय उपलब्ध करून दिली आहे. या शिक्षण क्षेत्रासाठी त्यांनी अतिशय स्वकष्टाने मिळविलेली संपत्ती सढळ हाताने कुठल्याही मोठेपणाचा आव न आणता देऊन टाकली व अद्याप देत आहेत.
लोकनेते रामशेठ ठाकूरसाहेब यांच्या राजकारण, समाजकारण, शिक्षण क्षेत्रातील कार्याबद्दल सांगत असताना नेपोलियन बोनापार्ट यांचे विचार आठवतात. ते म्हणत असत की, मला माझ्या डोळ्यांच्या मर्यादा माहीत आहेत. मला माझ्या पायांच्या मर्यादादेखील माहीत आहेत, परंतु मला माझ्या कामाच्या मर्यादा कधीच माहीत नाहीत. - निळा रंग : कला व क्रीडाप्रेम
कलेच्या क्षेत्रामध्ये निळ्या रंगास भव्यतेचे प्रतीक समजले जाते. मनस्वी, तपस्वी व सृजनशील व्यक्तीचे गुणवैशिष्ट्य यातून व्यक्त होते. ते म्हणजे तो व्यक्ती जन्मजात रसिक असतो. लोकनेते रामशेठ ठाकूरसाहेबांनी अतिशय व्यस्त जीवनातूनही कला व साहित्याबाबत रसिकता जोपासली आहे. कलेचा विकास म्हणजेच मानवी संस्कृतीचा विकास आहे. व्यक्तीची, समूहाची व समाजाची श्रीमंती ही त्याच्यामध्ये झालेल्या कलेच्या विकासावरून ठरविली जाते. यासाठी साहेबांनी ‘सामाजिक विकास मंडळामार्फत’ संस्कृती व कलेसाठी पदरमोड करून कला व संस्कृतीचे संवर्धन केले आहे. यामध्ये आवर्जून उल्लेख करावा लागेल तो मल्हार महोत्सव, राज्यस्तरीय दिवाळी अंक स्पर्धा, भजनी मंडळ स्पर्धा इ. या सर्व आयोजनांमध्ये साहित्यक्षेत्राची ते विविध कार्यक्रमांत सहभागी होऊन सेवा करीत आहेत, तसेच ते सृजनशील रसिक श्रोत्याप्रमाणे रसग्रहणही करीत असतात.
व्यावसायिक यशाचे रहस्य सांगताना कॉर्पोरेट आयडॉल रतन टाटा हे त्यांच्या विद्यार्थीदशेतील सांघिक खेळाचे कौशल्य सांगताना असे म्हणतात की, सांघिक मैदानी खेळात विजय मिळविण्यासाठी सर्व खेळाडूंमध्ये ताळमेळ असणे गरजेचे असते. परस्पर सहकार्याची आणि संघात आपल्या वाट्याला आलेली जबाबदारी उत्कृष्टरीत्या पेलण्याची जबाबदारी प्रत्येकाला घ्यावी लागते. हा रतन टाटांचा गुण साहेबांकडे असल्याचे स्पष्ट होते.
पनवेल, उरण व रायगड जिल्ह्यातील क्रीडाप्रेमींना आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स असावे असे खूप दिवसांचे क्रीडाप्रेमी रामशेठ ठाकूरसाहेबांचे स्वप्न होते. ते स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी साहेबांनी दोन वर्षे तन-मन-धनाने व समर्पित भावनेने काम करून पनवेल व उरण यांच्या मध्यवर्ती असलेले उलवे नोड सेक्टर 16 येथे रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स अवघ्या वर्षात उभे करून शिवप्रतिज्ञा पूर्ण केली. आज या इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये इनडोअर व आऊटडोअर खेळाचे राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील आयोजन केले जात आहे. त्यापैकी इनडोअरमध्ये बॅडमिंटन, टेनिस, कॅरम, बुद्धिबळ, जलतरण, स्नूकर बिलियर्ड्स आदी 17 क्रीडा प्रकारांचे आयोजन केले जाते. आऊटडोअर खेळामध्ये दहापेक्षा जास्त खेळांचा समावेश असून त्यामध्ये फुटबॉल, रनिंग इ. खेळासह इतर सुविधा उदा. इंटरनेट, वायफाय, कॉन्फरन्स हॉल इ. सुविधा दिल्या जातात. - गडद निळा रंग : आधुनिक कर्ण
रंगाच्या क्षेत्रामध्ये गडद निळा रंग विराटपणा व व्यापकतेचे प्रतीक समजला जातो. अशी व्यक्ती स्वत:पेक्षा दुसर्यासाठी किती जगला यास अनन्यसाधारण महत्त्व देते. जागतिक स्तरावर दुसर्यासाठी आपल्या स्वकष्टाने, अथक परिश्रमाने व नैतिकतेने कमावलेली संपत्ती सर्वसामान्य जनतेसाठी, सामाजिक व शैक्षणिक कार्यासाठी सर्वांत जास्त उपयोगी आणणार्या महनीय व्यक्तींमध्ये अग्रस्थानी बडोद्याचे नरेश सयाजीराव गायकवाड महाराज, कॉर्पोरेट विश्वात बिल गेट्स, वॉरन बफे, प्रेम आझमी, रतन टाटा, सुधा मूर्ती इत्यादींचा आदराने उल्लेख होतो. याच श्रृंखलेमध्ये ज्यांचा आदराने उल्लेख केला जातो तो म्हणजे तुम्हा-आम्हा सर्वांचे आधुनिक कर्ण लोकनेते रामशेठ ठाकूरसाहेब होय. सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात आर्थिक मदत देताना परतीची कोणतीही इच्छा न बाळगता सढळ हाताने संपत्तीचे वाटपते करीत असतात. निधी देण्यापाठीमागे त्यांची सरळ, स्वच्छ व निर्मळ भावना आहे की, मी समाजाचा घटक आहे. समाजाने मला भरभरून दिले. ते समाजाला परत करण्यासाठीच नियतीने मला देण्याची संधी दिली आहे, अशी त्यांची प्रामाणिक भावना आहे. - जांभळा रंग : कुटुंबवत्सल
रंगाच्या क्षेत्रामध्ये जांभळ्या रंगास राजवैभवाचे प्रतीक म्हणून मान्यता आहे. एखाद्या वैभवसंपन्न राज्याच्या राजास जो मुकुटमणी परिधान केला जातो त्यातील मुख्यभागी असणार्या मुकूट मण्याचा रंग हा जांभळा असतो. राजवैभवसंपन्न जीवन जगणार्या व्यक्तीच्या विचाराची, कृतीची, रक्ताच्या नात्याची व रक्ताशिवाय आईच्या मायेने जीव लावून जोडलेल्या त्यांच्या या नात्यातून त्यांचे कुटुंब बनते. याबाबत आमचे रामशेठ ठाकूरसाहेब सर्वांत भाग्यवान आहेत. आदरणीय रामशेठ ठाकूरसाहेब हे आज रायगड जिल्ह्यातील चालते बोलते लोकपीठ झाले आहेत.
अशा या व्यक्तिमत्त्वाला सांभाळण्याचे आणि आपुलकीच्या भावनेने जपून फुलविण्याचे काम सौ. ठाकूरताईंनी समर्पित भावनेने केले आहे. आज साहेबांचा राजकीय वारसा मा. आमदार प्रशांतशेठ ठाकूर यांनी समर्थपणे चालविला आहे, तर उद्योग व क्रीडाक्षेत्राचा वारसा मा. परेशशेठ ठाकूर यांनी चालविला आहे.
रक्ताच्या नात्यापेक्षाही श्रेष्ठ अशी माणसे साहेबांनी आपल्या आयुष्यात जोडली आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रातील अशी जीवापाड प्रेम करणारी माणसे हीच खरी आदरणीय रामशेठ ठाकूरसाहेबांच्या आयुष्याच्या सातबारावरील खरीखुरी मिळकत आहे.
इंद्रधनुष्य ही निसर्गाची अद्भुत किमया आहे. ही किमया दृष्टिपथास येण्यासाठी सूर्याचा प्रकाश, पाऊस, आकाश, दवबिंदू यांचा नैसर्गिकपणे मिलाफ होणे आवश्यक असते. तरच आपण इंद्रधनुष्य पाहू शकतो. इंद्रधनुष्य पाहणे हे शुभ लक्षण मानले जाते. आनंदाचा व उत्साहितपणाचा जो तो अनुभव घेत असतो. इंद्रधनुष्याच्या सप्तरंगाच्या लाल, नारंगी, पिवळा, हिरवा, निळा, गडद निळा व जांभळा इ. रंगांच्या शिवाय जगात अपवादात्मक परिस्थितीत इंद्रधनुष्याला आठवा रंग प्राप्त होतो. तो मात्र अद्भुत समजला जातो. तो रंग काही वेळेस गुलाबी जांभळ्या रंगाचा असतो. आदरणीय रामशेठ ठाकूरसाहेबांच्या इंद्रधनुष्यरूपी व्यक्तिमत्त्वाचा आठवा रंग म्हणजे नि:स्वार्थीपणे माणूसपण व माणुसकीचा आहे. हा वसा व वारसा त्यांनी तपस्वी वृत्तीने त्यांच्या मातोश्री व पिताश्री यांच्याकडून तसेच महात्मा ज्योतिराव फुले, राजर्षि शाहू महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याकडून घेऊन तो ते पुढे चालवत आहेत. तसेच आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाणसाहेब, रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा. शरदचंद्र पवारसाहेब यांचा वारसा तन-मन-धनाने समर्पित व त्यागी वृत्तीने पुढे नेत आहेत. रामशेठ ठाकूरसाहेब म्हणजे माणुसकीच्या वाटेवरील दीपस्तंभ आहेत. महात्मा ज्योतिराव फुलेंनी लिहिलेल्या अखंडाप्रमाणे ते कार्यरत आहेत.
सर्व साक्ष जगत्पती। त्याला नको मध्यस्थी । वकिलीचा पाड नाही कर्ता आमचा सर्वन्यायी सर्वाला सारखा नाही कोणाला पारखा॥ ज्योती म्हणे॥
तारुण्याची व्याख्या करीत असताना असे म्हटले जाते की, ज्याला दिवसातील काम करण्यासाठी 24 तास कमी पडतात तो तरुण व ज्याला वेळेचे काय करायचे याचा प्रश्न पडतो तो म्हातारा. या निकषाच्या आधारे आपले साहेब अजूनही तरुण आहेत. लोकनेते रामशेठ ठाकूरसाहेबांना 70व्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या पुढील कार्यास रयत परिवारातील सेवकांकडून आभाळभर हार्दिक शुभेच्छा!
जय कर्मवीर! जय रयत माऊली!