Breaking News

अजूनही पर्याय खुले

उत्तम पाऊस झाल्यानंतर महाराष्ट्रातील शेते-शिवारे भराला आलेली असताना अचानक अवतरलेल्या अवकाळी पावसाने निम्म्याहून अधिक पीक भुईसपाट केले. चांगल्या पावसामुळे थोडाफार सावरलेला महाराष्ट्राचा शेतकरी देशोधडीला लागला. अशा संकटकाळात सत्तेसाठी भांडण उकरून मित्रपक्षालाच सतत दूषणे देण्याचा कार्यक्रम दुर्दैवाने हाती घेतला गेला.

महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर गेले काही दिवस साचून राहिलेले संशयाचे विषारी धुके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्रकार परिषदेत बरेचसे निवळले. सत्तेचे समसमान वाटप आणि अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्री पदाची मुदत या अटीला हट्टाने चिकटून आक्रस्ताळे राजकारण करणार्‍या शिवसेनेच्या पायाखालची आधाराची फळीच निघून गेली. मुख्यमंत्री पदाचे अडीच-अडीच वर्षांचे वाटे घालण्याचे कधीच ठरले नव्हते असे मुख्यमंत्र्यांनी दिवाळीत पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारताना स्पष्ट केले होते. त्याचे अवडंबर करुन शिवसेनेने चर्चेची दारे बंद केली आणि महायुतीच्या सत्तेच्या शक्यताच धुसर करून ठेवल्या. गेले पंधरा दिवस रोज सकाळी आक्रस्ताळी पत्रकार परिषदा घेऊन भारतीय जनता पक्षालाच खोटे ठरवण्याची पद्धतशीर मोहीम राबवली गेली. सत्तेच्या समसमान वाटपाबाबत कोण खोटे बोलत आहे असा प्रश्न मतदारांच्या मनात निर्माण होणे स्वाभाविकच होते व आहे. तथापि दररोज होणार्‍या बेताल वक्तव्यांवर कुठल्याही प्रकारची प्रतिक्रिया न देता भारतीय जनता पक्षाने संयम पाळला. नुकत्याच होऊन गेलेल्या निवडणुकीत भाजप-शिवसेना प्रणित महायुतीला 288 पैकी 161 जागा प्राप्त झाल्या. सत्तास्थापन करण्यासाठी हा स्पष्ट जनादेश तर होताच पण गेल्या पाच वर्षांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रात करून दाखवलेल्या अभूतपूर्व विकासकामांना जनतेने दिलेली ही एक पोचपावती देखील होती. अशावेळी पदांच्या वाटपावरून लहान मुलासारखे भांडणे अस्थानी होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पत्रकार परिषदेत या सार्‍याला सडेतोड उत्तर देत चेंडू आता शिवसेनेच्या कोर्टात ढकलला आहे. मुख्यमंत्रीपदाचे निम्मे निम्मे वाटप कधीही ठरले नव्हते या सत्य वचनाचा त्यांनी पुन्हा एकवार उच्चार केला. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि पक्षाध्यक्ष अमित शहाजी यांच्यावर गेल्या पाच वर्षांत मित्रपक्ष असूनही शिवसेनेने केलेल्या टीकेबद्दल खंत व्यक्त केली. विरोधकांपेक्षाही अश्लाघ्य शब्दांमध्ये आपला मित्रपक्षच विखारी टीका करणार असेल तर एकत्र यायचे तरी कशाला हा देवेंद्रजींचा सवाल बराच बोलका आहे. याच पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीने भाजपवर केलेल्या घोडेबाजारच्या आरोपाचा स्पष्ट इन्कार केला. हे खोटे आरोप सिद्ध करून दाखवण्याचे आव्हान देखील दिले. ते पेलणे विरोधकांना खचितच शक्य नाही. तसे ते करणार देखील नाहीत. असले खोटेनाटे आरोप करून विरोधकांना फक्त टीव्हीवर चमकायचे होते. एवढे होऊन देखील देवेंद्रजी, भाजपचे श्रेष्ठी आणि ज्येष्ठ नेते यांनी चर्चेची दारे बंद केलेली नाहीत हे विशेष. अजूनही महायुतीचे सरकार येऊ शकते व पुढ्यात ठाकलेली राष्ट्रपती राजवट आणि पाठोपाठ येणार्‍या मध्यावधी निवडणुका टाळता येऊ शकतात हेच त्यातून अधोरेखित होते. शिवसेनेने यातून योग्य तो बोध घेऊन विवेकाने निर्णय घ्यावा आणि महाराष्ट्राच्या सत्ताकारणाचे गाडे पुन्हा सुरळीत चालू व्हावे यासाठी पाऊल उचलावे. संकटात सापडलेला महाराष्ट्रातील शेतकरी महायुतीच्या कल्याणकारी सरकारकडे डोळे लावून बसला आहे.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply