Breaking News

किल्ले रायगडावर तरुणांचा धुडगूस

महाड ः प्रतिनिधी
किल्ले रायगड पर्यटकांसाठी बंद असतानाही काही तरुणांनी जबरदस्ती महादरवाजा उघडून गडावर प्रवेश केला, तसेच त्यांना अटकाव करणार्‍या पुरातत्व विभागाच्या कर्मचार्‍यांना धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी महाड पोलिसांनी मात्र केवळ दंडात्मक कारवाई करून तरुणांना सोडून दिले.
संपूर्ण महाराष्ट्राचे स्फूर्तिस्थान असलेला किल्ले रायगड हे तमाम मराठी माणसांचे श्रद्धास्थानही आहे. याच किल्ले रायगडावरून स्वराज्याचा कारभार चालविताना छत्रपती शिवाजी महाराजांचा कडक शिरस्ता होता. सूर्योदयापूर्वी आणि सूर्यास्तानंतर गडावर कोणालाही प्रवेश मिळत नसे. अगदी दस्तुरखुद्द राज्यांच्या कुटूंबालादेखील हा शिरस्त लागू होता, मात्र आजकाल त्याच रायगडाची अवहेलना आणि कुचेष्टा होऊ लागली आहे.
कोरोना काळात राज्यातील सर्व पर्यटनस्थळे बंद ठेवण्यात आली आहेत. यात रायगडाचाही समावेश आहे. मात्र शिवराज्याभिषेक दिनाच्या दुसर्‍याच दिवशी स्वतःला शिवभक्त समजणार्‍या काही उद्धट तरुणांनी महाराजांचा हा शिरस्ता तोडून चक्क पाइपने महादरवाजाच्या भिंतीवर चढून व जबदस्तीने हेे द्वार उघडून किल्ल्यात प्रवेश केला. या वेळी त्यांनी अटकाव करणार्‍या पुरातत्व विभागाच्या कर्मचार्‍यांना धक्काबुक्कीदेखील केली.
असाच प्रकार काही वर्षांपूर्वी महादरवाजा येथे घडून मोठी दुर्घटना झाली होती, मात्र ताज्या प्रकरणी महाड तालुका पोलिसांनी या 31 तरुणांवर केवळ दंडात्मक कारवाई करून त्यांना सोडून दिले, मात्र कडक कारवाईची मागणी शिवप्रेमींमधून होत आहे.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply