नवी मुंबई : बातमीदार
नवी मुंबई महापालिकेत एकीकडे कोरोना रुग्ण संख्या वाढत असताना दुसरीकडे बरे होणार्यांचे प्रमाण देखील अधिक आहे. त्यामुळे राज्यात रिकव्हरी रेट 80 टक्क्यांवर पोहचला आहे. आयुक्त अभिजित बांगर नवी मुंबईत रुजू झाल्यापासून त्यांनी बिघडलेले मेडिकल मॅनेजमेंट सुधारण्यासाठी प्रयत्न सुरू केले असून त्याचा परिणाम दररोज वाढणार्या रिकव्हरी रेटमधून दिसून येत आहे. मृत्यूदर कमी करण्यासाठी नवी मुंबई महापालिका स्वतःचे प्लाझ्मा थेरपी सेंटर सुरू करणार आहे. त्यादिशेने पालिकेने पाऊले टाकली असून येत्या काही दिवसांत पालिका शहरातील नागरिकांना प्लाझ्मा थेरपीचा नवा पर्याय उपलब्ध होणार आहे.जगभरातील डॉक्टर्स, औषध कंपन्या लस बनवण्यासाठी विविध प्रकारच्या चाचण्या करत आहेत. यात भारत देखील आघाडीवर आहे. मात्र कोरोनाला समूळ नष्ट करणारी लस कधी उपलब्ध होईल याची आराखडे बांधणे कठीण होऊन बसले आहे. दुसरीकडे प्लाझ्मा थेरपीने कोरोना बधितांना आशेचा किरण दाखवला आहे. प्लाझ्मा थेरपित नवी मुंबई देखील मागे राहिलेली नाही. नागरी सेवांचे योग्य नियोजन काय असते हे नवनियुक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी रुजू होताच दाखवून दिले आहे. योग्य नियोजनाने रुग्ण संख्या वाढत असताना त्यापेक्षा जास्त रुग्ण हे बरे होऊन बाहेर पडू लागले आहेत. त्यामुळे नवी मुंबईत असणारे भयाचे वातावरण कमी होण्यास मदत झाली आहे. नुकतेच डॉ. डी. वाय पाटील खासगी रुग्णालयासोबत 200 आयसीयू बेड व 80 व्हेंटिलेटर्सचा करार करण्यात आला असून टप्प्या टप्प्याने हे पालिकेला उपलब्ध होणार आहेत. याही पुढे जात पालिकेने स्वतःची आर सी पी सी आर टेस्टची लॅब उभारून व अँटिजेन टेस्टचा वेग वाढवला आहे. घरोघरी तपासणीस सुरुवात केल्याने साखळी तोडण्यास मदत होत आहे. यात भर पडून आयुक्त बांगर यांनी प्लाझ्मा थेरपी सेंटरसाठी पाऊल उचलले आहे. ज्या पद्धतीने कोरोनाबाधित रुग्णास रोगप्रतिकारक शक्तीची गरज असते. त्याचपद्धतीने प्लाझ्मा थेरपीने रुग्णाच्या शरिरात अँटिबॉडीज तयार होतात. रुग्णाला बरे करता येते. अत्यव्यस्थ रुग्णांना प्लाझ्मा थेरपी दिली जाते. त्यामुळे रुग्णांचे प्राण वाचतात. पालिकेकडून सध्या कोरोनातून बरे झालेल्यांशी संपर्क साधून प्लाझ्मा डोनेट करण्याबाबत आवाहन केले जात आहे. त्यानुसार नव्याने सुरू झालेल्या अपोलो रुग्णालयात अनेक दात्यांनी प्लाझ्मा डोनेट केले आहे. त्यामुळे पालिकेने स्वतःचे सेंटर सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. पालिकेच्या आरोग्य व्यवस्थेवर विश्वास दाखवणार्या नागरिकांना प्लाझ्मा थेरपीचा उपयोग होणार आहे.
लवकरच नवी मुंबई महापालिकेचे स्वतःचे प्लाझ्मा थेरपी सेंटर सुरू करणार आहोत. नेरुळ अथवा वाशी रुग्णालयात हे सेंटर सुरू होईल. अत्यवस्थ रुग्णांसाठी ही थेरपी लागू ठरते. त्यामुळे शहरातील मृत्यू दर कमी करण्यास मदत होईल. खासगी रुग्णालयांनी ही थेरपी सुरू केली असून काही रुग्णालये ही थेरपी सुरू करण्याच्या तयारीत आहेत.
-अभिजित बांगर, आयुक्त नवी मुंबई महापालिका
RamPrahar – The Panvel Daily Paper