खोपोली : प्रतिनिधी
कोरोना प्रतिबंधक लसीबाबत खालापूर तालुक्यातील आदिवासी समाजात विविध प्रकारचे गैरसमज असून, लस घेण्यासाठी टाळाटाळ होत असल्याने प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. जनजागृतीसाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न सुरू आहेत. कोरोनापासून बचावासाठी प्रशासनाकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. मास्क, सामाजिक अंतर आणि लॉकडाऊनचे पर्याय यांनीसुद्धा कोरोना आटोक्यात येत नसल्याने आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण वाढला आहे. कोरोनाविरुद्ध लढाई जिंकण्यासाठी खालापूर तालुक्यात गावपातळीवर मोठ्या प्रमाणात लसीकरण करण्यात येत आहे. सुरुवातीला लसीकरणाकडे पाठ फिरवणारे सुशिक्षितदेखील आता लसीकरणासाठी रांगेत उभे राहत आहेत. खालापूर तालुक्यातील लसीकरणाने पाच हजारांचा टप्पा ओलांडला आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, उपकेंद्र यामध्ये लसीकरण करण्यात येत आहे, मात्र कोरोना प्रतिबंधक लसीबाबत विविध गैरसमज असल्याने तालुक्यातील कातकरी समाज लसीकरणाबाबत उदासीन आहे. लस घेतल्याने माणसाचा मृत्यू, विविध आजार तसेच अर्धांगवायू होतो अशी समजूत या समाजामध्ये मोठ्या प्रमाणात आहे. हा गैरसमज दूर करण्यासाठी प्रशासन सरसावले आहे. सामाजिक संघटनांच्या मदतीने तसेच वाडी, वस्तीतील सुशिक्षित तरुण-तरुणींमार्फत लसीकरणाचे फायदे समजावले जात आहेत. श्रमजीवी संघटनादेखील प्रशासनाच्या मदतीला धावून आली असून, या संघटनेचे कार्यकर्ते लसीकरणाबाबत आदिवासींची मानसिकता बदलण्याचे काम करीत आहेत. खालापूर तालुक्यात 228 कातकरीवाड्या असून तेथील एकूण लोकसंख्या साडेसतरा हजारांच्या घरात आहे. सध्या खालापूर तालुक्यात 45 वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण करण्यात येत आहे. यामध्ये वाडी, वस्तीत लसीकरणाचे प्रमाण शून्य आहे. पहिल्या लाटेत कोरोना संसर्गापासून दूर असलेला आदिवासी समाज दुसर्या लाटेत मोठ्या प्रमाणात बाधित झाल्याचेदेखील दिसून आले.
जास्तीत जास्त लसीकरण व्हावे हे प्रशासनाचे लक्ष्य असून, तालुका कोेरोनामुक्त होण्यासाठी जिल्हाधिकार्यांच्या प्रयत्नांतून फिरते लसीकरणदेखील करण्यात आले होते. वाडी, वस्त्यांमध्ये लसीकरणाबाबत जनजागृती करण्यात येत असून, तालुक्यात 100 टक्के लसीकरण करण्यात येईल.
-इरेश चप्पलवार, तहसीलदार
संघटनेमार्फत वाडी-वस्त्यांवर जाऊन लसीकरणाबाबत जनजागृती करण्यात येत आहे. जगा आणि जगवा, हे ध्येय घेऊन संघटना काम करीत आहे. लसीकरणासाठी अनेक जण तयार झाले आहेत.
-योगिता दुर्गे, श्रमजीवी संघटना