Breaking News

आपत्ती व्यवस्थापन कायद्यातील पुनर्वसनाकडे दुर्लक्ष?

महाड आणि पोलादपूर तालुक्यातील दरडग्रस्त गावांचे पुनर्वसन होण्यासाठी 2005मध्ये आपत्ती व्यवस्थापन कायद्यामध्ये सुधारणा करण्यात आली होती,  मात्र पोलादपूर तालुक्यात पुनर्वसनाला हरताळ फासला गेल्याने आपत्तीग्रस्तांना या कायद्यामुळे अद्याप न्याय मिळाला नसल्याची परिस्थिती कायम आहे.
पोलादपूर तालुक्यातील 25 गावांना पूर आणि दरडींचा धोका असल्याचे आपत्कालीन यंत्रणेने जाहीर केले आहे, मात्र पुनर्वसनासंदर्भात ग्रामस्थांमध्ये प्रचंड अनास्था असल्याचे शासनाच्या अहवालामध्ये नमूद करण्यात आले आहे. अलिबाग येथील भूजल
सर्वेक्षण विकास यंत्रणेमार्फत हा अहवाल तयार करण्यात आला असून त्यामध्ये स्थानिक लोकप्रतिनिधी व ग्रामस्थांचे अभिप्राय नोंदविण्यात आले आहेत.
पार्ले बौद्धवाडी येथील घरे सुरक्षित अंतरावर असून नाल्यातील माती काढून नाल्यास नैसर्गिक प्रवाहाची दिशा देण्याची आवश्यकता आहे. तसे न केल्यास या लोकवस्तीला धोका संभवेल, असे भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेचे मत आहे. मात्र येथील नाल्याच्या  प्रवाहाची दिशा तयार करण्याच्या कामाचा अतिवृष्टी, महापूर व भूस्खलनानंतरच्या विशेष कामांमध्ये समावेश  केले गेले नसल्याने पार्ले बौध्दवाडीचा संभाव्य धोका कमी झालेला नाही.
लोहारे चव्हाणवाडी येथील नाल्याच्या पूर्वेला वस्ती असल्याने तात्काळ धोका नाही. मात्र नाल्याच्या  प्रवाहाची दिशा योग्य न केल्यास धोका संभवतो, असे अहवालात म्हटले आहे तर ग्रामस्थांच्या अभिप्रायात नाल्यापासून लोकवस्ती लांब असल्याने सध्या वस्तीला कोणताही धोका नसल्याचे म्हटले आहे. सडवली शिवाजीनगर येथील डोंगरपायथ्याशी असलेल्या 6-7 घरांचे सुरक्षित जागी स्थलांतर करण्याची आवश्यकता अहवालामध्ये व्यक्त करण्यात आली आहे तर ग्रामस्थ व लोकप्रतिनिधींच्या मते, सद्यस्थितीत या घरांना कोणताही धोका नाही तसेच कुटूंबधारक इतरत्र जाण्यास तयार नाहीत. धामणदेवी भरणेवाडी येथे मोठया प्रमाणात भूस्खलन झाल्यामुळे सुरक्षित जागी स्थलांतराची आवश्यकता व्यक्त करताना वस्तीला तूर्तास धोका नसल्याचे अहवालामध्ये नमूद केले आहे. ग्रामस्थांच्या मते येथील दोन घरांचे स्थलांतर करावे लागेल. परंतू, कुटूंबधारक अन्य ठिकाणी जाण्यास तयार नसल्याचा अभिप्राय देण्यात आला आहे.
धामणदिवी गावठाणातील घरांना भूस्खलनाचा धोका निर्माण झाला आहे. याकडे विद्यमान सरकारने दूर्लक्ष चालविले आहे. कातळी कामतवाडी येथील सर्व घरे डोंगरपायथ्याशी असल्याने त्यांचे पुनर्वसन करण्याची आवश्यकता अहवालात नमूद करण्यात आली आहे, मात्र सध्या धोका नसल्याने स्थलांतर करण्याची आवश्यकता नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. कोतवाल बुद्रुक गावठाण येथे सात व्यक्तींचा दरडीखाली सापडून मृत्यू झाला होता. डोंगर पायथ्याला लागून असलेल्या येथील घरांना धोका असल्याने या घरांचे पुनर्वसन व स्थलांतर करण्याचा अहवाल भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेने दिला आहे. मात्र येथील तीन कुटूंबांनी स्वत:च्या जबाबदारीवर संकटकाळांत नातेवाईकांकडे जाणार असल्याचे लेखी दिले आहे. वाकण ग्रुपग्रामपंचायत हद्दीतील बारा वाड्यांपैकी सानेवाडीतील दोन-तीन घरांना धोका असल्यााचे अहवालामध्ये नमूद करण्यात आले असले तरी सद्यस्थितीत कोणताही धोका नसल्याने कुटूंबधारक इतरत्र जाण्यास तयार नाहीत. गोलदरा येथे डोंगराच्या खालच्या बाजूच्या घरांना कायमस्वरूपी धोका असल्याचा अहवाल आहे. मात्र, ही सहाही कुटूंबे अन्यत्र जाण्यास तयार नाहीत. भोगाव येलंगेवाडी या गावाचे कायमस्वरूपी स्थलांतर करण्याची आवश्यकता अहवालामध्ये नमूद करण्यात आली आहे. मात्र, येथील ग्रामस्थ स्थलांतरास तयार नाहीत. वझरवाडीतील तीन घरांना तसेच पैठण गावातील डोंगरालगतच्या दोन-तीन घरांनाही भूस्खलन व दरडींचा धोका आहे. मात्र तेथील रहिवासी सध्या धोका नसल्याची अनास्था दर्शवितात. डोंगराच्या पायथ्याशी असल्याने पोलादपूर गोकूळनगरातील घरांचेही पुनर्वसन करण्याची आवश्यकता आहे. चरई सुतारवाडीतील डोंगर पायथ्याला असलेल्या 33 घरांचे पुनर्वसन करण्याची आवश्यकता आहे. परंतू, डोंगर दूर असल्याची सबब सांगून कुटूंबधारक इतरत्र जाण्यास तयार नसल्याचे दिसून येत आहे. डोंगरामध्ये असलेल्या कुडपण बुद्रुक येथील मधल्यावाडीचे पुनर्वसन करण्याची आवश्यकता असतानाही ग्रामस्थांमध्ये स्थलांतर करण्यासंदर्भात अनास्था दिसून येत आहे. कुडपण धनगरवाडीमध्येही भूस्खलनाची शक्यता असूनही तेथील कुटूंबे स्थलांतरास तयार नाहीत. ओंबळी गावठाणातील तसेच धनगरवाडीतील घरे डोंगरपायथ्याला लागून असल्याने घरांचे पुनर्वसन करण्याची गरज अहवालामध्ये नमूद करण्यात आली आहे. परंतू, सद्यस्थितीत धोका नसल्याने लोक त्यास तयार नाहीत.
पोलादपूर तालुक्यातील पुनर्वसनाच्या पहिल्या टप्प्यात बोरावळे येथील नऊ घरांच्या बांधकामानंतर तेथील दरडग्रस्तांचे पुनर्वसन पूर्ण झाले. सावित्री महिला विकास संस्थेतर्फे पैठण गावात तीन, देवपूर येथे चार, पार्ले येथे तीन, माटवण येथे पाच, पोलादपूर- जोगेश्वरी गाडीतळ येथे तीन, सडवली येथे सहा, लोहारमाळ येथे चार, रानबाजिरे येथे 23, आड येथे दोन, सवाद येथे एक आणि हावरे येथे सहा अशी एकूण 61 घरकुले बांधण्यात येऊन ताबाही देण्यात आला.
पोलादपूर येथील चित्रे यांना घर बांधणीसाठी सरकारी अनुदान देण्यात आले. कोतवाल खुर्द आणि बुद्रुकच्या दरडग्रस्तांसाठी 28 घरकुले उभी राहतील एवढे क्षेत्र उपलब्ध करण्यात येऊन पुनर्वसनाचे प्रयत्न  सुरू झाले. मुंबईतील सिध्दीविनायक ट्रस्टने याकामी खर्चाची जबाबदारी उचलली. कोतवाल खुर्द गावामध्ये दरडग्रस्तांची संख्या 48 असताना येथे केवळ 15 घरकुले उभारण्यात आली आहेत. येथील कामाची तांत्रिक मान्यता किंमत 49 लाख 21 हजार 434 रुपये असून दरसूचीतील वाढीमुळे येथील एका घरकुलासाठी तीन लाख 45 हजार 790 रूपये 75 पैसे खर्च झाल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाकडून प्राप्त झाली आहे.
कोंढवी येथे 78 कुटूंबे दरडग्रस्त असताना या ठिकाणी 50 लाख रुपये खर्च करून केवळ 15 घरकुले उभारण्यात आली. कोंढवीमध्ये केवळ 29 पात्र दरडग्रस्त असल्याचे निश्चित करण्यात आले आहे. येथे तांत्रिक मान्यता किंमत 49 लाख 49 हजार 651 रूपये एवढी असून दरसूचीमध्ये झालेल्या वाढीमुळे निविदेची किंमत 23.50 टक्के वाढली. त्यामुळे कोंढवीतील एका घरकुलासाठी तीन लाख 20 हजार 875 रूपये 95 पैसे खर्च झाल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे म्हणणे आहे. सिध्दीविनायक ट्रस्टच्या माध्यमातून तब्बल एक कोटी रूपयांच्या निधीमधून कोतवाल खुर्द व कोंढवी येथे 30 घरकुले बांधण्यात आली आहेत. 25 फेबु्रवारी 2011 रोजी झालेल्या विशेष ग्रामसभेत कोंढवी येथील घरकुलांच्या वाटपाची सोडत काढण्यात आली. त्यावेळी वाटप झालेल्या 15 लाभार्थ्यांपैकी गंगाराम काळू यादव उर्फ धोत्रे हाच एकमेव येथे वास्तव्यास आहे.
आपत्ती निवारणासंदर्भात कायदा अस्तित्वात आला असून त्यामध्ये आपद्ग्रस्तांना मदत अथवा पुनर्वसन करण्याकामी चालढकल करणार्‍या अधिकारी अथवा यंत्रणांविरूध्द कारवाईची तरतूद आहे. मात्र, सरकार आणि अधिकार्‍यांच्या संगनमताने ग्रामस्थांमध्ये घरकुलाच्या आमिषामुळे लागलेल्या भांडणांतून दरडग्रस्त कुटूंबांना आजही दरडग्रस्त भागात मुक्काम करावा लागत आहे. त्यामुळे आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत पुनर्वसनाकडे विशेष लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply