Breaking News

लॉकडाऊन कुणालाही परवडणार नाही : आमदार प्रशांत ठाकूर

  • पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाला आधार दिला
  • राज्य सरकारची मात्र अघोरी कामकाज पद्धत

पनवेल ः हरेश साठे
राज्य सरकार लॉकडाऊन लावण्यासाठी आसुसलेले असले तरी लॉकडाऊन कुणालाही परवडणार नाही. त्यामुळे सर्वांनी कोरोना महामारीच्या अनुषंगाने स्वतःची व कुटुंबाची काळजी घ्यावी, असे आवाहन भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले आहे. ते फेसबूक लाइव्हद्वारे नागरिकांशी संवाद साधताना बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे देशाला मोठा आधार मिळाला, मात्र ’माझे घर माझी जबाबदारी, तुमचे घर तुमची जबाबदारी’ या ’तुमचे तुम्ही बघून घ्या’ अघोरी पद्धतीने राज्य सरकार काम करीत असल्याची घणाघाती टीका करीत राज्य सरकारच्या निष्क्रिय कारभारावर आमदार प्रशांत ठाकूर यांनी नाराजी व्यक्त केली.
या वेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी यांनी नागरिकांशी संवाद साधताना म्हटले की, गेले संपूर्ण वर्ष कोविडच्या छायेमध्ये आपण सर्वांनी मिळून काढले आणि आपल्या सगळ्यांना निश्चित तो दिवस आठवतो की, ज्या दिवशी आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या सर्वांच्या हितासाठी एक दिवस आधी जनता कर्फ्यूचे आवाहन केले आणि या राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संपूर्ण लॉकडाऊन जाहीर केले. नंतर मग देशभरामध्येदेखील त्याच्या पुढच्या दिवशी लॉकडाऊन जाहीर झाले. कोरोना रोगाने आपल्याला असे काही ग्रासले की, त्यातून आपण पूर्णपणे बाहेर निघू शकलेलो नाही. गेल्या वर्षभरात विशेषतः आपल्या पनवेल आणि परिसरामध्ये कोरोनाचे संक्रमण झाले ती परिस्थिती सगळ्यांसाठी निश्चितपणे भयावह आहे. (पान 2 वर..)
आजच्या तारखेला पनवेल महानगरपालिका क्षेत्रामध्ये 674 जणांना जीव गमवावा लागला आहे. याच्या पलीकडे जाऊन तो आकडा वेगळा असू शकतो. ग्रामीण भागातील आकडा वेगळा आहे आणि रायगड जिल्ह्यात आकडा त्यापेक्षा वेगळा असू शकतो. वर्षभरामध्ये आपण जर परिस्थिती पाहिली तर एका गोष्टीचा आपल्या सगळ्यांना निश्चित अभिमान आहे की, आपल्या देशाचे नेतृत्व पंतप्रधान नरेंद्र मोदी करतात. त्यांनी प्रत्येक फ्रंटवर पुढे येऊन कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी आपल्याला हिंमत दिली, धैर्य दिले आणि आपल्याला ज्या वेळी लॉकडाऊनचा सामना करावा लागला त्या वेळी पंतप्रधान मोदींनी अगोदर गरीब कल्याण योजना 30 हजार कोटींची आणली व त्यानंतर आत्मनिर्भर भारताची हाक दिली.
पुढे ते म्हणाले की, आज-काल परवाच्या वर्तमानपत्रांमध्ये पहिले की, येणार्‍या आर्थिक वर्षामध्ये आपल्या भारताची अर्थव्यवस्था दहापेक्षा जास्त विकासदराने राहणार आहे.  गेल्या वर्षाचा जर आपण आढावा घेतला तर आपल्या लक्षात येईल की, संपूर्ण जगामध्ये कोरोनाचे जाळे पसरले, संपूर्ण जगाची अर्थव्यवस्था बिघडली आणि त्यामुळे सर्वांनाच त्या अर्थाने या संकटाला सामोरे जावे लागले. अजूनही अनेक देशांमध्ये वेगवेगळ्या वेळांसाठी लॉकडाऊन जाहीर झालेले पहायला मिळत आहे. एक वर्षापूर्वीची स्थिती आठवू या. त्या वेळी बोलले जात होते की, भारतासारख्या देशामध्ये कोरोनाचे संक्रमण झाल्यास किती मोठ्या प्रमाणात आपल्याला या रोगाला बळी पडताना लोकं दिसतील. सुदैवाने पंतप्रधान मोदींनी या दृष्टिकोनातून एक चांगल्या पद्धतीने वेगवेगळ्या, चांगल्या उपाययोजना आखत आपली गाडी वळणावर आणण्यासाठी पाठपुरावा केला. आधी गरीब कल्याण योजना, मग आत्मनिर्भर भारतसाठीच्या वेगवेगळ्या पद्धतीच्या पॅकेजच्या माध्यमातून आपल्याला दिलेले पाठबळ या सगळ्यातून आपल्या देशाची अर्थव्यवस्था पुन्हा एकदा उभी राहत आहे.
ज्या वेळी कोरोनाविषयी काहीही माहिती नव्हती, त्या वेळी खूप मोठ्या प्रमाणावर आपल्याला कोरोनाच्या अनुषंगाने पहायला मिळाले की, एकीकडे कोरोनाच्या विषयी मनामध्ये प्रचंड भीती, दडपण आहे. अशा वेळी माणसातील माणुसकी हरवली होती आणि माणुसकी हरवतेय अशा वेळेला पंतप्रधान मोदींनी सर्वांना आवाहन केले आणि आपली संस्कृती काय आहे याची जाणीव करून दिली. आपल्या संस्कृतीमध्ये स्वतःच्या ताटातील दुसर्‍याला वाढवून देण्याची संस्कृती आहे याची आठवण करून दिली. आज आपण सगळे जण पाहतोय एकीकडे जेवायला आपल्याकडच्या कोणाला कोणाला काही मिळत नव्हतं. त्या वेळेला अनेक स्वयंसेवी संस्था धावून आल्या. मला आनंद आहे की, यात भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता या सगळ्या कालावधीमध्ये रस्त्यावर धावत राहिला आणि त्याने लोकांसाठी कोरडा अन्नधान्य, मोदी किचन कम्युनिटी किचनच्या माध्यमातून जेवण, सॅनिटायझर, प्रवास, निवारा, आधार दिला, असे आमदार प्रशांत ठाकूर यांनी सांगितले.
कोरोनाचे संक्रमण संपले असे वाटता वाटता आपले सर्वांचे वर्ष निघून गेले. त्यामध्ये अनेक सणांपासून आपण परके झालो. कुठलेही सोहळे न करता सण निघून गेले आहेत. खरेतर आज देशाचे चित्र आपण जर पाहिले तर लक्षात येईल की देशभरामध्ये असलेली स्थिती आणि महाराष्ट्रातील स्थिती यांच्यातील तुलनात्मक फरक आपल्या सगळ्यांना जाणवतो. आपल्या देशाने दोन लसी बनवल्या आणि या दोन्ही लसी भारतीयांपर्यंत पोहचतायेत, पण त्याच वेळेला स्थिती अशी आहे की 71 देशांपर्यंत भारताची लस जाऊन पोहचली आहे, पण आपल्या देशांमधल्या विशेषत्वाने महाराष्ट्रामध्ये ही लस देण्याच्या बाबतीत प्रचंड प्रमाणामध्ये मिस्ड मॅनेजमेंट पाहायला मिळते. 50 टक्के लसी ज्या महाराष्ट्राला दिल्या गेल्या आहेत त्या आपल्या सर्वांपर्यंत पोहचल्यात नाहीत, पण हे फक्त लस देण्यापुरतेच नाही तर संपूर्ण गेल्या वर्षभरामध्ये महाराष्ट्र सरकारने या कोरोना संसर्गाचा धसका घेतला आणि हा धसका घेऊन वेळोवेळी लॉकडाऊन करणे, वेगवेगळ्या पद्धतीच्या व्यावसायिकांना वेठीस धरणे हे पहायला मिळाले आहे, असे सांगून आमदार प्रशांत ठाकूर म्हणाले की, ज्या वेळी आपण पनवेलकर मागणी करीत होतो की, मुंबईमध्ये ज्याला आपण अत्यावश्य्क सेवा म्हणतो त्या सेवेतील लोकांची व्यवस्था मुंबईमध्ये करावी त्या वेळी राज्य शासनाने त्याकडे लक्ष दिले नाही आणि त्याचा परिणाम पनवेलवर, आपल्या परिसरावर झाला. नंतरच्या कालावधीमध्ये ज्या वेळेला संक्रमणाच्या कालावधीत आपण सरकारने मदत करावी त्या वेळेला गेल्या वर्षभरामध्ये 22 कोटी 60 लाख रुपये आपल्या महापालिका क्षेत्रामध्ये खर्च केले. महापालिकेचे स्वतःचे 10 कोटी रुपये खर्च झाले आहेत. 10 कोटी रुपयांचा भुर्दंड महापालिकेला द्यायचा का सरकारने त्याचा वाटा उचलायचा? खरेतर त्याची जबाबदारी सरकारने उचलायची होती, पण सगळ्या बाबतीत राज्य सरकार फेल ठरल्याचे पहायला मिळाले आहे. दुर्देव असे आहे की, आजचे महाराष्ट्रातील आघाडी सरकार आहे ते नागरिकांच्या हिताची चिंता न करता तुमच्या आमच्यावर सर्व जबाबदारी टाकून ’माझे घर माझी जबाबदारी, तुमचे घर तुमची जबाबदारी’ अशा पद्धतीने हात झटकून मोकळे होत चालले आहे. त्याची परिणीती म्हणून हातावर रोजगार असणार्‍या लोकांच्या मनामध्ये नैराश्याचे वातावरण आहे. काल-परवाच्या आपण बातम्या बघितल्या तर लॉकडाउनच्या भीतीने नागरिकांची पळापळ पहायला मिळत आहे. लोक गावाला जाण्यासाठी रेल्वे रिझर्वेशन करायला लागलेले आहेत. मग मला सांगा या महाराष्ट्राला आजचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे किंवा त्यांचे सरकार महाराष्ट्राला कुठे नेऊन ठेवतायेत. आज जी कोरोना रुग्णांच्या बाबतीत स्थिती आहे, देशातील 60 ते 70 टक्के रुग्ण केवळ महाराष्ट्रमध्ये आहेत. याला जबाबदार कोण आहे? तर याला आजचे राज्य सरकार जबाबदार आहे, पण हे सरकार स्वत:ची जबाबदारी स्वीकारायला तयार नाही. त्यामुळे प्रचंड प्रमाणात आपल्या सर्वांच्याच मनामध्ये अस्वस्थता आहे.
कोरोना कालावधीत आलेल्या विजेच्या बिलाचा विषय असू द्या किंवा या कालावधीत ज्यांना मदत करायला पाहिजे त्यांच्याकडे राज्य सरकारने पाठ फिरवलेली आपण सर्वांनी पाहिली. या सगळ्यामुळे नागरिकांना एका पद्धतीच्या गंभीर संकटांना सामोरे जावे लागत आहे. कोरोनाचे संक्रमण सुरूच आहे. आजच्या दिवसाला साधारणत: महापालिका क्षेत्रात 2500 रुग्ण अस्तित्वात आहेत. बरेचसे रुग्ण घरी क्वारंटाइन होत आहेत. आपल्याला या ठिकाणी विनंती करायची आहे की, खरंच आपल्या सर्वांच्या मनात इच्छा आहे का लॉकडाऊनची, तर नाही. कारण हातावर पोट असलेल्या नागरिकांना ते कदापिही परवडणार नाही. त्यांच्या आयुष्यात याचे खूप मोठे परिणाम होतील. राज्य सरकार मदत करेल याची शाश्वती नाही, पण लॉकडाऊन लागू नये यासाठी सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर करा, जवळून संवाद करताना आपण सक्तीने मास्क वापरतो का याचाही प्रत्येकाने विचार करणे अवाश्यक आहे. सामाजिक अंतराचे पालन करा आणि कोरोना रोगाच्या बाबतीत गंभीरतेने घ्या, असा सल्ला त्यांनी दिला.
गेल्या वर्षभरात लहान मुलांना याचा त्रास झालेला दिसला नाही, पण आता लहान मुलांनासुद्धा कोरोनाचा संसर्ग होत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे अशा लहान मुलांना हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागते अशी स्थिती आहे. आज पनवेल महापालिकेच्या दृष्टिकोनातून आपण जर पाहायचे झाले तर उपजिल्हा रुग्णालयामध्ये उपचार चालू आहेत आणि त्याच पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीने खासगी रुग्णालयांमध्ये उपचाराला सुरुवात झाली आहे. एकंदररीत्या इंडिया बुल्स या ठिकाणी असलेल्या विलगीकरण केंद्रात 348 रुग्णांची व्यवस्था होऊ शकते. या व्यतिरिक्त एमजीएम कामोठेपासून ते कळंबोली आणि अन्य सर्व ठिकाणी मिळून एकंदरीत 1213 बेड्स आहेत. त्यापैकी 683 बेड्स कोरोना रुग्णांसाठी रजिस्टर्स आहेत.  म्हणून आपण योग्य वेळी आपल्या स्वतःच्या प्रकृतीची काळजी घेतली तर आपल्याला धावाधाव करावी लागणार नाही. आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की, उपजिल्हा रुग्णालय व शासकीय आरोग्य केंद्रात चाचणी आपल्याला मोफत करता येते. लसही मोफत दिली जाते.  या व्यतिरिक्त आपल्या सगळ्यांच्या दृष्टिकोनातून एक मनामध्ये अशा पद्धतीची भीती असते की मला लक्षणे जाणवायला लागलेली आहेत आणि मी बेफिकीरपणे राहिलो तर त्याचा परिणाम कुटुंबावर होतो आणि परिणामी घरातले सगळे जण बाधित होतात. मग वेळीच सावध झालो आणि इतरांपासून दूर घरामध्ये स्वतःला वेगळे करून घेऊ शकलो तर त्याच्यातून घरांतील लोकांना संक्रमणापासून आपण कदाचित दूर ठेवू शकतो, असेही त्यांनी नमूद केले.
अलीकडच्या काळातील मुंबईमधील आकडे आणि महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी होत असलेल्या लॉकडाऊनविरोधातील लोकांचा आक्रोश पाहतोय. सगळ्यांचीच इच्छा आहे की, लॉकडाऊन नको, मग तो लॉकडाऊन आपल्याला नको असेल तर त्यासाठी आपल्याला सार्वजनिक जीवनामध्ये काळजी घेतली पाहिजे. मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार व्यक्त करतो की, त्यांनी आपल्यासाठी दोन प्रकारच्या लसी उपलब्ध करून दिल्या. 1 एप्रिलपासून 45 वयाच्या वरील सर्वांसाठी ही लस खुली झाली आहे, त्यामुळे लिस घेऊन कोरोनावर मात करण्यासाठी निश्चितच यशस्वी होऊ शकतो. ही लस आपल्याला दोन टप्प्यांमध्ये घ्यायची आहे. लसीकरण झाल्यावर त्रास होतो असे कुणीतरी सांगतो आणि त्या भीतीपोटी आपण लस घेत नाही. तसे करू नका. 45 वर्षांवरील सर्वांनी लस घ्या, असे सांगून मी, माझे वडील लोकनेते रामशेठ ठाकूर, आई शकुंतला ठाकूर यांनीसुद्धा लस घेतली आहे. सुरक्षा कवचसाठी तुम्हीपण लस घ्या, असे आवाहन त्यांनी केले आणि या लसीसाठी ऑनलाइन किंवा रुग्णालयात नोंदणी करा. कुठलीही अडचण भासल्यास शहरातील भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात जा. तेथे आपली या वषयी आमचे लोकप्रतिनिधी, सहकारी आपणांस मदत करतील, असेही त्यांनी नागरिकांना आश्वासित केले.
पनवेल महापालिका क्षेत्रातील आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाइन वर्कर, ज्येष्ठ नागरिक अशा 50 हजारहून अधिक नागरिकांनी कोरोनाची लस घेतली आहे. कोरोनाचे संकट लवकरात लवकर जावे ही आपल्या सर्वांची भावना आहे, मात्र अद्यापही हे संकट दूर होताना दिसत नाही.  कोरोनासंदर्भात आपल्याला एक वर्षाचा अनुभव आहे. त्यामुळे याबाबतीत कुठलीही हलगर्जीपणा करू नका, असे पुनःश्च त्यांनी नागरिकांना आवाहन केले. महापालिका क्षेत्रात गेल्या वर्षभरात 674 जणांना प्राणांना मुकावे लागले. या सर्वांच्या कुटुंबांवर मोठे संकट आले. असा प्रसंग कोणालाही आवडणार नाही, त्यामुळे सर्वांनी सजग असणे आवश्यक आहे, असे त्यांनी अधोरेखित करून नागरिकांच्या प्रश्नांना योग्य उत्तर आणि मार्गदर्शन केले. कोरोनाच्या काळात लोकप्रतिनिधी म्हणून काम करीत असताना सहकार्‍यांचे, संस्थांचे बळ आम्हाला मिळाले. त्यामुळेच आम्ही कोरोनाच्या संकटकाळात नागरिकांना मदत करू शकलो, अशी प्रांजळ कबुलीही त्यांनी या वेळी दिली.
राज्य सरकारकडून समन्वय नसल्याने रुग्ण दाखल करताना खासगी रुग्णालयांमध्ये अनामत रक्कम मागितली जात आहे, तसेच कोरोना रुग्णांच्या उपचारार्थ दिल्या जाणार्‍या भरमसाठ बिलांसंदर्भात आयुक्त सुधाकर देशमुख यांच्याशी मी चर्चा केली असून, येणार्‍या तक्रारींचे ऑडिटरमार्फत ऑडिट करण्याची व त्या अनुषंगाने रुग्ण व त्यांच्या कुटुंबाला न्याय देण्याची विनंती केली असल्याचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी ऑनलाइन संवादात स्पष्ट केले.

Check Also

केळवणे येथे आमदार महेश बालदींच्या प्रचाराचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्ष केळवणे येथे उरण मतदार संघाचे दमदार आमदार महेश …

Leave a Reply