Breaking News

लोकनेते दि. बा. पाटील यांच्या नावासाठी गुरुवारी मानवी साखळी आदोलन

विमानतळ कृती समिती वेधणार सरकारचे लक्ष

पनवेल ः रामप्रहर वृत्त
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिवंगत दि. बा. पाटील यांचेच नाव द्यावे, या रायगड, ठाणे, पालघर, मुंबई आदी जिल्ह्यांतील लोकप्रतिनिधी, प्रकल्पग्रस्त, शेतकरी, कष्टकरी, ओबीसींसह विविध समाजातील जनतेच्या मागणीकडे राज्य सरकार दुर्लक्ष करीत असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत झालेली बैठकही अयशस्वी ठरली आहे. त्यामुळे गुरुवारी (दि. 10) सकाळी 10 वाजता रायगड ते अगदी मुंबईपर्यंत कोरोनाचे नियम पाळून मानवी साखळी आंदोलन करण्यात येणार आहे.
लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीच्या माध्यमातून होणार्‍या या आंदोलनाला रायगड, नवी मुंबई, मुंबई, ठाणे, पालघर येथील शेकडो संघटनांनी, वारकरी सांप्रदायांनी पाठिंबा दिला असून कृती समितीचे पदाधिकारी, तसेच पाठिंबा दिलेल्या संघटना, वारकरी सांप्रदाय, विविध पक्षांतील कार्यकर्ते, संस्था-संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते असे किमान 35 हजार जण या आंदोलनात सहभागी होणार आहेत आणि तशी तयारीही जिल्हा व विभागनिहाय झाली आहे.
लोकनेते दि. बा. पाटील यांच्या नावाचा आग्रह सुरुवातीपासूनच प्रकल्पग्रस्त, शेतकरी, कष्टकरी जनता आणि राजकीय पक्षांचे नेते करीत आले आहेत. कारण दि. बा. पाटील यांची नवी मुंबई ही कर्मभूमी आहे. येथील भूमिपुत्रांना, प्रकल्पग्रस्तांना, शेतकरी, कष्टकर्‍यांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी आपले सबंध आयुष्य वेचले आहे. 1984 साली शेतकर्‍यांच्या जमिनीला योग्य भाव मिळावा यासाठी त्यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या व देशभर गाजलेल्या शौर्यशाली लढ्यातून शेतकर्‍यांना साडेबारा टक्के विकसित जमीन देण्याचे जे तत्त्व प्रस्थापित झाले, ते पुढे सबंध महाराष्ट्रातील प्रकल्पग्रस्त शेतकर्‍यांना लागू झाले. त्यामुळे दि. बा. पाटील हे महाराष्ट्रातील शेतकर्‍यांचे व प्रकल्पग्रस्तांचे लोकनेते होते.
पाच वेळा आमदार, दोनदा खासदार, विरोधी पक्षनेते, नगराध्यक्ष अशी दमदार कारकीर्द दि. बा. पाटील यांची राहिली आहे. आपल्या बुलंद आवाजाने महाराष्ट्र विधिमंडळात तसेच खासदार म्हणून दिल्लीच्या सार्वभौम संसदेत शेतकर्‍यांचे, कष्टकर्‍यांचे, प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न त्यांनी पोटतिडकीने मांडले. मंडल आयोगाच्या अंमलबजावणीसाठी आणि त्यानंतर ओबीसी समाजात जागृती करण्यासाठी त्यांनी सारा महाराष्ट्र पिंजून काढला. संयुक्त महाराष्ट्र चळवळ, सीमाप्रश्न अशा अनेक जनलढ्यांत त्यांनी हिरिरीने भाग घेऊन तुरुंगवासही भोगला आहे. त्यामुळे त्यांचे हे कार्य नव्या पिढीला स्फूर्तिदायी ठरावे तसेच त्यांच्या कर्मभूमीत त्यांची स्मृती जागरूक राहावी यासाठी नवी मुंबईत होत असलेल्या विमानतळाला त्यांचेच नाव द्यावे, अशी मागणी विविध पक्षांच्या नेत्यांनी, सामाजिक संघटनांनी आणि प्रकल्पग्रस्त शेतकर्‍यांनी केली आहे. राज्य सरकारने याचा गांभीर्याने विचार करून दि. बा. पाटील यांचेच नाव नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाला द्यावे, ही मागणी घेऊन हे आंदोलन होणार आहे.
‘दिबां’च्या नावावर कृती समिती ठाम
पनवेल ः नवी मुंबई विमानतळाला नाव देण्याच्या विषयावर मुंबईत वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत मंगळवारी (दि. 8) रात्री बैठक झाली. या बैठकीस नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे, सर्वपक्षीय कृती समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील, उपाध्यक्ष माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, जगन्नाथ पाटील, कार्याध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, मनसेचे आमदार राजू पाटील, कॉ. भूषण पाटील, आरपीआयचे कोकण अध्यक्ष व उपमहापौर जगदिश गायकवाड, काँग्रेसचे प्रदेश सचिव संतोष केणे, जे. डी. तांडेल, गुलाबराव वझे, तसेच महाविकास आघाडीचे प्रतिनिधी उपस्थित होते.
बैठकीत मुख्यमंत्री ठाकरे यांनी दि. बा. पाटील यांचे नाव देण्यासाठी विमानतळ परिसरातील इतर ठिकाण सरकारला सूचविण्याचा सल्ला समितीला दिला. प्रकल्पग्रस्तांचे नेते दि. बा. पाटील आदरणीय आहेत. त्यांनी केलेले कार्य महान आहे, मात्र बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याचे जनमताने निश्चित झाल्याचा अजब दावा मुख्यमंत्र्यांनी केला. त्यामुळे महाविकास आघाडीने या बैठकीपूर्वी ‘प्री-प्लॅन’ केल्याचे अधोरेखित झाले. असे असले तरी कृती समितीने आम्हाला कुठलाही पर्याय नको, ‘दिबां’चेच नाव नवी मुंबई विमानतळाला पाहिजे, असा निर्धार जाहीर केला.
दरम्यान, या बैठकीत शेकापचे आमदार बाळाराम पाटील यांनी विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव न देता न्हावा-शेवा सी लिंक किंवा एका टर्मिनलला नाव द्यावे, अशी दर्पोक्ती केली. त्यामुळे आमदार बाळाराम पाटील यांची भूमिका किती स्वार्थी आहे हे स्पष्टपणे दिसून आले. या वेळी समितीने मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत 2015पासून ‘दिबां’चे नाव देण्यासाठी पाठपुरावा सुरू असल्याचे सांगितले. हवाई वाहतूक मंत्र्यांपासून ते तत्कालीन मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली होती. असे असताना बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा प्रस्ताव आणणे संयुक्तिक नाही, असे म्हटले, मात्र बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याचे निश्चित झाल्याने ‘दिबां’चे नाव देता येणार नाही, असे अप्रत्यक्षपणे मुख्यमंत्री ठाकरे यांनी समितीला सांगितले. असे असले तरी समितीने फक्त आणि फक्त ‘दिबां’चेच नाव विमानतळाला दिले गेले पाहिजे व त्यासाठी संघर्षाची तयारी दर्शवत 10 जूनला मानवी साखळी आंदोलन, तर 24 जूनला सिडकोला घेराव घालणार असल्याचे स्पष्ट केले.
विमानतळ नामकरणासंदर्भात पुन्हा बैठक घेऊ, असे सांगितले असले तरी शेकापचे आमदार बाळाराम पाटील यांनी न्हावा-शेवा सी लिंक किंवा एका टर्मिनलला नाव देण्याचा प्रस्ताव दिला. ते पाहता यांचे पूर्णपणे आधीच ठरलेले दिसते. त्यामुळे सगळ्यांनी दि. बा. पाटीलसाहेबांच्या नावासाठी संघर्षात उतरले पाहिजे. आंदोलनात कोविडचा प्रोटोकॉल पाळू, पण आंदोलनास रोखल्यास ठरल्याप्रमाणे जनतेला त्रास न देता रस्त्यावर उतरून ‘दिबां’च्या नावासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू या. आपण 10 व 24 तारखेला जोरात लढायचे व भूमिपुत्र किती प्रखर आहेत हे सरकारला दाखवून दिल्याशिवाय हा निर्णय बदलेल असे वाटत नसल्याचे या वेळी कृती समितीचे कार्याध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर म्हणाले.

Check Also

नमो चषक महोत्सवाचा शनिवारी पारितोषिक वितरण सोहळा

माजी क्रिकेटपटू तथा प्रशिक्षक दिलीप वेंगसरकर यांची प्रमुख उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्त लोकप्रिय पंतप्रधान …

Leave a Reply