जनतेने नाकारलेले असताना देखील शेकापचे रायगडमधील नेतृत्व पूर्वीप्रमाणेच मनमानी कारभार करत राहिले, त्याची फळे त्यांना येत्या काळात भोगावी लागतीलच. शेकापच्या नगरसेवकांच्या आप्तस्वकीयांनी उचललेले पाऊल हे विकासाच्या दिशेने टाकलेले पाऊल आहे. या सगळ्यांचे भारतीय जनता पक्षात मन:पूर्वक स्वागत. आपल्या सर्वांचा लाडका गणपतीबाप्पा ही बुद्धीची देवता आहे. म्हणूनच हे सकारात्मक पाऊल उचलण्याची बुद्धी गणरायाने आपल्या सर्वांना दिली असे म्हटले तर वावगे ठरू नये.
तळागाळातील समाजात पोटतिडिकेने केलेल्या समाजसेवेच्या पायावर एखादी चळवळ उभी राहते, त्या चळवळीचे रूपांतर राजकीय पक्षात होते आणि जनमानसात मोठी प्रतिमा असलेला हाच राजकीय पक्ष स्वार्थी आणि सत्तांध पुढार्यांच्या संकुचित राजकारणामुळे लोकांच्या मनातून पार उतरतो. एकेकाळी रायगड जिल्ह्यात दबदबा असलेल्या शेतकरी कामगार पक्षाचे नेमके हेच झाले आहे. कार्यकर्त्यांना चुचकारून जवळ घ्यायचे आणि काम झाले की खड्यासारखे दूर करायचे. लोकभावनेची कदर न करता, चालू असलेल्या विकासकामांत मोडता घालण्याचे उद्योग सुरू ठेवायचे या सार्या राजकारणाला कंटाळून, पनवेल महापालिकेतील शेकापचे नगरसेवक हरेश केणी यांचे बंधु तसेच अन्य काही शेकाप नगरसेवकांच्या आप्तस्वकीयांनी त्यांच्या असंख्य समर्थकांसह गणेशोत्सवाच्या शुभमुहुर्तावर अत्यंत सकारात्मक निर्णय घेत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. अर्थात शेकापमधील प्रस्थापित पुढार्यांबद्दल असलेली नाराजी हे एकमेव कारण या घटनेमागे नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे द्रष्टे नेतृत्व, महाराष्ट्रातील भारतीय जनता पक्षाचे भरीव काम तसेच रायगड जिल्ह्याचे कुटुंबप्रमुख, लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्या समर्थ आणि विधायक कारभाराला मिळालेली ही पावतीच म्हटली पाहिजे. पनवेल परिसरात भारतीय जनता पक्षाने गेल्या सहा-सात वर्षांत ज्या वेगाने विकास कामे हाती घेतली आणि ज्या तडफेने ती राबवली त्याने सर्वच विरोधकांची तोंडे बंद झाली आहेत. राजकारणाचा पाया समाजसेवाच असतो. राजकारण हे समाजसेवेचेच एक माध्यम आहे या दृष्टिकोनातून भाजपच्या कार्यकर्त्यांनी रायगड जिल्ह्यात अनेकविध कामे केली. या परिसरात भाजपला मिळणारे यश विरोधकांच्या पोटदुखीचे कारण बनले. त्यात विशेषत्वाने शेकापचे आजवरचे अपयश अधिक ठळक होत गेले ही खरी मेख आहे. गेल्या काही वर्षांत रायगड जिल्ह्यात भरीव काम उभे राहिले असले तरी अजून बरेच काम करावयाचे आहे. विकासाचा मार्ग हा कधीच निष्कंटक नसतो. ही एक प्रकारे अडथळ्यांची शर्यत असते. असे अडथळे दूर करत-करतच जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाने आपला अमिट ठसा उमटवला आहे. नव्या नेत्यांचा आणि कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश भारतीय जनता पक्षाचे हात आणखी बळकट करेल यात शंकाच नाही. कोरोना महामारीच्या संकटातून अजुनही आपण बाहेर पडू शकलेलो नाही. त्यात भरीस भर म्हणून सरकारच्या आणि नोकरशाहीच्या ढिल्या कारभाराशी देखील सामना करावा लागत आहे. नव्याने पक्षाला मिळालेली कुमक ही निश्चितच पनवेलवासियांना उपकारक ठरेल. यंदा प्रथमच गणेशोत्सव अनेक निर्बंधांनिशी साजरा करण्याची पाळी आली आहे. नव्या नेत्या-कार्यकर्त्यांच्या पक्षप्रवेशाच्या रूपाने जणु गणरायानेच येता-येता शुभाशीर्वाद दिले आहेत. पनवेल परिसरातील विकासकामांचा हा नवा श्रीगणेशा ठरो हीच वरदविनायकाच्या चरणी प्रार्थना.