भाजपची सडकून टीका
मुंबई ः प्रतिनिधी
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला येथील प्रकल्पग्रस्त व भूमिपुत्रांचे रणझुंझार नेते लोकनेते दि. बा. पाटील यांचेच नाव द्यावे, या समस्त रायगडवासीयांसह बहुसंख्य जनतेच्या मागणीबाबत ठाकरे सरकार हटवादी भूमिका घेत आहे. आपल्या मागणीवर नवी मुंबई, रायगडमधील भूमिपुत्र ठाम असून टोकाचा संघर्ष करण्याच्या पवित्र्यात आहेत. आता घाटकोपर-मानखुर्द लिंक रोडवर छेडानगर ते मानखुर्दपर्यंत होत असलेल्या पुलाच्या नावावरूनही नवा वाद निर्माण झाला असून त्यावरून भाजपने मतपेटीचे राजकारण तसेच हिंदुत्वाच्या मुद्द्यावर शिवसेनेला लक्ष्य केले आहे.
मानखुर्द फ्लायओव्हर हा एकूण 2.9 किमी लांबीचा आहे. हा पूल लवकरच वाहतुकीसाठी खुला केला जाणार आहे. या उड्डाणपुलास सुफी संत सुल्तानुल हिंद ख्वाजा गरीब नवाज (मोईनुदिन सुफी चिश्ती-अजमेरी) यांचे नावे देण्यात यावे, अशी मागणी तारीक उल्मा-ए-अहले सुन्नत संस्थेकडून करण्यात आली आहे. या मागणीला समर्थन देणारे निवेदन शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांनी मुख्यमंत्र्यांना दिले आहे. छेडानगर ते मानखुर्द या परिसरात सुमारे 70 टक्के लोकसंख्या ही मुस्लीमधर्मीयांची असल्याने आपण या उड्डाणपुलास ख्वाजा गरीब नवाज यांचे नाव देऊन या समाजाच्या भावनांचा सन्मान करावा, अशी आग्रही विनंती शेवाळे यांनी पत्राद्वारे केली आहे.
तर विश्व हिंदू परिषदेच्या चेंबूर जिल्हा पदाधिकार्यांनी या पुलाचे नाव लोकशाहीर साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या नावाने ठेवावे, असे निवेदन मुख्यमंत्र्यांना दिले आहे. हे निवेदन शेवाळे यांच्या पत्रानंतर दोनच दिवसांनी देण्यात आले आहे. त्यामुळे यावरून वाद रंगण्याची शक्यता आहे. या मुद्द्यावरून भाजपचे आमदार अतुल भातखळकर आणि प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी शिवसेनेवर सडकून टीका केली आहे.
जय भवानी, जय शिवाजीपासून सुरू झालेला प्रवास जेव्हा हजरत टिपू सुलतान की जय… पर्यंत येतो तेव्हा अशा पत्रांचे आश्चर्य वाटत नाही. काँग्रेस, असदुद्दीन ओवेसींच्या मतपेढीला शिवसेनेने तीव्र स्पर्धा निर्माण केली आहे. सोनिया मातोश्रींच्या चरणी गेल्यापासून ज्वलंत हिंदुत्व खुंटीला टांगलंय, अशी टीका आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे. तर, शिवसेनेने हिंदुत्व सोडले, मराठी बाणा सोडला. आता सर्वसामान्य मुंबईकरांचा आवाजही सोडला. अण्णा भाऊ साठे म्हणजे सर्वसामान्यांचा, कष्टकर्यांचा आवाज. मानखुर्दच्या उड्डाणपुलास त्यांचे नाव देणे योग्य असताना ख्वाजा गरीब नवाजचे नाव पुलाला देण्याची शिवसेना खासदाराची सूचना, अशा शब्दांत उपाध्ये यांनी शिवसेनेला लक्ष्य केले आहे. दरम्यान, आता या सार्या गोंधळात हा नामकरणाचा वाद किती चिघळतो याकडे सार्यांचे लक्ष लागून राहिले आहे.