Breaking News

सिंहगड, लोणावळ्यात अतिउत्साही पर्यटकांची गर्दी

पुणे ः प्रतिनिधी
कोरोना महामारीमुळे सिंहगड पर्यटक व गडप्रेमींसाडी खुला करण्यात आलेला नसतानाही रविवारी (दि. 13) पहाटेपासून ते दुपारपर्यंत येथे कोरोना प्रतिबंधात्मक नियम पायदळी तुडवत पर्यटकांनी तुफान गर्दी केली होती. तसेच सुटीचे निमित्त साधत शनिवार-रविवारी लोणावळा, नवी मुंबईतील पारसिक हिल भागात अनेक जवळपासच्या पर्यटकांनी गर्दी केली होती. मुंबईकरांच्या वाटाही लोणावळ्याच्या दिशेने आणि पुण्यानजीक असणार्‍या डोंगरमाथ्यांच्या दिशेने वळल्या.
प्रशासनाने निर्बंध शिथिल केल्यानंतरचा हा पहिलाच रविवार होता. त्यामुळे अनेक नागरिक पर्यटनासाठी, ट्रेकिंगसाठी घराबाहेर पडले. सिंहगडावरील गाडीतळ वाहनांनी खचाखच भरला होता. हजारो पर्यटक सिंहगडावर विनामास्क, सोशल डिस्टन्सिंग न पाळता मुक्त संचार करीत होते. वन विभागाचे कर्मचारी व पोलीस कर्मचारी गडावर जाण्यास बंदी असल्याचे सांगत होते, मात्र अतिउत्साही पर्यटक कर्मचार्‍यांशी हुज्जत घालून गडावर जात होते. अचानक मोठ्या प्रमाणात सिंहगडावर गर्दी उसळल्याने वन विभाग व पोलीस प्रशासनही हतबल झाले होते.
जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशानुसार सिंहगड पर्यटकांसाठी अद्यापही बंद आहे. त्यामुळे नियम मोडून कोणीही गडावर गर्दी करू नये, अन्यथा गुन्हे दाखल करण्यात येतील. शासनाचे आदेश पाळून सहकार्य करावे, असे आवाहन या वेळी वन विभाग व पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply