उरण : प्रतिनिधी
खोल समुद्रात मासेमारी करून शासनाच्या मासेमारी बंदीला फाट्यावर मारून मासळी विक्री करीत असतांना उरण तालुक्यातील वशेणी-दादर पुलाखालील बंदरात दोन बोटींवर महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम 1981 चे कलम 4 नुसार कारवाई करण्यात आली आहे. उरणचे सहाय्यक मत्स्यव्यवसाय परवाना अधिकारी स्वप्नील दाभणे यांनी ही कारवाई केली आहे.
उरण तालुक्यातील खोपटे येथील खाडीत रिलायन्स जेटीवर धाड टाकून ही कारवाई शनिवारी दुपारी करण्यात आली आहे. या कारवाईत दोन बोटी खोल समुद्रात मासेमारी करून मासळी विक्री करताना आढळून आल्याने त्या जप्त करण्यात आल्या, अशी माहिती परवाना अधिकारी स्वप्नील दाभणे यांनी दिली आहे. पावसाळ्यात 1 जून ते 31 जुलै हा कालावधी मासळीच्या प्रजननाचा असल्याने व समुद्रही या कालावधीत मोठ्या प्रमाणात खवळलेला असतो. त्यामुळे मासेमारी बोटींना अपघात होण्याची शक्यता असल्याने शासनाकडून खोल समुद्रात मासेमारीला बंदी करण्याची खबरदारी घेण्यात येत आहे. मात्र शासनाने घातलेल्या बंदीच्या कायद्याचे पालन येथील बोटीमालक न करता अवघ्या पाच दिवसांचा समुद्रातील मासेमारी बंदीचा अवधी शिल्लक असतांनाही आपल्या व्यासायाच्या हव्यासापोटी खलाशांचा जीवाशी खेळ खेळत असून शासनाच्या मासेमारी बंदीचा कायदा मोडून मासेमारी बंदीच्या कालावधीतही खलाशांच्या जीवाची पर्वा न करता बंदीच्या काळातही आपल्या नौका खोल समुद्रात मासेमारीसाठी पाठविण्याचे धैर्य करीत आहेत.