खोपोली : प्रतिनिधी
वीज पुरवठ्यातील अनियमिततेमुळे पाणीपुरवठा यंत्रणा बंद पडल्याने खालापूर शहरातील कुटुंबांना ऐन पावसाळ्यात पाण्यासाठी भटकावे लागत आहे. त्यांनी गेल्या तीन दिवसांपासून विहिरीचा आश्रय घेतला आहे. खालापूर तालुक्यातील कलोते धरणातून शहराला पाणीपुरवठा करण्यात येतो. त्यासाठी सुमारे सहा किलोमीटर लांबीची जलवाहिनी टाकण्यात आली आहे. या योजनेतील वीज पंप जळणे, कधी जलवाहिनी फुटणे, तर कधी वीजपुरवठा खंडित होणे या प्रकारामुळे खालापूरच्या पाणीपुरवठ्यात नेहमी व्यत्यय असतो. कलोते धरणालगत विहीर बांधण्यात आली असून, या विहिरीतील पाणी वीजपंपाद्वारे खालापूर शहरातील जलकुंभपर्यंत आणले जाते. विहिरीनजीक असलेल्या पंप हाऊसला वीज पुरवठा करणार्या केबलमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने गेल्या तीन दिवसापासून खालापूर शहराला पाणीपुरवठा होत नाही. त्यामुळे शहरातील नागरिकांवर पाण्यासाठी विहिरीकडे धाव घेण्याची वेळ आली आहे. वीज पुरवठ्यातील तांत्रिक बिघाड दूर करण्यासाठी मंगळवारी महावितरण आणि खालापूर नगरपंचायतीचे कर्मचारी काम करत होते. वीजपुरवठा नसल्याने पाणीपुरवठा बंद होत असेल तर त्या ठिकाणी नगरपंचायतीने पर्यायी जनरेटरची व्यवस्था करावी, अशी मागणी खालापूरातील नागरिक करत आहेत.
महावितरण अधिकारी आणि कर्मचारी यांच्याकडे पाठपुरावा करून नवीन वीजेचे खांब तसेच केबल टाकण्याचे काम पूर्ण होईल. वीजपुरवठा खंडित होण्याची समस्या कायमची दूर व्हावी, या दृष्टीने काम करण्यात आले आहे.
-सुरेखा भणगे शिंदे, मुख्याधिकारी, खालापूर नगरपंचायत
मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गाला क्रॉस केबल होती. नेहमी येणारी तांत्रिक अडचण दूर करण्याच्या दृष्टीने नवीन खांब व केबल टाकण्यात आली आहे. त्यामुळे पाणीपुरवठा योजनेला नियमीत वीजपुरवठा होईल.
-व्ही. व्ही. गायकवाड, उपमुख्य कार्यकारी अभियंता, महावितरण, खालापूर