खालापूर ः प्रतिनिधी
आधीच विविध समस्यांमुळे बळीराजा त्रस्त असताना खालापूर तालुक्यातील माणकिवली परिसरात शेतकरीवर्गापुढे नवे संकट उभे राहिले आहे. येथील भातरोपांची रानडुकरांनी नासधूस केल्याने शेतकर्यांच्या मेहनतीवर पाणी फेरले गेले आहे. त्यामुळे हे शेतकरी संकटात सापडले आहेत. खालापूर तालुक्याला औद्योगिक नगरी म्हणून ओळख प्राप्त असताना येथील बहुतांशी शेतकरी आपला वडिलोपार्जित शेती व्यवसाय करीत असतात, मात्र भातशेतीचे उत्पादन घेत असताना शेतकर्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. अशातच माणकिवली परिसरात रानडुकरांनी उच्छाद मांडला आहे. येथील शेतकर्यांच्या भातरोपाची रानडुकरांनी पूर्णपणे नासधूस केली आहे. झालेल्या नुकसानीची तक्रार नुकसानग्रस्त शेतकर्यांनी वनविभागाच्या अधिकार्यांकडे केली असून, भरपाईची मागणी केली आहे. अधिकारीवर्गाने नुकसानग्रस्त भातशेतीची पाहणी केली.