ठाकरे सरकारविरोधात घोषणाबाजी
मुंबई ः प्रतिनिधी
संभाजी ब्रिगेड संघटनेने बुधवारी (दि. 30) राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या शासकीय निवासस्थानाबाहेर आंदोलन केले. मराठा, ओबीसी आरक्षण आणि इतर विषयांवर चर्चा करण्यासाठी संभाजी ब्रिगेडने पत्र लिहून वेळ मागितली होती, पण भेटीची वेळ न दिल्याने त्यांनी मंत्रालयाच्या बाजूला असलेल्या ठाकरे यांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन केले.
मराठा समाज व ओबीसी आरक्षणाचे संरक्षण करावे, सर्वोच्च न्यायालयाच्या निकालापूर्वीच मराठा समाजातील नोकरीस पात्र उमेदवारांचा रखडवलेल्या नियुक्त्या तत्काळ द्याव्यात, मराठा समाजातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क तत्काळ माफ करावे, सर्व समाज घटकांची जातनिहाय जनगणना करावी, मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश करण्यासाठी विशेष अधिवेशन बोलावणे आवश्यक आहे, अशा संभाजी ब्रिगेडच्या मागण्या आहेत. या वेळी आदित्य ठाकरे यांच्या निवासस्थानाबाहेर संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. मरीन ड्राइव्ह पोलिसांनी या कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन पुढील कारवाईसाठी पोलीस ठाण्यात आणलेे.