कोरोना साथीमध्ये अनेक जण शेअर बाजारात ट्रेडिंग करू लागले आहेत. ट्रेडिंग करताना जगभर वापरल्या जाणार्या तांत्रिक विश्लेषणाचे महत्त्व तर जाणून घेतलेच पाहिजे, पण ते शिकूनही घेतले पाहिजे.
कोरोना साथीच्या काळात अनेकांचा रोजगार गेल्याने तसेच दीर्घकाळ घरीच बसावे लागल्याने त्यातील अनेकांनी शेअर बाजारात ट्रेडिंग करून काही कमाई करण्यास सुरुवात केली आहे. अनेकदा सोशल मिडीयावर मिळणारे कॉल किंवा कोणी सांगितले म्हणून ट्रेडिंग केले जाते. त्यात ट्रेडरला मोठा फटका बसू शकतो, पण अशा नव्या ट्रेडरने हा अभ्यास स्वत:च केला तर तो स्वावलंबी तर होतोच, पण चांगली कमाईही होऊ शकते. ट्रेडिंग ज्या तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे केले जाते, ते सुरुवातीस थोडे किचकट वाटत असले तरी त्यात रस घेतल्यास त्यातून चांगला पैसा मिळविला जाऊ शकतो.
शेअर बाजारात घेतलेल्या कंपन्यांचे शेअर्स रास्त भावात खरेदी अथवा विक्री करणं यासाठी आपण नक्कीच तांत्रिक विश्लेषणाचा / TA (Technical Analysis) आधार घेऊ शकतो. आज आपण पाहूयात की टेक्निकल अॅनालिसीस ((TA) म्हणजे नक्की काय?
ज्या कंपन्यांचे शेअर्स घ्यायचे त्यांचा अभ्यास हा दोन प्रकारे केला जातो. तो म्हणजे फंडामेंटल अॅनालिसीस (मूलभूत विश्लेषण) व तांत्रिक विश्लेषण (टेक्निकल अॅनालिसीस). यापैकी फंडामेंटल अॅनालिसिस म्हणजे काय हे मागे पाहिलेच आहे, तर आता या टेक्निकल अॅनालिसिस (TA) बद्दल जाणून घेऊ.
गुंतवणूक करताना एखादी चांगली कंपनी निवडण्यासाठी फंडामेंटल अॅनालिसिसचा आधार घ्यावा व अशा निवडलेल्या कंपनीचे शेअर्स कोणत्या भावात खरेदी करावेत यासाठी तांत्रिक विश्लेषणाचा आधार घ्यावा. काही लोक तांत्रिक विश्लेषणाला तितकसं महत्त्व देत नाहीत, कारण त्यांच्या दृष्टीनं फंडामेंटल अॅनालिसिस हेच खरं संशोधन आहे व त्यावरच शेअर्सची खरेदी-विक्री अवलंबून असावी, मग अशांना माझा प्रामाणिक प्रश्न आहे की, जर एखाद्या कंपनीची प्राथमिक तत्वे (फंडामेंटल्स) जसे की उत्पन्न, नक्त नफा किंवा तोटा, तरतूद, गंगाजळी इत्यादी. जर रोज बदलत नाहीत किंवा फक्त कंपन्यांचे तिमाही निकाल, वार्षिक निकाल, एखाद्या कंपनीतील महत्त्वाच्या घडामोडी, राजकीय उलथापालथ, सरकारी अथवा जागतिक धोरण बदल, नैसर्गिक आपत्ती इत्यादी. गोष्टींच कंपन्यांच्या शेअर्सच्या भावावर परिणाम करू शकतात, तर मग अशा गोष्टींशिवाय त्या कंपन्यांच्या शेअर्सच्या भावात रोजच्या रोज लक्षणीय चढाव-उतार का होतात? याचं उत्तर एकच की प्रत्येक भावात त्या कंपनीचे शेअर्स हे एखाद्या व्यक्तीस खरेदीयोग्य वाटतात, तर एखाद्या व्यक्तीस ते विक्रीयोग्य वाटतात. (मागणी व पुरवठा) आणि म्हणूनच त्या भावात व्यवहार होतात मग तो भाव अत्त्युच्च असो वा नीचांकी.
नक्कीच तांत्रिक विश्लेषणानं आपल्याला या भावांचा अंदाज बांधता येतो की कोणत्या भावात एखादा शेअर खरेदी करावा अथवा विकून बाहेर पडावं. तांत्रिक विश्लेषणाच्या सहाय्यानं आपण कोणत्याही शेअर्ससाठी योग्य (अचूक नाही) प्रवेश पातळी (एन्ट्री लेव्हल) व निर्गमन पातळी
(एक्झिट लेव्हल) ठरवू शकतो.
तांत्रिक विश्लेषणाचा एक मुख्य फायदा हा आहे की एकदा का तुम्ही हे शिकलात की, तुम्ही त्याचा वापर कोणत्याही असेट क्लास (शेअर्स, कमॉडीटी, करन्सी इत्यादी.) मध्ये करू शकता. याउलट फंडामेंटल अॅनालिसिसमध्ये शेअर्स घेण्यासाठी त्या कंपनीचा ताळेबंद, नफा-तोटा खाते उतारा, कॅशफ्लो स्टेटमेंट इत्यादी गोष्टी अभ्यासाव्या लागतात, तर सोन्याच्या खरेदीसाठी इतर बाजू तपासाव्या लागतात, तर एखाद्या कृषी उत्पादनासाठी वेगळ्याच प्रकारची माहिती वजा अभ्यास असणं गरजेचं ठरतं.
आता पाहूया तांत्रिक विश्लेषणाची तत्वं
प्रत्येक घडामोडीचं प्रतिबिंब बाजारात उमटतं (Market discounts everything) म्हणजे कंपनीच्या मूलभूत तत्वांवर परिणाम करणारी कोणतीही घडामोड ही त्या कंपनीच्या शेअर्सच्या भावाच्या हालचालीच्या स्वरूपात आलेखावर टिपली जाते. एखाद्या कंपनीच्या शेअर्सच्या भावात लक्षणीय चढाव अथवा उतार का झाले यापेक्षा ते कसे झाले हे तांत्रिक विश्लेषण नमूद करतं.
किंमत ही कलरेषेप्रमाणे चढते अथवा उतरते.(Price moves in trend).
मागील गोष्टीची पुनरावृत्ती होते. (History tends to repeat).
तांत्रिक विश्लेषणामध्ये मुख्यत्त्वे तीन प्रकारचे आलेख (चार्ट्स) पाहायला मिळतात. (जपानी) कॅण्डलस्टिक, लाइन व बार. लाइन चार्ट हा अगदी साध्या प्रकारचा चार्ट असतो. यात प्रत्येक दिवसाअखेरची किंमत ही एका रेषेनं जोडली जाते.
बार प्रकारचे चार्ट्स हे एखाद्या सरळ रेषेसारखे असतात व त्या सरळ रेषेला डावीकडं व उजवीकडं दोन समांतर रेषा असतात पैकी डावी समांतर रेष ही त्या शेअरचा खुलता भाव दर्शवते व उजवीकडील समांतर रेष बंद भाव. मधील उभी रेष ही त्या बारचा उच्चतम भाव व न्यूनतम भाव दर्शवते.
अगदी असच कॅण्डलस्टिक चार्टच्या बाबतीत. भरीव जागा यास रिअल बॉडी म्हणतात ज्यातील वरील बाजू ही खुलता भाव तर खालील बाजू ही बंद भाव दर्शवते. बॉडीच्या खाली किंवा वरती असलेल्या रेघा या त्या कॅण्डलचा हाय व लो दर्शवतात त्यांना अनुक्रमे अप्पर शाडो व लोअर शाडो म्हणतात. आता ही कॅण्डल चार्टवर एका मिनिटापासून ते एका वर्षाचे दर्शक असू शकते. जर खुलत्या भावापेक्षा बंद भाव जास्त असेल तर ती कॅण्डल हिरवी अथवा पांढरी दर्शवतात व जर खुलत्या भावापेक्षा बंद भाव कमी असेल तर ती कॅण्डल लाल अथवा काळी दर्शवतात. अशा अनेक कॅण्डल्सनी बनलेल्या चार्टला कॅण्डलस्टिक चार्ट म्हणतात. जपानी लोक याचा उपयोग सतराव्या शतकात तांदळाचे व्यवहार करण्यासाठी करत असत म्हणून याला जपानी कॅण्डलस्टिक म्हणतात.
पुढे आपण कॅण्डलस्टिकचे मुख्य प्रकार व आलेख नमुने पाहू, ज्यांवरून ढोबळ मानाने काही अनुमान कशाप्रकारे काढता येऊ शकतात, हे आपल्या लक्षात येईल.
Check Also
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या विजयाचा पीआरपीकडून निर्धार
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांना चौथ्यांदा विजयी …