Breaking News

खराब हवामानाचा मच्छीमारांना फटका

रायगड जिल्ह्यात मासेमारी ठप्प; बोटी लागल्या किनारी

श्रीवर्धन ः प्रतिनिधी

मागील 10 ते 15 दिवसांपासून श्रीवर्धन तालुक्यासह रायगड जिल्ह्यात जोरदार वारे वाहत असल्यामुळे मासेमारी पूर्ण ठप्प झाल्याचे पाहायला मिळत आहे. उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहणार्‍या जोरदार वार्‍यांमुळे समुद्रामध्ये मोठ्या प्रमाणात लाटादेखील उसळत आहेत. परिणामी पाण्यामधून मच्छीमार बोट चालवणे मच्छीमारांना कठीण होऊन बसत आहे.

या हंगामामध्ये श्रीवर्धन तालुक्यात चांगल्या प्रमाणावर मच्छी मिळते. पापलेट, सुरमई, हलवा, कोळंबी, बांगडा त्याचप्रमाणे बगी, मांदेली, बीलीज, मुशी, ढोमे, बोईट अशा प्रकारची मच्छी बाजारात मोठ्या प्रमाणात येत असते, मात्र सध्या जोरदार वार्‍यामुळे मासेमारीसाठी बोटी पाठवणे मच्छीमारांना अतिशय कठीण होऊन बसले आहे. अनेक मच्छीमारांनी तर आपल्या बोटी जीवना बंदर येथून सरळ खाडीमध्ये नेऊन उभ्या केल्या आहेत.

मार्च महिना सुरू झाल्यानंतर राज्यामध्ये कोरोनाचे रुग्णदेखील मोठ्या प्रमाणावर वाढू लागले आहेत. त्यामुळे या ठिकाणी येणार्‍या पर्यटकांचे प्रमाण खूप कमी झाले आहे. पर्यटकांचे येण्याचे प्रमाण कमी झाल्यामुळे मच्छीची मागणी कमी झाली आहे. मागील वर्षी लॉकडाऊन, त्यानंतर आलेले चक्रीवादळ व सतत खराब हवामानामुळे आधीच मच्छीमार बांधव पुरता मेटाकुटीला आला आहे. मासेमारी बंद असल्याने बर्फाचे कारखानेदेखील आर्थिक मंदीत आले आहेत. अनेक मच्छीमार सोसायट्यांचा डिझेल परतावा अद्याप न मिळाल्याने मच्छीमार अधिक आर्थिक संकटात सापडलेला आहे. येत्या आठ दिवसांत हवामानाची परिस्थिती न सुधारल्यास मच्छीमार बांधवांवर उपासमारीची वेळ येते की काय, अशी शंका निर्माण झाली आहे.

जोरदार वारे वाहत असल्याने मासेमारी व्यवसाय पूर्णपणे ठप्प आहे. येत्या काही दिवसांत परिस्थिती सुधारली नाही तर मच्छीमार बांधवांवर उपासमारीची वेळ येईल.

-भारत चोगले, व्हाइस चेअरमन, श्रीकृष्ण मच्छीमारी सहकारी संस्था, जीवना बंदर, श्रीवर्धन

Check Also

उरणमधील ‘उबाठा’, शेकापचे कार्यकर्ते भाजपमध्ये

आमदार महेश बालदी यांच्याकडून स्वागत उरण : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत शिवसेना उद्धव बाळासाहेब …

Leave a Reply