Breaking News

विमा – माणसांचा आणि पिकांचा

वैद्यकीय खर्च असो, अचानक येणारा मृत्यू असो की पिकांचे नुकसान असो, यातील जोखीम कमी करण्यासाठी विमा काढण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. जोखीम कमी करण्याचा तोच मार्ग जगाला सापडला आहे. त्यामुळे आपापल्या पात्रतेनुसार अशी जोखीम विमा काढून कमी करणे ही आपली जबाबदारी आहे.
आरोग्य विम्यामुळे आरोग्य सेवा महाग होतात, या आरोपात तथ्य असले तरी गंभीर आजाराच्या वेळी येणारा मोठा खर्च भागविण्याचा दुसरा मार्ग आपल्याला अजून सापडलेला नाही. त्यामुळेच विकसित देशांनी आरोग्य विमा पद्धतीचा स्वीकार केला आहे. अर्थातच तेथील नागरिकांना आरोग्य सेवा महागात मिळते आहे. अमेरिकेतील भारतीय नागरिक भारतात येऊन अनेक उपचार घेतात, त्याचे कारण भारतात या सेवा स्वस्त आहेत, असे म्हटले जाते, अर्थात ते खरेच आहे, पण मग ज्यांना आपल्याला वैद्यकीय खर्चांपासून स्वत:ला सुरक्षित करून घ्यायचे असेल तर दुसरा काही मार्ग आहे का, याचे आजचे उत्तर ‘नाही’ असेच आहे.
जे आरोग्य विम्याचे, तेच पिक विम्याचे. पिक विमा काढला पाहिजे, यासाठी गेले चार पाच वर्षे अधिक जागरुकता केली जात असून त्याचा शेतकर्‍यांना फायदाही होतो आहे, पण त्यातही एक वाद नेहमी उभा राहतो, तो म्हणजे जेवढी रक्कम शेतकर्‍यांकडून जमा केली जाते, तेवढ्याही रकमेचा विमा शेतकर्‍यांना मिळत नाही, असा हा वाद आहे. पिकांची वेगवेगळ्या कारणांनी हानी होते आणि ती भरून काढण्याचा मार्ग पिक विमा आहे, हे विकसित देशांनीही मान्य केले आणि त्यातच काही बदल करून आपल्या देशात पिक विम्याचे प्रमाण गेले पाच वर्षे वाढत चालले आहे.
या दोन्ही वादांचा निकाल लगेच लागण्याची शक्यता नाही, मात्र या दोन्ही विम्यासंबंधी अलीकडेच काही आकडेवारी प्रसिद्ध झाली असून त्यावरून माणसांना आणि पिकांना विम्याची कशी आणि किती गरज आहे आणि तो कशा पद्धतीने पुरविला पाहिजे, या प्रश्नावर प्रकाश पडू शकतो. उदा. प्रधानमंत्री जीवन ज्योती बिमा योजनेत गेल्या वर्षी काय झाले, ते आपण पाहू. या योजनेत भाग घेतलेल्या दोन लाख 50 हजार 351 नागरिकांचा गेल्या वर्षी मृत्यू झाला. कोरोनामुळे हा आकडा वाढलेला दिसतो. त्यातील 13 हजार 100 दावे त्यात त्रुटी आढळल्याने फेटाळण्यात आले. दोन हजार 346 दावे अजून प्रलंबित आहेत. यात जे दावे सेटल करण्यात आले, त्यापोटी चार हजार 700 कोटी रुपयांचा विमा मृतांच्या वारसदारांना देण्यात आला. एका जनहित याचिकेमुळे ही माहिती उपलब्ध झाली आहे. सुमारे दोन लाख नागरिकांना मिळालेला हा विमा खूप कमी वाटत असला तरी त्याचे इतर पैलू आधी समजून घेतले पाहिजे. म्हणजे ही विमा जनधन खात्यांशी जोडलेली असून त्या खात्यांची संख्या आता 42 कोटींच्या घरात गेली आहे. यातील बहुतेकांना या योजनेचा फायदा आपोआप दिला जातो. म्हणजे ज्यांनी विम्याचा पर्याय स्वीकारला आहे, त्यांच्या खात्यातून वर्षाला 330 रुपये कापून त्यांना विमा संरक्षण दिले जाते. याचा अर्थ हे संरक्षण अतिशय स्वस्तात आणि सोप्या पद्धतीने उपलब्ध होते. कमी उत्पन्न गटातील हे नागरिक एरवी कोणताच विमा
काढू शकत नाहीत. त्यांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या वारसदारांना काहीच भरपाई मिळत नाही, पण या योजनेमुळे थोडी का होईना, पण ती मिळाली आहे. आता कोणी असा दावा करू शकतो की, या योजनेत विमा कंपन्यांना विमा हप्ता अधिक मिळतो आणि ते जे विम्याची रक्कम देतात, ती कमी असते. तर ती रक्कम कमी असते, हे सिद्ध होईल, मात्र त्यापेक्षा चांगली योजना सापडत नाही, तोपर्यंत अशा योजनांवर आपल्याला विसंबून राहावे लागेल.
आता पिक विम्याचे उदाहरण पाहू. जास्तीत जास्त शेतकर्‍यांनी पिक विमा काढावा यासाठी सरकार प्रयत्न करते आहे. तशी देशव्यापी मोहीमच या एक जुलैपासून हाती घेण्यात आली आहे. ज्या 75 जिल्ह्यांत पिक विमा (प्रधानमंत्री फसल बिमा योजना) घेण्याचे प्रमाण कमी राहिले आहे, त्या जिल्ह्यांवर अधिक भर दिला जाणार आहे. केवळ साडे पाच वर्षांपूर्वी सुरू करण्यात आलेल्या या योजनेचा लाभ सध्या 29.16 कोटी शेतकरी घेत आहेत. आतापर्यंत पिक विम्याचा हप्ता म्हणून या शेतकर्‍यांनी 17 हजार कोटी रुपये भरले असून ज्या शेतकर्‍यांचे नुकसान झाले, त्यांना याकाळात 95 हजार कोटी रुपयांची भरपाई मिळाली आहे. या आकडेवारीवरून असे दिसते की विम्याचे हप्ते खूपच कमी जमा झाले असून नुकसानभरपाई मात्र त्याच्या कितीतरी पट द्यावी लागली आहे. याचा अर्थ यातील बराच आर्थिक भार सरकार उचलत असल्यामुळेच हे सध्या शक्य होते आहे, अर्थात ज्या शेतकर्‍यांच्या पिकांचे नुकसान झाले नाही त्यांना कोणतीही रक्कम मिळण्याचे काही कारण नाही, पण आपली मानसिकता अशी झाली आहे की विमा काढला तर आपल्याला त्याचा फायदा झाला पाहिजे. तसे विम्याबाबत होऊ शकणार नाही, हे लक्षात ठेवले पाहिजे.
तात्पर्य, माणूस असो की पिके, आधुनिक काळात विमा काढण्याची पद्धत आपण टाळू शकत नाही. त्यामुळेच ही पद्धत जगभर वापरली जाते आहे. त्यापेक्षा चांगली पद्धत अजून जगाला सापडलेली नाही. नागरिक आजारपणाच्या खर्चाचा बोजा पडू नये म्हणून आरोग्य विमा काढतात, कमी उत्पन्न गटातील नागरिकांसाठी प्रधानमंत्री जीवन ज्योती बिमा योजनेसारखी योजना राबवून त्यांच्या वारसदारांना आधार देण्याचा प्रयत्न केला जातो आणि अनेक कारणांनी पिकांची खात्री नसलेल्या शेतकर्‍यांसाठी प्रधानमंत्री फसल बिमा योजना राबविण्यात येते. ही सर्व विमा संरक्षण देण्याची अपरिहार्यता आहे. ते सर्वांच्याच फायद्याचे आहे. त्यामुळे जीवन
ज्योती विमा असो की पिक विमा असो, आपल्या पात्रतेनुसार अशा योजनांचा लाभ आपण घेतला पाहिजे. सध्या तरी जोखीम कमी करण्याचा हाच मार्ग उपलब्ध आहे.

  • यमाजी मालकर (ymalkar@gmail.com)

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या विजयाचा पीआरपीकडून निर्धार

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांना चौथ्यांदा विजयी …

Leave a Reply